Monday, 30 March 2020

अचपळ मन माझें नावरे आवरीता..



आपण रोज कितीतरी गोष्टी ठरवतो की त्या मन लावून करायच्या, पण न कळत दुसरीकडेच हरवून जातो म्हणूनच मनासाठीचे श्लोक रचणारे समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥

युधिष्ठीराला जेव्हा यक्ष प्रश्न विचारतो की, 'विश्वात सर्वाधिक वेगवान काय आहे?' त्यावेळी क्षणाचा ही विलंब न करता युधिष्ठीर उत्तरतो - 'मन'. मनाचा वेग प्रकाशापेक्षा ही प्रचंड आहे, मग ते अचपळ कसे? आपला प्रतिनिधी अर्जुनसुद्धा भगवद्गीतेत भगवंताला म्हणतो,"चञ्चलं हि मनः कृष्ण"- हे कृष्णा,माझं मन चंचल आहे. त्यावेळी भगवंत म्हणतो, मला ही गोष्ट मान्य नाहीं, "मनोदुर्निग्रहं चलं"- मन चंचल नाही तर चल आहे. मनाचें चांचल्य ही त्याची प्रकृती नाहीं तर विकृति आहे. मन हे एक साधन आहे,त्याला किती सत्ता द्यायची हे आपण ठरवाव लागत. महर्षी पतञ्जलि पहिल्या समाधीपादात म्हणतात, "योगश्चित्तवृत्तिनिरोध:"- योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे. पुर्वजन्मीचे आणि या जन्मातल्या अनेक अनुभवांचे संस्कार मनात साठवले जातात, हे सगळे संस्कार मिळुनच चित्त बनते. जेव्हां मनाच चलनवलन नियंत्रित असतं, तेव्हा मन स्फटिकासारखं स्वच्छ होतं; चित्त निर्मळ झालेलं असतं. मनावर कळत-नकळत झालेल्या असंख्य संस्कारतूनच वृत्ती बनते, या वृत्तींपासून चित्त आकार घेतं आणि यातूनच आपला स्वभाव जन्माला येतो. याच स्वभावाचा आपल्या प्रत्येक कृती आणि विचारांवर प्रतिबिंब उमटत असतं. फ्रॉईड तर म्हणतो की, चित्ताला आपण ओळखूच शकत नाही, पण त्याचा परिणाम मात्र दिसतो यालाच तो "Subconcious" म्हणतो.

आज आपण ज्यांनी मनाचा मागोवा घेत-घेत स्वभावावर असंख्य प्रयोग केले,अशा काही अवलियांचे उत्कंठावर्धक प्रयोग पाहुया. ही शाखा मानसशास्त्रात Behaviourism म्हणून प्रसिद्ध आहे.

'Don't become a mere recorder of facts, but try to penetrate the mistery of there Origin' असं इव्हान पाव्हलॉव्ह म्हणत असे. तो एक फिजिऑलॉजिस्ट होता. त्याने आयुष्याचा निम्मा भाग पचनसंस्थेविषयी संशोधन करण्यात घालवला, त्याला कुत्र्यांच्या लाळ गळण्याच्या प्रक्रियेचे खूपच कुतूहल होतं. अन्न खाण्याचा, ते पचण्याचा आणि त्यासाठी मेंदूतून मज्जातंतूद्वारा मिळणार्या सुचनांचा पाव्हलॉव्हला अभ्यास करायचा होता.

