Saturday, 28 March 2020

मन एव मनुष्याणां...



भारतात मानसशास्त्रावर आपल्या ऋषीमूनींनी अनेको भाष्य केले आणि तितकेच प्रयोगही. दर्शनशास्त्रातला "योगदर्शन" हा भारतीय मानसशास्त्राचा मुकुटमणी, श्रीकृष्णाने सांगितलेला स्थितप्रज्ञभाव, बुद्ध आणि महावीर अशा अनेक महानुभवांचे विचार, यात मन आणि शरीराचा संबंध, सत्व-रज-तम, मनाच्या जागृत-स्वप्न-सुषप्ती या अवस्था अशा अनेक गोष्टी आहेत. संत-महात्म्यांनी आपल्याला प्राकृतात सहज समजेल अशा लिखाणातून,अभंगातून मनावर मार्मिक भाष्य केलय. संत तुकाराम सुखी जीवनाची गुरुकिल्ली देत म्हणतात "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धि चे कारण", गुरढोरं सांभाळणारा चोखा तर "ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा" अस म्हणत बाह्यरुपापेक्षा अंतर्मनात डोकावण्याचा सल्ला देत आहे. प्रत्येकजण मनाविषयी बोलताना मनाची चंचलता,मनाची विशालता, मनाचा कोतेपणा सारं सारं काही मांडताना या मानवी जीवनाच तत्वज्ञान सांगतात, तर कधी मनाविषयी आश्चर्य व्यक्त करतात.मनातल्या नकोशा विचारांना कितीही हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा त्याच विचारांवर येऊन अडकतं."मन वढाय वढाय.." या कवितेतून निरक्षर बहिणाबाईंना पण हाच प्रश्न सतावतो,

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन
उंडारलं उंडारलं, जसं वारा वाहादन

आपल्या या लहरी मनाच्या शोधाच्या पाश्चिमात्यांच्या धरतीवरील काही मजेशीर घटना पाहुयात.ग्रीक भाषेत आत्म्याला "सायकी" आणि अभ्यासाला "लॉजिया" असं म्हणतात.म्हणूनच आत्म्याचा अभ्यास म्हणजे "सायकॉलॉजी" हा शब्द निघाला. मनुष्य मरण पावला तरी त्याचा आत्मा अमर आहे यावर ग्रीकांचा विश्वास होता.मनुष्य जागा असतो तेव्हा त्याच्या हालचालींवर, विचारांवर आणि कृतींवर आत्म्याचा ताबा असतो; पण तो जेंव्हा झोपतो त्यावेळी त्याचा आत्मा त्याच्या शरीरापासून दूर गेलेला असतो म्हणून वरील गोष्टींवर त्याचा ताबा राहात नाही असं त्यांचं म्हणण होतं.हा सगळा स्वत:चा अनुभव गोळा करताना अनेक ग्रीक तत्वचिंतकांनी खुप मजेशीर थेअरीज मांडल्या आहेत. अरिस्टॉटल म्हणायचा की, उन्हाळ्यात पाणी प्यायल्याने उंदीरं मरतात,माणसाच्या शरिरात फक्त 8 बरगड्या असतात आणि स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी दात असतात. गुरुत्वाकर्षणाचं कारण पण ते असेच मजेशीर देत, वर फेकलेला दगड पुन्हा खाली येतो याचं कारण तो दगड मुळचा जमिनीवरचाच असतो आणि वर गेल्यावर त्याला आपल्या मूळ जागी परत यावंस वाटतं.माणसांना आपलं घर सोडून गेल्यावर जसं पुन्हा घरी यावंस वाटतं तसंच ते काहिसं होतं.म्हणजे सजीवांप्रमाणेच सगळे निर्जीवही वागतात असे हे विचार होते. हा सगळा प्रकार जरी हास्यास्पद असला तरी याला "क्रमिक विकास" म्हणून माणसाच्या वैचारिक उत्क्रांतीमध्ये खुप मोठे स्थान आहे. कोणते ही विशिष्ट शिक्षण आणि उपकरण नसताना केवळ निसर्गाकडे पाहुन, निरिक्षण करुन हा विचार सुचणे हीच आश्चर्याची गोष्ट होती.

