"युद्धस्य कथा रम्या" बालकच नाहीतर सर्वच वयोगटाला युद्धाच्या,नायकांच्या कथा ऐकण्यात मजा येते,त्यातील प्रत्येक घटनेशी तो मनाने समरस होत असतो.नायकाचा विजय झाला की हा आपला विजय झाल्याप्रमाणे टाळ्या वाजवतो,त्याच्या पराभवाने दुःखीही होतो.इतकेच काय नायकाचा शत्रु आपला शत्रु समजतो,त्याच्या अन्यायाने चिडून उठतो,ही परिस्थिती जगाच्या पाठीवर सर्वत्र सारखीच..मग तोच नायक त्या व्यक्ति अथवा समाज यांच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय बनत असतो.फ्रॉईड म्हणतो त्याप्रमाणे आपल्याकडून अशक्य अथवा लोकेषणेमुळे करू न शकलेल्या गोष्टी नायकाला करताना पाहून त्यात स्वतःला पाहणे,ही मानवाची सहजप्रवृत्ती..जणु एक स्वप्नरंजनच,ही स्वप्ने वर्तमानापेक्षा जास्त रंजकच.. मग हीच नायके अथवा तो इतिहासच काय ते खरे आणि बाकी ते सर्व खोटेच हे मांडण्याचा अट्टहास सुरु होतो.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशात जे घडतय ते पाहून कोणताही संवेदनशील माणूस नक्कीच अस्वस्थ होईल.ज्याप्रमाणे बालक बोटे मुखात घालून आपणच आपल्या मुखाची दुर्गंधी पसरावतो, त्याचप्रमाणे ही इतिहासात रमणारी माणसे इतिहास घडवणे तर दुरच! पण त्यातुन इतिहासाची विकृती घडवताना जास्त दिसताहेत.इतिहासातील मढी उकरून काढण्यात कधीच अर्थ नसतो,नाहीतर त्या मढयांची अस्मिता वर्तमान जीवन असह्य आणि भविष्याची स्मशाने करून सोडतात.
इतिहासाकडे पाहताना प्रत्येकजण आज आपल्या 'पूर्वग्रह' आणि आपापल्या 'परिपेक्षा'तूनच पाहतोय, म्हणूनच कुणी डावा, तर कुणी उजवा किंवा भक्त ही असतो.आइनस्टाइन म्हणतोच ना, प्रत्येकाचे जगणे हे त्याच्या दिक् आणि काल (time and space)यामध्येच बांधलेले असते. हा प्रत्येकाची Time and Space आणि comfort zone सोडून बाहेर येण्याची मुळीच तयारी नसते.मग कोणी भगव्यावर,निळ्यावर आडून बसतो, तर कोणी हिरव्यावर आडून बसतो, ही वृत्ती घातक असते.
"आपल्या आदर्श नेत्याच्या अथवा श्रद्धास्थानाच्या चुका आणि मर्यादा आपण सभ्य शब्दात नोंदवायला तयार आहोत का? निदान इतर कुणी हे काम केले तर ते सभ्यपणे ऐकून घेण्याची क्षमता आपल्यात आहे का, हा खरा प्रश्न आहे. समाजाच्या श्रद्धास्थानाविषयी चिकित्सा करण्याची वेळ आली म्हणजे समाज चिडतो.हे समाजाचे चिडणे मी समर्थनीय मानले नाही तरी क्षम्य मानतो;पण अशा वेळी विचारवंतांनी तरी विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरायला हवा. तेही हा आग्रह धरणार नसतील तर आंधळ्या भक्तिभावनेला फळे येतील असे मला वाटत नाही"
- नरहर कुरुंदकर(व्यक्तिपूजा: एक चिकित्सा)
इतिहासातील प्रत्येक पात्र अथवा ज्यांना कुणाला तुम्ही तुमचा आदर्श समजता,तो सर्वच क्षेत्रात परिपूर्ण असणे असंभव.उदाहरणार्थ, आइनस्टाइन हा जर माझा आदर्श आहे, तर तो माझा विज्ञानाच्या क्षेत्रातला आदर्श,तो क्रिकेट अथवा अभिनय क्षेत्रातला आदर्श कसा होवु शकतो! त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनाला अनेक पैलू असतात, त्या प्रत्येक पैलुचा स्वतंत्र अधिकार असतो,म्हणुनच आदर्श अनेक ही असु शकतात.परस्परविरोधी मतांची महापुरुषे ही त्यांच्या गुणांमुळे वंदनीय ही असू शकतील. त्याकाळी शिवरायांपुढचा शत्रु, त्यावेळेची परस्थिती नक्कीच वेगळी होती, तसेच बाबासाहेबांपुढील समस्या नक्कीच वेगळी होती,आज परिस्थिती बदललीय आणि आज संविधान मिळालाय. समान हक्क मिळालीत, तरी आपण त्या स्वप्नरंजनात आणि त्यांचा शत्रु तोच माझाही शत्रु या भूमिकेतून बाहेर येत नाही आहोत.त्या भूमिकेतुन बाहेर येण हा त्यांचा अपमान नसतो, तर "त्यांच कर्तृत्व, समर्पण आदि गुण ओळखुन नव्या समस्यांना सामोरे जाणे,त्यांची उत्तरे शोधणे. इतकेच नाही त्या समस्यांची विधायक आणि आश्वासक उत्तरे स्वतः बनणे हाच या महापुरुषांचा यथोचित सन्मान असु शकतो"."मी आंबेडकर अथवा शिवाजींइतका मोठा नाही बनु शकत तरी मी अशा छोट्या समस्यांपुढे खंबीर उभा राहणारा छोटा शिवाजी अथवा छोटा आंबेडकर नक्कीच बनु शकतो".श्रीमद्भगवद्गीता ही हेच सांगते,"स्वल्पमप्यस्य धर्मस्य.." छोटेसेच करा पण प्रमाणिक प्रयत्न करा.
जग आणि विशेषतः भारत आज अनेक समस्यांनी ग्रस्त आहे.देश सोडून पळून जाण्याचे पळपुटे मार्ग स्विकारणे हे कधीही सोपे असते, पण अशा परिस्थितीत विजिगीषा वृत्तिने पाय रोवून उभे रहाणे हेच शहाणपणाचे असते आणि ही उर्मी, प्रेरणा या महान पुरुषांकडून घेण्यात खरी जीवनाभिलाषा दिसून येते.वेगवेगळ्या विचारधारा या समाजात असणारच,पण त्यातुन योग्य त्याची निवड करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी हवी."आनो भद्रा:" म्हणुन योग्य त्या सर्वाचा स्वीकार करणाऱ्यांचा हा देश आहे.
"नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळीत ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते"
'आम्ही दाखवु तोच सूर्य' अशा मुर्खांच्या नंदनवनात रमण्यापेक्षा इतिहासातून आणि अनुभवातून योग्य पाठ शिकणे, त्यातुन उत्तम भविष्यासाठीचा विधायक आणि सर्जनशीलतेचा मार्ग स्विकारणे हेच खरे विवेकपूर्ण जीवन असू शकते.एकट्याने हे जीवन जगणे तसे कठीणच,म्हणुन समविचारी आणि समान ध्येय असणाऱ्यांच संघठनच आवश्यक असते.
"येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे"
टिप: या लेखा सोबत "दिदी" या 1959साली प्रदर्शित झालेल्या एका जुन्या सिनेमातील गाण्याची लिंक ही शेयर करत आहे, ती नक्की पहावी. ती यासाठी की, 1959 सालातले प्रश्न आणि आजचे पडणारे प्रश्न यात नक्की फरक तो किती?
http://youtu.be/7vXCXYPjrIE
येत्या 26 जानेवारीला संविधान मिळुन 68 वर्ष पुर्ण होतील,तेव्हा इतक्या वर्षात देश किती बदलला,यापेक्षा मला वाटत आपण स्वतःला आणि देशाला बदलण्याचा किती प्रयत्न केलाय?याचा विचार व्हायला हवा. कारण गांधीजी म्हणतातच ना, Be the Change, U want to see.
- केदार मुत्तगी
आपण स्वतः किती बदललोय आणि देशाला बदलवण्यासाठी मी काही प्रयत्न करतोय की नाही? हा विचार नक्कीच झाला पाहिजे..
ReplyDeleteपुन्हा एकदा तुमच्या लेखाने अंतर्मुख केले..!!