पचनसंस्थेवरच्या संशोधनात प्रयोग करताना त्याने कुत्र्यांचा वापर केला. त्यानं एका कुत्र्याच्या पोटात काय प्रक्रिया चालल्या आहेत ते समजून घेण्यासाठी कुत्र्याच्या पोटाला भोक पाडून जठरातलं सगळं बघता येईल अशी व्यवस्था केली. सर्वप्रथम जेव्हा त्या कुत्र्याने अन्न खाल्लं तेव्हा ते अन्ननलिकेमार्फत कुत्र्याच्या पोटात गेलं आणि त्याच्या पोटात जाठररस निर्माण झालेलं पाव्हलॉव्ह ने पाहिलं. आता त्यानं कुत्र्याच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करुन कुत्र्याची अन्ननलिका बांधून ठेवली आणि त्याच्या गळ्याशी एक भोक पाडून कुत्र्यानं तोंडावाटे खाल्लेलं अन्न पोटात न जाता त्या भोकावाटे शरीराबाहेर जाईल अशी व्यवस्था केली. आता कुत्र्यासमोर अन्न ठेवलं. त्याबरोबर कुत्र्यानं ते खाऊन टाकलं. पण ते पोटात न जाता भोकातून शरीराच्या बाहेरच गेलं. पण पाव्हलॉव्हच्या एक गोष्ट लक्षात आली की, अन्न पोटात गेलं नसलं तरीही पोटात जाठररसाचा मोठ्या प्रमाणात स्त्राव सूरु झाला. त्यामुळे स्त्रावाचा अन्न प्रत्यक्ष पोटात जाण्याशी संबंध नसून तो शरीरातल्या मज्जासंस्थेतून पोटाला मिळणार्या संदेशाशी आहे. अन्न बघितल्यावरच त्याचं पचन होण्यासाठी मेंदुकडून जठराला ज्या सूचना मिळतात त्यामुळे तो जाठररस तयार होतो हे त्याने ताडलं. त्यानंतर त्याने कुत्र्यांवर अनेक प्रयोग केले. कुत्र्यांना अन्न देण्याअगोदर काही काळ वेगवेगळ्या चेतना दिल्या. उदाहरणार्थ, घंटा वाजवायची आणि लगेच अन्न द्यायचे. असे बरेच दिवस केल्यावर अन्न आणि घंटा यांच समीकरण कुत्र्याच्या डोक्यात पक्क झालं. नंतर तो केवळ घंटा वाजवायचा आणि अन्न दिलच नाही. तेव्हां अन्नाच्या आठवणीनेच कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटायचे. या प्रक्रियेलाच "क्लासिकल कंडीशनिंग" म्हणायला लागले. 

"मला एक डझनभर निरोगी मुलं द्या. मला पाहिजे तशी त्यांची वाढ आणि संगोपन करु द्या. मग मी त्यांना डॉक्टर, वकील, व्यापारी एवढचं कशाला एक भिकारी किंवा एक चोरसुध्दा बनवून दाखवेन. त्यांचे पूर्वज कुठल्याही वंशाचे, व्यवसायाचे किंवा क्षमतेचे असले तरी त्यामुळे काहीच फरक पडणार नाही. मी मनात आणेन तसं या मुलांना घडवू शकेन" , हे प्रसिद्ध वाक्य जॉन वॉटसन याचे. त्यानेच Behaviourism हा शब्द निर्माण केला.

वॉटसनने 'अल्बर्ट बी' या लहान मुलावर केलेला प्रयोग मानसशास्त्राच्या इतिहासात खूपच गाजला आणि त्यावर टीकाही तितकीच झाली. अल्बर्ट बी हा एका परिचारिकेचा 11 महिन्यांचा मुलगा होता. 'कधीही न रडणारा चांगला मुलगा' असं सगळे त्या मुलाच वर्णन करत असतं. 1920 साली वॉटसन आणि त्याच्या एका सहकारीने अल्बर्ट बीच्या मनात कुठल्याही केसाळ प्राण्यांबद्दल आणि वस्तूंबद्दल भीती निर्माण करायचं ठरवलं. हा प्रयोग सूरु करण्यापूर्वी अनेक दिवस अल्बर्ट बीला एक पांढरा उंदीर खेळायला दिला जाई. अल्बर्ट बी त्याच्याबरोबर बराच वेळ खेळत बसत. काही काळ असाच गेल्यावर जेव्हा अल्बर्ट बी त्या उंदराला पकडायला गेला त्याचवेळी त्याच्या डोक्यामागे एका हातोड्यानं त्यांनी एक मोठा आवाज केला अल्बर्ट बी तो आवाज ऐकून दचकला आणि घाबरला. त्याच्या चेहर्यावर प्रथमच भीती दिसली.काही दिवसांनी हे तो विसरला असेल म्हणून पुन्हा अल्बर्ट बीसमोर पांढरा उंदीर ठेवला. लगेच अल्बर्ट बीनं डावा हाथ पुढे करुन उंदराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने स्पर्श करताच वॉटसनने लोखंडी दांडा आपटून मोठा आवाज केला. अल्बर्ट बी भीतीने पुन्हा दचकला! त्याने तोंड गादीत लपवून घेतलं.उंदीर पकडणं आणि आवाजामुळे वाटणारी भीती यांच्या संबंधाचं समीकरण अल्बर्ट बीच्या डोक्यात पक्कं व्हायला लागलं होतं. असे प्रयोग पुन्हा झाले आणि अल्बर्ट बी पुन्हा गादीत तोंड लपवून रडायला लागायचा. अल्बर्ट बीला त्रास होऊ नये म्हणून त्याच्यावर हाच प्रयोग विशिष्ट कालावधी नंतर पाच-सहा वेळा झाला. आता उंदराचं दृश्य आणि भीती यांच नातं अल्बर्टच्या डोक्यात पक्कं झालं होतं आणि शेवटी कुठलाच आवाज न करतासुद्धा केवळ पांढरा उंदीर समोर दिसल्याबरोबर अल्बर्ट बी त्याला बघून घाबरायला लागला. त्याच्यामध्ये 'कंडिशन्ड फिअर रिस्पॉन्स' निर्माण करण्यात वॉटसनने यश मिळवलं होतं. अल्बर्ट बीला डीकंडिशनिंग न केल्याने मोठेपणी त्याच काय होणार याची लोकांना खुपच भीती होती. अल्बर्ट बी कुठल्याही केस असलेल्या गोष्टीची भीती असणारा एक मानसिकरित्या असुरक्षित माणूस म्हणून मोठा झाला असेल असे अंदाज बांधले होते. पण या प्रयोगानंतर त्याची आई त्याला घेऊन दूर कुठेतरी रहायला गेली असल्यानं अल्बर्ट बीविषयी बराच काळ गूढ होतं. शेवटी अनेक वर्षांनी एका मानसशास्त्रज्ञांने त्याचा सलग सात वर्ष शोध घेतला. तेव्हा याचा पूर्णपणे उलगडा झाला की अल्बर्ट बी वयाच्या सहाव्या वर्षीच मेंदूत पाणी झाल्यामुळे मृत्युमुखी पडला. त्याला जितकी वर्ष शोधायला लागली त्यापेक्षा ही तो कमी वर्ष जगला होता.

बिहेवियरिझम ही विचारप्रणाली 1920 च्या दशकात खुप लोकप्रिय झाली. तिने जवळपास 40 वर्ष अमेरिकेत राज्य केलं. स्किनर नावाच्या मानसशास्त्रज्ञाने तर "ऑपरँट कंडिशनिंग" आणि  'रिवार्ड अँड पनिशमेंट' या थेअरीचा वापर करुन अनेक करामती केल्या. त्याने एका कबूतराला पियानो वर धुन वाजवायला, दोन कबुतरांना तर चक्क टेबल टेनिस खेळायला, सशाला पिगी बँकेत नाणं टाकायला, डुकराला वॉशिंग मशीन मध्ये कपडे घालायला शिकवले होते. कालांतराने या विचारधारेत बरेच बदल होत गेले , कारण मनुष्यात असलेल्या अहंकार, सत्व-स्वत्व, ईच्छाशक्ती, स्वाभिमान, प्रेरणा, विवेकबुद्धी अशा अनेक बाबींचा यात विचार झालेला नव्हता. आज ही थेअरी बर्याच ठिकाणी वापरलेली दिसते, कामगारांना प्रोत्साहनपर मिळणारे बोनस व्हाऊचर्स, शाळेत बरोबर उत्तर दिल्यावर लगेच मिळणारे  बक्षीस हे सुद्धा बिहेवियरिझमच्या 'रिवार्ड अँड पनिशमेंट' थेअरीचा भाग आहे. यामधली कंडिशनिंंग थेअरीचा वापर एखादा प्रॉडक्ट, ब्रँड आपल्या गळी उतरवण्यासाठी जाहिरातींमधून सर्रास होतच असतो.


टीप -
यातील काही भाग हा संकलीत आहे आणि लेखांसंबंधी आपल्या काही सुचना असतील तर नक्की कळवा.

- केदार मुत्तगी


संदर्भ ग्रंथ -
1) भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण "पातन्जल योगदर्शन" - कृष्णाजी केशव कोल्हटकर
2) मनात - अच्युत गोडबोले
3) पांडूरंगशास्त्री आठवले यांचे वाङ्‌मय

Saturday, 28 March 2020

मन एव मनुष्याणां...



भारतात मानसशास्त्रावर आपल्या ऋषीमूनींनी अनेको भाष्य केले आणि तितकेच प्रयोगही. दर्शनशास्त्रातला "योगदर्शन" हा भारतीय मानसशास्त्राचा मुकुटमणी, श्रीकृष्णाने सांगितलेला स्थितप्रज्ञभाव, बुद्ध आणि महावीर अशा अनेक महानुभवांचे विचार, यात मन आणि शरीराचा संबंध, सत्व-रज-तम, मनाच्या जागृत-स्वप्न-सुषप्ती या अवस्था अशा अनेक गोष्टी आहेत. संत-महात्म्यांनी आपल्याला प्राकृतात सहज समजेल अशा लिखाणातून,अभंगातून मनावर मार्मिक भाष्य केलय. संत तुकाराम सुखी जीवनाची गुरुकिल्ली देत म्हणतात "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धि चे कारण", गुरढोरं सांभाळणारा चोखा तर "ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा" अस म्हणत बाह्यरुपापेक्षा अंतर्मनात डोकावण्याचा सल्ला देत आहे. प्रत्येकजण मनाविषयी बोलताना मनाची चंचलता,मनाची विशालता, मनाचा कोतेपणा सारं सारं काही मांडताना या मानवी जीवनाच तत्वज्ञान सांगतात, तर कधी मनाविषयी आश्चर्य व्यक्त करतात.मनातल्या नकोशा विचारांना कितीही हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा त्याच विचारांवर येऊन अडकतं."मन वढाय वढाय.." या कवितेतून निरक्षर बहिणाबाईंना पण हाच प्रश्न सतावतो,

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन
उंडारलं उंडारलं, जसं वारा वाहादन

आपल्या या लहरी मनाच्या शोधाच्या पाश्चिमात्यांच्या धरतीवरील काही मजेशीर घटना पाहुयात.ग्रीक भाषेत आत्म्याला "सायकी" आणि अभ्यासाला "लॉजिया" असं म्हणतात.म्हणूनच आत्म्याचा अभ्यास म्हणजे "सायकॉलॉजी" हा शब्द निघाला. मनुष्य मरण पावला तरी त्याचा आत्मा अमर आहे यावर ग्रीकांचा विश्वास होता.मनुष्य जागा असतो तेव्हा त्याच्या हालचालींवर, विचारांवर आणि कृतींवर आत्म्याचा ताबा असतो; पण तो जेंव्हा झोपतो त्यावेळी त्याचा आत्मा त्याच्या शरीरापासून दूर गेलेला असतो म्हणून वरील गोष्टींवर त्याचा ताबा राहात नाही असं त्यांचं म्हणण होतं.हा सगळा स्वत:चा अनुभव गोळा करताना अनेक ग्रीक तत्वचिंतकांनी खुप मजेशीर थेअरीज मांडल्या आहेत. अरिस्टॉटल म्हणायचा की, उन्हाळ्यात पाणी प्यायल्याने उंदीरं मरतात,माणसाच्या शरिरात फक्त 8 बरगड्या असतात आणि स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी दात असतात. गुरुत्वाकर्षणाचं कारण पण ते असेच मजेशीर देत, वर फेकलेला दगड पुन्हा खाली येतो याचं कारण तो दगड मुळचा जमिनीवरचाच असतो आणि वर गेल्यावर त्याला आपल्या मूळ जागी परत यावंस वाटतं.माणसांना आपलं घर सोडून गेल्यावर जसं पुन्हा घरी यावंस वाटतं तसंच ते काहिसं होतं.म्हणजे सजीवांप्रमाणेच सगळे निर्जीवही वागतात असे हे विचार होते. हा सगळा प्रकार जरी हास्यास्पद असला तरी याला "क्रमिक विकास" म्हणून माणसाच्या वैचारिक उत्क्रांतीमध्ये खुप मोठे स्थान आहे. कोणते ही विशिष्ट शिक्षण आणि उपकरण नसताना केवळ निसर्गाकडे पाहुन, निरिक्षण करुन हा विचार सुचणे हीच आश्चर्याची गोष्ट होती.