मानवाच्या मनाचा शोध घेत घेत मेंदूविषयीचं मानवाच ज्ञान अनेक मार्गांनी वाढलं,अशीच अमेरिकेतील न्यू इंग्लंड या भागात घडलेली घटना. 13 सप्टेंबर 1848 च्या दुपारी रेल्वेची लाईन टाकण्याचं काम चालू होतं. त्या कामाचा फिनिआज गेज हा मुकादम म्हणून काम पाहत होता. या कामात डोंगरांतून वाट तयार करताना स्फोटकं वापरावी लागत होती.त्या दिवशी काम करताना त्यातलंच एक स्फोटक विचित्ररित्या फुटून सात किलो वजनाचा एक मोठा लोखंडी दांडा गेजच्या डाव्या गालातून घुसून त्याच्या मेंदूला आणि कवटीला भोक पाडून डोक्यातून चक्क वर आला. कवटीला एवढं मोठं भोक पडलं होतं की त्यातून एखाद्याची मूठसुद्धा आत जाईल. या स्फोटानंतर गेज दुर खड्ड्यात फेकला गेला. त्याला काही कामगारांनी उचलून एका घरी नेलं, तो वाचेल अशी कुणाला ही आशा वाटत नव्हती. शवपेटी बनवणार्या व्यक्तीने तर त्याच्या शरीराची मोजमापे ही नेली होती. पण दोन डॉक्टरांनी वापरलेल्या कुठल्याश्या औषधांच्या प्रयत्नाने तो वाचला आणि आपल्या घरी विश्रांतीसाठी गेला. त्याची ही गोष्ट अनेक दशके गाजली, मज्जाविज्ञाना (Neuroscience) च्या विद्यार्थी आणि स्कॉलर्ससाठी हा कुतूहलाचा विषय होता. पण गेज आता पुर्वीसारखा राहिला नव्हता. सुस्वभावी व मनमिळाऊ गेज आता हट्टी, चिडचिडा आणि अहंकारी बनला. कोणाकडेही आपली लैंगिक ईच्छा व्यक्त करे.कालांतराने प्रकृती खालावली आणि 1860 साली त्याचा मृत्यू झाला. आजही त्याची ती कवटी आणि तो रॉड हार्वर्डच्या मेडिकल स्कूलने जपून ठेवला आहे. त्या अपघातानंतर तो जवळपास 12 वर्ष जगला होता. दरम्यानच्या काळात त्याच्या अपघातावर, या अपघातामुळे बदलेल्या त्याच्या स्वभावावर अनेक संशोधने झाली. आपल्या स्वाभावातल्या वेगवेगळ्या पैलूंवर आणि आपण करत असलेल्या निरनिराळ्या अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूत वेगवेगळे भाग असतात की नाही यावर खूप संशोधन, चर्चा आणि सखोल अभ्यास सूरु झाला.

या अशा मेंदू आणि मन यांच्या शोधातील वैचारिक उत्क्रांतीच्या काही घटना जाणून घेण्याचा मुळ उद्देश हाच की, आपलं मन कसं आहे? त्यात नक्की काय-काय होत? हे समजण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी झालेल्या वैज्ञानिक प्रयोगांची, त्यांच्या प्रयत्नांची माहिती झाली तर आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडताना त्याबद्दल कुतूहल नक्की वाढेल आणि अनेक घटना,प्रसंग यांचा माझ्यावर होणारा परिणाम पण लक्षात येईल. आपण बर्याच गोष्टी खूप सहज घेतो, त्यात आपल मन ही असत.जीवनात आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात दुर्लक्षीत गोष्ट ही मनच आहे. जीवनात भोग भोगण्यापासून ते ध्येय गाठण्यापर्यंत मनाची खुप आवश्यकता आहे. म्हणूनच ब्रम्हबिन्दू उपनिषद म्हणते,

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।
बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥

आज मनबुद्धीचा शोध यासंबंधीच्या काही घटना पाहिल्या. आता पुढील भागात मनावर कोणी काय-काय प्रयोग केले आणि त्यांच्या रंजक कथा पाहुयात.


टीप- यातील काही भाग हा संकलीत आहे आणि लेखांसंबंधी आपल्या काही सुचना असतील तर नक्की कळवा.

- केदार मुत्तगी


संदर्भ ग्रंथ -
1) भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण "पातन्जल योगदर्शन" - कृष्णाजी केशव कोल्हटकर
2) मनात - अच्युत गोडबोले
3) विषादयोग - आनंद नाडकर्णी
4) मनकल्लोळ - अच्युत गोडबोले, निलांबरी जोशी
5) पांडूरंगशास्त्री आठवले यांचे वाङ्‌मय

1 comment: