Sunday, 25 March 2018

रामायण - राष्ट्रीय आणि मानव्य ध्येयदर्शन



Colombo to Almora  या व्याख्यानांमध्ये एके ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे ,
The whole western world is on a volcano which may burst tomorrow , go to pieces tomorrow. Europe the centre of manifestation of material energy , will crumble into dust if she is not mindful to change her position , to shift her ground and make spirituality the basis of her life .

अर्थातच यासाठी मार्गदर्शक आणि जगाच्या गुरुस्थानी भारत हे राष्ट्र आहे यात शंका नाही . पण आज वर्तमानात अशी धृष्टता जेव्हा आपण करतो तेव्हा मन शंकित होते कि आजचा भारत खरेच हि भूमिका सांभाळून आहे का ? सृष्टीच्या मूलतत्वांच्या अंतरंगातील शक्तिसामर्थ्य बाहेर खेचून काढणाऱ्या महान राष्ट्रांना आपल्या स्त्रियांचीहि अब्रू न वाचवू शकणारे , नागरिक जीवन वैराण झालेले , सत्तालोलूपतेसाठी मातृभूमीचे तुकडे करणारे , धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ढोंगी नि लांगुलचालन करणारे , चारित्र्याची मरुभूमी झालेले , हे वर्तमान भारत राष्ट्र विश्वाला काय देणार ? ज्यांच्या भृकुटीच्या तालावर आज संपूर्ण जग अवलंबून आहे त्या राष्ट्रांना आपण काय मार्ग दाखवणार ?

पण हि धृष्टता आपण करू शकतो कारण भारताच्या भूतकाळाच्या तिजोरीत आपल्याला उभा करणारा आणि जगाला मार्गदर्शन करणारा कौस्तुभमणी आहे तो म्हणजे श्रीराम - रामायण .

लोकशाहीने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य , त्यातून उद्भवलेली भांडवलशाही आणि प्रतिक्रिया म्हणून उभा झालेला साम्यवाद याने मानव्याचे आत्महनन केले आहे आणि प्रचंड नरसंहार देखील घडवून आणला आहे . धर्माच्या नावाखाली दहशतवाद अजून उरावर थयथय नाचतोय . यंत्रयुगाने आलेली निष्क्रियता आणि लोप पावलेली संवेदनशीलता यात माणूस हरवून गेला आहे . आज भौतिक शास्त्रे व त्यांचे शोध अतोनात वाढले आहेत .शास्त्रज्ञ ज्ञानाची अखंड उपासना करत आहेत . तरी देखील जगात सुखाचे नंदनवन उत्पन्न होण्याऐवजी पुढे काय होईल या कल्पनेने प्रत्येकाचे हृदय भीतीग्रस्त आहे . ज्ञानोपासनेतून भीती निर्माण व्हावी हे आश्चर्यच आहे , पण याचा अर्थ इतकाच होतो भौतिक ज्ञानाची उपासना मनुष्याच्या अंतःकरणातील आक्रमक पशुता नष्ट करू शकली नाही . उलट हि पशुताच मानवाला राबवत आहे .

मानवता आणि माणसातली पशुता यांच्यात अनादी काळापासून संघर्ष चालू आहे . या संघर्षाचे स्वरूप फक्त काळानुसार बदलत आहे . या संघर्षाचे मूळ कारण व्यक्तिवाद आणि अनिवार तृष्णा हीच आहेत . या संघर्षाचे स्वरूप कधी कामातून उत्पन्न झाले , तर कधी धर्म आणि संप्रदाय यातून झाले , कधी या संघर्षाने मालकीच्या भावनेचा परिवेष धारण केला . आज या संघर्षाने अर्थाचा (वित्त) परिवेष धारण केला आहे .

मानवतेसमोर आणि आपल्या राष्ट्रासमोर असलेल्या या अनेक बिकट प्रश्नांना उत्तर देण्याची दिव्य प्रतिभा वाल्मीकींच्या लेखणीत आहे . भस्मासुरासारख्या आत्मविनाशाच्या वणव्याच्या चटक्यांनी ज्या वेळी आपण जागृत होऊ त्यावेळी वाल्मीकींची दिव्य प्रतिभा हेच उत्तर असणार आहे .

भारताला जेव्हा जेव्हा परकीय आक्रमणाचा सामना करावा लागला तेव्हा द्रष्ट्या महापुरुषांनी रामायणचा आधार घेतला . यवन सत्तेच्या पादाक्रान्तानंतर जेव्हा हिंदू समाजाचे नि पर्यायाने या राष्ट्राचे नैतिक अध:पतन झाले तेव्हा एकनाथांनी भावार्थ रामायणाचा प्रचार केला आणि आत्मजागृती आणली . उत्तर भारतात तुलसीदासांनी रामचरितमानस च्या आधारे धर्म , तत्वज्ञान , नीतिमत्ता उभी केली . राष्ट्रीयत्व , धर्मप्रेम , स्वराज्याची प्रेरणा आणि ध्येयवाद उभा करण्यासाठी समर्थ रामदासांनी रामायणाचा आधार घेतला . ' धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियेले' हि धर्मप्रेरणा आणि ' समर्थाचिया सेवका वक्र पाहे , असा भूमंडळी कोण आहे ' हि निर्भयता रामायणाने उभी केली . वडीलभावाचे हक्काचे राज्य आहे म्हणून नाकारणारा , १४ वर्षे निर्जीव पादुकांची सेवा करणारा भरत या राष्ट्राचा आदर्श आहे म्हणूनच बादशाहाच्या कैदेत असलेल्या बालछत्रपतींचा सिंहासनावरील घटनात्मक हक्क मान्य करून गादीवर न बसणारे छत्रपती राजाराम महराष्ट्रात निर्माण झाले . 'मातृवत परदारेषु ' मानणाऱ्या श्रीरामांना आदर्श म्हणून समोर ठेवून आलेल्या शत्रूच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवणारे उपभोगशून्य राजा शिवाजी महाराज महाराष्ट्रात घडले .

आज जागतिकीकरणामुळे राष्ट्राच्या सीमा गळून पडत आहेत. दांभिक उदारमतवादाने राष्ट्रीय अस्मिता उखडवून लावली आहे . अर्थात विश्वातला मानव एकच आहे , भेद तर भारतीय संस्कृती मानत नाही , तरी देखील राष्ट्र म्हणून आपले अस्तित्व असेलच तर त्या उदारमतवादाला अर्थ उरतो अन्यथा आपण उद्या विश्वपटलावरून नाहीसे होऊ .

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।।

जननी आणि जन्मभूमी यांना स्वर्गापेक्षा प्रिय मानणारे श्रीराम हे राष्ट्रनिष्ठेचे आदर्श आहेत . सोन्याची लंका आणि सिद्धी पायावर लोळण घालत असताना राष्ट्रासाठी लाथाडणारे श्रीराम हे राष्ट्रभक्तांचे आदर्श आहेत . पण दुसऱ्या बाजूला अखिल मानवजात एक आहे आणि लंका देखील राष्ट्र आहे ,हा उदारमतवादी विचार संभ्रमित करतो. आज उदारमातवादाने निर्माण केलेली हीच समस्या आहे .अन्य राष्ट्र देखील त्यांच्या ध्येवादावर उभी आहेत . मग राष्ट्राराष्ट्रात भेद काय आणि राष्ट्र म्हणजे नेमके काय ?

न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति।।

यासारखी राष्ट्राची परिपूर्ण व्याख्या कुठेच नसणार . राम म्हणजेच राष्ट्र .जिथे राम नाही तिथे राष्ट्रच नाही , आणि जर राम वनवासात असतील तर ते जंगलच राष्ट्र आहे . जर सूक्ष्म दृष्टीने रामायण समजून घेतले तर श्रीरामांच्या वनवासाचे काव्य 'वंदे मातरम' आहे हे नक्कीच जाणवेल .

कवी रवींद्रनाथ टागोरांनी पाहिलेले स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यात ते म्हणतात ,Where the mind is without fear . निर्भयता हे प्रथम मानवी आणि राष्ट्रीय मूल्य आहे .श्रीरामांनी १४ वर्षाच्या वनवासात हाच कर्मयोग केला . 'स्व'त्व आणि सत्व हे व्यक्तिनिर्माणाचे धागे उचलून जंगलात राष्ट्रनिर्माण केले .'क्रियसिद्धि सत्वे भवति महतां नोपकरणे ' म्हणजे श्रीराम आणि रामराज्य .