मानवाच्या मनाचा शोध घेत घेत मेंदूविषयीचं मानवाच ज्ञान अनेक मार्गांनी वाढलं,अशीच अमेरिकेतील न्यू इंग्लंड या भागात घडलेली घटना. 13 सप्टेंबर 1848 च्या दुपारी रेल्वेची लाईन टाकण्याचं काम चालू होतं. त्या कामाचा फिनिआज गेज हा मुकादम म्हणून काम पाहत होता. या कामात डोंगरांतून वाट तयार करताना स्फोटकं वापरावी लागत होती.त्या दिवशी काम करताना त्यातलंच एक स्फोटक विचित्ररित्या फुटून सात किलो वजनाचा एक मोठा लोखंडी दांडा गेजच्या डाव्या गालातून घुसून त्याच्या मेंदूला आणि कवटीला भोक पाडून डोक्यातून चक्क वर आला. कवटीला एवढं मोठं भोक पडलं होतं की त्यातून एखाद्याची मूठसुद्धा आत जाईल. या स्फोटानंतर गेज दुर खड्ड्यात फेकला गेला. त्याला काही कामगारांनी उचलून एका घरी नेलं, तो वाचेल अशी कुणाला ही आशा वाटत नव्हती. शवपेटी बनवणार्या व्यक्तीने तर त्याच्या शरीराची मोजमापे ही नेली होती. पण दोन डॉक्टरांनी वापरलेल्या कुठल्याश्या औषधांच्या प्रयत्नाने तो वाचला आणि आपल्या घरी विश्रांतीसाठी गेला. त्याची ही गोष्ट अनेक दशके गाजली, मज्जाविज्ञाना (Neuroscience) च्या विद्यार्थी आणि स्कॉलर्ससाठी हा कुतूहलाचा विषय होता. पण गेज आता पुर्वीसारखा राहिला नव्हता. सुस्वभावी व मनमिळाऊ गेज आता हट्टी, चिडचिडा आणि अहंकारी बनला. कोणाकडेही आपली लैंगिक ईच्छा व्यक्त करे.कालांतराने प्रकृती खालावली आणि 1860 साली त्याचा मृत्यू झाला. आजही त्याची ती कवटी आणि तो रॉड हार्वर्डच्या मेडिकल स्कूलने जपून ठेवला आहे. त्या अपघातानंतर तो जवळपास 12 वर्ष जगला होता. दरम्यानच्या काळात त्याच्या अपघातावर, या अपघातामुळे बदलेल्या त्याच्या स्वभावावर अनेक संशोधने झाली. आपल्या स्वाभावातल्या वेगवेगळ्या पैलूंवर आणि आपण करत असलेल्या निरनिराळ्या अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूत वेगवेगळे भाग असतात की नाही यावर खूप संशोधन, चर्चा आणि सखोल अभ्यास सूरु झाला.

या अशा मेंदू आणि मन यांच्या शोधातील वैचारिक उत्क्रांतीच्या काही घटना जाणून घेण्याचा मुळ उद्देश हाच की, आपलं मन कसं आहे? त्यात नक्की काय-काय होत? हे समजण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी झालेल्या वैज्ञानिक प्रयोगांची, त्यांच्या प्रयत्नांची माहिती झाली तर आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडताना त्याबद्दल कुतूहल नक्की वाढेल आणि अनेक घटना,प्रसंग यांचा माझ्यावर होणारा परिणाम पण लक्षात येईल. आपण बर्याच गोष्टी खूप सहज घेतो, त्यात आपल मन ही असत.जीवनात आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात दुर्लक्षीत गोष्ट ही मनच आहे. जीवनात भोग भोगण्यापासून ते ध्येय गाठण्यापर्यंत मनाची खुप आवश्यकता आहे. म्हणूनच ब्रम्हबिन्दू उपनिषद म्हणते,

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।
बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥

आज मनबुद्धीचा शोध यासंबंधीच्या काही घटना पाहिल्या. आता पुढील भागात मनावर कोणी काय-काय प्रयोग केले आणि त्यांच्या रंजक कथा पाहुयात.


टीप- यातील काही भाग हा संकलीत आहे आणि लेखांसंबंधी आपल्या काही सुचना असतील तर नक्की कळवा.

