Sunday, 20 August 2017

"न खलु वयः तेजसो हेतुः "



अज्ञाताचा अज्ञातापासून अज्ञाताकडे सतत चालेला हा प्रवास.. माणसाचा जन्म का? इथपासून ते आपले गंतव्य काय? हे सगळे जणु की यक्ष प्रश्नच..
पण या प्रवासात प्रत्येकाला 'आपला' असा "अनुभव" गोळा करत पुढे जाता आले पाहिजे, कारण नुसतीच 'साखर गोड आहे' हे ऐकून साखरेची मजा नाही, त्यासाठी ती चाखलीच पाहिजे..कारण "अनुभव ब्रम्हा:" हेच सत्य सर्व वाङ्गमयांचा सार..

पण आपण जीवन जगताना सतत 'आधाराचा' शोध घेतच पुढचा प्रवास करत असतो,यात वाइट काही नाही..परन्तु तो झाला त्यांचा अनुभव..

बाबा आमटे एकेठिकाणी म्हणतात की,

‘गांधी, लेनिन, मार्क्‍स, मार्टिन ल्युथर, सानेगुरुजी हे केवळ दीपस्तंभासारखे.. खडकावर जहाज आदळू नये, एवढेच त्यांचे दिग्दर्शन. पण वल्हे मारण्याची, खडक टाळण्याची ताकद नाविकांतच हवी,’

मग आपला अनुभव गोळा करायचा तर ही ताकद येणार कुठून?
कुसुमाग्रजांचा कोलंबस आठवा.. किंवा
Give me 100 Nachiketa and I can change the world म्हणारे विवेकानंद..
असे अनेक महापुरुष या धरेवर जीवनाला "आनंद सोहळे" बनवून अमर झाले.. कसे?

तर त्यांच्या "दुर्दम्य ध्येयासक्तिमुळे"..

ही ध्येयासक्ति ऊभी राहते ती 'संस्कृती आणि समाज' यांप्रती असलेल्या "संवेदनशीलते"मुळे.. आज यंत्रमानवाच्या या युगात आपण आपली संवेदनशीलता हरवून बसलोत.. ही उभी करण्यासाठी आजप्रयत्न हवेत..

"संथ नाजुक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे
मस्तकावर पाट्या वाहणार्‍या स्वेदगंधेच्या डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावाणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्‍याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे

भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत" (बाबा आमटे- ज्वाला आणि फूले )

आजचा दिवस पवित्र आहे, कारण ज्ञाननिष्ठ ब्राम्हणांचा (ब्राम्हण = वृत्तिवाचक शब्द) यज्ञोपवीत बदलण्याचा दिवस.. म्हणजेच "वेदनिष्ठने सृष्टिचे संस्कार स्वास्थ्य टिकावेत" यासाठी अखंड कर्मयोग करण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा दिवस.. यज्ञोपवीत घेताना केलेला संकल्प आणि आज पर्यंतच्या प्रवासातला " आपला अनुभव " यांची सांगड घालून 'आत्मपरीक्षण' करण्याचा दिवस..
यातुनच "You cannot purchase 'real' Indian Brahmin"( पांडुरंगशास्त्री आठवले- अमेरिकनांना त्यांनी ठणकावुन सांगितले) हे म्हणण्याची खुमारी ऊभी राहील.."आत्मश्रद्धा आणि ईशश्रद्धा" आणखी दृढ़ होईल..
 
"सूर्यस्य पश्य श्रेमाणं योन तन्द्रयते।
चरश्चरैवेति चरेवेति…!"
हा उपनिषदांचा उद्घोष आहे, "कधी सुर्याला थांबलेल पाहिलय ! नाही ना.. मग तुम्ही ही चालत रहा."
म्हणूनच 'संकल्प' घेण्यास्तव आणि 'आपला अनुभव' गोळा करण्यास्तव कटिबद्ध होऊयात..

"खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!"

- केदार मुत्तगी
(दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही !!)

1 comment: