Sunday, 27 August 2017

तू विवेक दे !

सातत्याने एखादी कृती केल्याने सहजच त्यात नकळतपणे यांत्रिकता येऊन जाते आणि कालांतराने ती कृती करण्यात शुष्कता येते . ही शुष्कताच अकर्मण्यतेला आमंत्रण देते आणि त्या कृतीतला उत्साह निघुन जातो .जीवनाचे सातत्य आणि अखंडत्व टिकवण्यासाठी नेहमीच अशा उत्साहाची गरज असते . या माणसाच्या कचखाऊ स्वभावाला ओळखून द्रष्टया ऋषिनी उत्सव ,सण देऊन मानवी जीवनाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला . हे उत्सव आपला उत्साह वाढवतात आणि जीवनाच्या गतीत सातत्य टिकवतात . आजपर्यंत या उत्सवांनी आपला सतत उत्साह वाढवला आहे . पण उत्साहासोबत गरज असते त्यामागे असलेल्या हेतु , व्यथा नि जाणिवांशी आपण समरस आहोत का या आत्मपरिक्षणाची.
कारण जेव्हा हेतुला तिलांजली दिली जाते तेव्हा उत्सवातला उत्साह कमी झालेला नसतो पण उत्सवाच विकृतिकरण सुरु झालेल असत .कोणत्याही कृतीचा आत्मा हा त्या कृती मागे असलेल्या हेतुत असतो . जेव्हा आत्मा निघुन जातो तेव्हा राहतात ते फ़क्त प्राणहीन हाडांचे सांगाडे .

विघनहर्त्या गणरायाचे स्वागत करण्यात सगळीकडे अवर्णनीय उत्साह असतो . कलेचा अधिपति असलेल्या देवतेच् स्वागत आपल्या सृजनशील कलेनी भव्य आरास करुन करणे ही अलौकिक संधी असते . परंतु कलेसोबत बुद्धीची देवता असलेल्या या देवतेच स्वागत करण्यात मात्र आम्ही निर्बुद्धता केली आहे .बुद्धीचे दैवत असलेली देवता सौंदर्याचे उपभोक्ते असलेल्यांच्या घरी आली आहे . ही आपली सौंदर्य उपभोगाची वृत्ती आपल्या बौद्धिक उपासनेला निर्बुद्ध बनवत आहे . आपण गणरायाच्या मुर्तीत सौंदर्य बघायला निघालो आहोत . अर्थात मुर्तीत सौंदर्य असतेच पण गणरायाची मूर्ती ही बुद्धीच्या उपासनेचे साधन आहे याला सहज विसरलो . 

इंटरनेट मुळे आज ज्ञानाचे स्त्रोत अगदी सहज उपलब्ध आहेत , अगदी आपल्या बोटाच्या टोकावर आले आहे . अशा काळात बुद्धीची उपासाना करण्यासाठी गणपति का हवेत ?
कारण इंटरनेट ज्ञान उपलब्ध करून देऊ शकते पण आम्हाला नुसत ज्ञान नकोय सोबत हवाय तो विवेक (Power of discrimination ).
कारण नुसत ज्ञान हे भूतकाळातील अनुभवांच संचित असत पण त्या ज्ञानसंचिताचा विधायक उपयोग वर्तमान आणि भविष्यात करण्यासाठी लागतो तो विवेक . म्हणूनच आज गणारायकडे विवेकी बुद्धी मागण्याची गरज आहे . 

आत्यंतिकवाद हा बुद्धिचा संकुचितपणा आहे. आत्यंतिक अहिंसेचे समर्थन करणार्यांनी षंढ बनवल आहे तर आत्यंतिक हिंसेच समर्थन करणार्यांनी शांतता भंग केली आहे . हे गणराया आज आम्हाला हिंसा-अहिंसेचा विवेक हवा आहे .

जे आवश्यक असूनही मिळत नाही आणि झगडून घ्याव लागत त्याला हक्क म्हणतात .जे कोणीही कर म्हणून सांगत नाही आणि तरी करण आवश्यक असत त्याला कर्तव्य , जबाबदारी म्हणतात . आवश्यक हक्क मिळवताना न उमगलेल्या जबाबदारी पार पाड़ण्याचा आमचा विवेक जागृत ठेव .

व्यक्तिस्वातंत्र्य हा आमचा अधिकार आहेच . पण आमच व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्याच व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहिल याचा विवेक दे .

डावे आणि उजवे अशा विचारसरणीत दुभांगलेल्या राष्ट्राला विवेकी विचाराचे अधिष्ठान दे .

आत्यंतिक राष्ट्रनिष्ठा जपतानाही वैश्विकतेचे आमचे भान जागृत ठेव .

अविवेकाची काजळी लावून विवेकवादाची शेखचिल्ली करणार्यांना शुद्ध विवेकाचे दर्शन दे .

बुद्धित साचलेल्या विचारांना कर्तृत्वाचे हात दे नि त्या कृतिवीरांना विवेकत्वाच आशीष दे .

-- सागर मुत्तगी 

14 comments:

  1. यथार्थ आणि अतिशय सुंदर विचार..
    गणरायाकडे खरोखर विवेकबुद्धीचेच मागणे आहे..🙏🙏

    ReplyDelete
  2. खुप सुंदर blog लिहिला आहे.

    ReplyDelete
  3. सुंदर लेख.......

    ReplyDelete
  4. अगदी कमी शब्दात खुप काही सांगून जाणारा लेख....

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  6. सुंदर लेख......
    Keep it up Sagar Bhau....

    ReplyDelete
  7. जागृत लेख.....



    ReplyDelete
  8. ज्या काळात तर्काला तिलांजली देवुन उत्सव आणि उन्माद यातली रेषा अस्पष्ट होते त्यावेळी इतके संयमित लिखाण केले त्याबद्दल खुप शुभेच्छा.....

    ReplyDelete
  9. I have no words to express my emotions but I have not only request but also hope keep it up, waiting for your next blog

    ReplyDelete
  10. खूप छान 👌👌

    ReplyDelete