- केदार मुत्तगी


संदर्भ ग्रंथ -
1) भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण "पातन्जल योगदर्शन" - कृष्णाजी केशव कोल्हटकर
2) मनात - अच्युत गोडबोले
3) विषादयोग - आनंद नाडकर्णी
4) मनकल्लोळ - अच्युत गोडबोले, निलांबरी जोशी
5) पांडूरंगशास्त्री आठवले यांचे वाङ्‌मय

Friday, 27 March 2020

आपलाची (सं)वाद आपणासि..


"यन्त्रारूढानि मायया.." असा यंत्रवत चाललेला समाज हा एकाएकी  रोजची जगण्याची धडपड, आपले Plans, Goals हे सगळ सोडुन एका क्षणात फक्त 'मला जगायच आहे' या एका विचारात कैद झाला. प्रत्येकाची ही जगण्याची धडपड योग्य पण तितकीच केविलवाणी होती. केविलवाणी ती यासाठी की, सद्य परिस्थितीमध्ये माझी भुमिका काय असावी,माझ्या वागणुकीतून बाल-वृध्द, समवयस्कांच्या मनावर काय परिणाम होतो याचा तिळमात्र विचार कोणी करीत नव्हता. प्रत्येक जण आपली भीती समाजमाध्यमांवर विकत होता, हे अजुनही चालुये. एकीकडे भयग्रस्त लोक आणि दुसरीकडे एकत्र येऊन थाळ्या आपटणारे,उद्दामपणे फिरणारे. या दोन Extremes मधे सुवर्णमध्य काढणारे खुप कमी आहेत.भीती वाटणे रास्तच, पण त्यात तारतम्य असण गरजेच आहे. माझा मानसिक दुबळेपणा दुसर्या मध्ये भयगंड निर्माण करत असेल तर ? यास्थितीशी जे डॉक्टर,प्रशासन यंत्रणा आपल्या सर्व शक्तीने झुंझण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या मनात आपल्यासारखी मृत्युची भयानक कल्पना, "माझ कुटुंब" याचा पुसटसा विचार माझ्या वागण्यातून येत असेल तर ? आणि ज्यांच्यासाठी आपण हा लढा देतोय तो समाज उद्दाम, बेफिकीर आहे हा विचार त्यांच्या डोक्यात आला तर? म्हणुन असे वाटते की या आजारापेक्षा ही वृत्ती भयंकर आहे.

तत्वज्ञानामध्ये अनुक्रमिक काळ (Chronological time) आणि मानसिक काळ (Psychological time ) असे दोन प्रकारचे काळ आहेत. त्यात अनुक्रमिक काळाने माणूस मोठा होत जातो. म्हणजेच जगताना असे अनेक कठिण प्रसंग येतात आणि माणसाचे निसर्गाशी (Man vs Nature) असणारे हे द्वंद्व चालुच राहते. म्हणुन सृष्टीसोबत लढणे ही मोठी गोष्ट नाही तर वृत्ती बरोबर लढणे ही गोष्ट मोठी आहे, हे सत्य आहे. माणसाचे विचार, त्याचा विवेक किती विकसीत होत गेला हे मानसिक काळात गणले जाते. आज निसर्गाचे सर्व वैभव माझ्यासमोर आहे,अशा प्रसंगी मी काय स्विकारतो यावरुन मी यशस्वी ठरतो,भोग की भक्ती हा मुळ प्रश्न आहे.

आताच्या काळातील प्रसिध्द लेखक युवाल नोहा हरारी त्याच्या Artificial Inteligence चे फायदे व तोटे या विषयावरील एका भाषणात एक उदाहरण देतो की, समजा दोन लहान मुलांना चेंडू खेळताना भान राहिलं नाही आणि ते अचानक चेंडू मागे धावत रस्त्यावर येतात. समोरुन एक स्वयंचलित गाडी येत असते त्याचा ड्राईवर मागे शांत  झोपलेला असतो. जर गाडी बाजुच्या लेन मधे नेली तर समोरुन येणारा ट्रक धडकेल आणि गाडीच्या मालकाचा मृत्यु होईल. जर गाडी तशीच सरळ नेली तर मुलांचा मृत्यु होईल. तर अशा परिस्थीतीमध्ये या गाडीत कोणता अल्गोरिदम असावा? गाडीच्या मालकाचा जीव वाचेल असा की मुलांचा जीव वाचेल असा ?
तर एलोन मस्क हे आज उद्योग जगतातले प्रसिध्द नाव त्याने त्याच्या संशोधनात याचा विचार केला, त्याने 2015 साली एक मतचाचणी घेतली, निवडक लोकांना त्याने हाच प्रश्न म्हणजे कोणत्या प्रकारची गाडी बनवावी, जी गाडीच्या मालकाचा जीव वाचवेल अशी की मुलांचा जीव वाचवेल अशी? तर अनेकांनी मुलांना वाचवणारी गाडी बनवावी अशी उत्तर दिली. पण जेव्हा त्याने विचारल की खरच तुम्हाला ही गाडी विकत घ्यायची वेळ आली तर कोणती गाडी घ्याल तर बर्याच जणांचे उत्तर हे मालकाला वाचवणारी गाडी हवी असे होते.

बल्ट्रांड रसेल त्याच्या Impact of Science on Society या पुस्तकात म्हणतो की, We are in the middle of a race between skills as to means and human folly as to ends. मानवी कौशल्यातून उत्कर्षाची साधने निर्माण होतात आणि मानवी मूर्खपणा मानवाला उद्दीष्टांपासून दूर नेतो. रसेलच्या वेळी ही शर्यत मध्यावर होती, आज आपण खुप पुढे आलो आहोत. म्हणुनच विचार-भावना-कृती यांच्यातील हे अंतर दुर करण्यासाठी "समत्वयोग" साधत, अंतीम निकालाचा अट्टाहास न धरता, या शर्यतीमधुन आनंद, उत्साह मिळवण्याचा, जीवन जगण्याचा हेतु स्पष्ट समजण्याचा प्रयत्न करुया.

कॅरल ड्वेक म्हणते त्याप्रमाणे जीवन हे फिक्स्ड माइंडसेटकडून ग्रोथ माइंडसेटकडे जाण्याचा हा सगळा प्रवास आहे. आपण एक उदाहरण घेऊ. महाभारतात, कुरुक्षेत्रावर शूरवीर अर्जुनाने ऐन युद्धाच्या वेळी धनुष्यबाण खाली टाकून, रथामधून खाली उतरून सारथी असलेल्या श्रीकृष्णाला सांगितले की, ‘मी आता लढणार नाही. एक वेळ भीक मागेन, पण द्रोणाचार्य किंवा भीष्माचार्य यांच्यावर बाण चालवणार नाही.’

असे रणात बोलुनि शोकावेगात अर्जुन
धनुष्य-बाण टाकुनि रथी बैसुनि राहिला ll   (गीताई)

‘स्वजनांशी किंवा गुरूंशी लढणे हे पाप आहे’ असा त्याचा
फिक्स्ड माइंडसेट होता आणि तो प्रत्यक्ष श्रीकृष्णालाच पटवून देण्याचा प्रयत्न करत होता, तो बदलून ‘अन्यायाविरुद्ध लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे’ अशा ग्रोथ माइंडसेटपर्यंत त्याच्या मनाचा प्रवास झाला.

आपणही यातून बरेच काही शिकू शकतो,आपल्या ही रोजच्या जगण्यात अनेक विषाद  (Psychological Barriers) येत असतात. काही वैयक्तीक स्व-भावातील असतील, काही सामाजिक असतील. अशा अनेक समस्यांवर खुप सार्या तज्ञांनी संशोधन केले आहे, ते खुप रोमांचकारी आणि मजेशीर पण आहेत. त्यांच्या या संशोधनाच्या कथा तुमच्या पर्यंत पोहोचवाव्यात आणि सगळे मिळुन सर्वांच रोजच जगण सहज,सोप आणि आनंदी होण्यास मदत होईल असा प्रामाणिक प्रयत्न करुयात.

टीप -
1) यातील बरेचसे विचार हे संकलीत आहेत. लिहिण्याचा मुळ हेतु हाच की, आपण "सत+चित+आनंदस्वरुप" आहोत याच भान सतत रहावं.

- केदार मुत्तगी


संदर्भ ग्रंथ -
1) भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण "पातन्जल योगदर्शन" - कृष्णाजी केशव कोल्हटकर
2) मनात - अच्युत गोडबोले
3) विषादयोग - आनंद नाडकर्णी
4) मनकल्लोळ - अच्युत गोडबोले, निलांबरी जोशी
5) पांडूरंगशास्त्री आठवले यांचे वाङ्‌मय