Character crisis च्या आजच्या वर्तमान स्थितीत रामायण चरित्राचे आदर्श उभे करते . जेव्हा राम वनवासात निघुन गेले त्यानंतर आजोळहुन परत आलेला भरत अतिशय दुःखी होतो .श्रीरामांवर हां प्रसंग यावा या जाणिवेपेक्षा आपली आदर्शमूर्ति भग्न झाली की काय याचे त्याला अतीव दुःख होते .'तच्छुत्वा भरतस्त्रतो भ्रातुश्चारित्र्यशंकया' कारण रामराज्य अर्थात चारित्र्याची उपासना . लक्ष्मणाचे देदीप्यमान शील हां भारतीय संस्कृतीचा प्राण आहे .याचे मर्म ओळखूनच सुग्रीव तारेला म्हणतो ,'न ही स्त्रीषु महात्मान:क्वचित् कुर्वन्ति दारुणम्' . स्त्रियांच्या बाबतीत महानुभाव क्रूरता कधीच दाखवत नाहीत .

आज अगदी क्षुल्लक कारणांनी निराश होणारे आणि क्वचित्प्रसंगी आत्महत्येसारखे दुष्कृत्य करणारे यांना रामायण प्रेरणा देते . निराशा ,दुःख हे जीवनाचे भाग आहेत आणि त्याला कोणीच अपवाद नाहीत अगदी श्रीराम सुद्धा .सीतेचे अपहरण झाल्यानंतर श्रीराम देखील प्रचंड निराश होते पण त्यावेळी लक्ष्मणाने उच्चारलेला श्लोक हां आजदेखील तितकाच प्रेरक आहे .

उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम्।
सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम्॥

उत्साह हेच श्रेष्ठ व्यक्तींच बळ आहे ,उत्साहापेक्षा अन्य काहीच मोठ नाही.म्हणूनच उत्साहित व्यक्तीला काहीच अशक्य नाही .

कोणत्याही राष्ट्राची ताकद ही मजबूत कुटुंसंस्थेत असते .वनवासाच्या आज्ञेनंतर जेव्हा लक्ष्मण दशरथाला कैद करण्यास सांगतो , भरत , वसिष्ठ हे देखील श्रीरामांना परत अयोध्येस येण्याची विनंती करतात तेव्हा 'नास्ति शक्ति पितुर्वाक्य 'म्हणून आदर्श पुत्र श्रीराम हे कुटुंबसंस्थेचा पाया कसा असतो याचा आदर्श घालून देतात .

व्यक्ति आणि राष्ट्र यात जेव्हा संघर्ष निर्माण होईल तेव्हा प्रथम राष्ट्र टिकले पाहिजे हां आदर्श रामायणाने उभा केला .एका प्रसंगी ,कालशक्ति श्रीरामांच्या भेटिस आली आणि श्रीराम व कालशक्ति यांच्या भेटित तिसरा कोणी आल्यास वधाची शिक्षा असते .म्हणून लक्ष्मण पहारा देत उभा राहतो पण दुर्दैवाने दुर्वास ऋषि तिथे येतात आणि म्हणतात की ,

अस्मिन् क्षणे मां सौमित्रे रामाय प्रतिवेदय |
विषयं त्वां पूरा चैव शापिष्ये राघवं तथा।।

हे लक्ष्मणा , जर तू याच क्षणी मी आल्याचे रामाला सांगणार नाहीस तर हे संपूर्ण राष्ट्र भस्मसात करुन टाकेन .तेव्हा धर्मसंकटात सापडलेला लक्ष्मण हां विचार करतो की ,
'एकस्य मरणं मेस्तु मा भूत् सर्वविनाशनम' . एका व्यक्तीच्या प्राणासाठी राष्ट्र पणाला लावू शकत नाही .माझा वध होणे हे कधीही श्रेयस्कर !

राष्ट्राच्या उभारणीत सर्वात महत्वाचा घटक आहे राज्यघटना.घटना अर्थात आचारसंहिता जी राष्ट्राच् सार्वभौमत्व अबाधित ठेवेल .जिथे विवेकी आणि समजुतदार व्यक्ति आहेत तिथे घटनेची आवश्यकता काय उरते .प्रत्येक गोष्ट जिथे Do's आणि Dont's मध्ये सांगवी लागते तिथे जबाबदारीचे भान कमी असते . घटना अर्थात Instruction . रामराज्य उभे करणे अर्थात Instruction Level पासून Understanding Level पर्यंत पोहोचणे.म्हणून रामराज्याचे वर्णन करताना वाल्मीकि म्हणतात ,

न राज्यं न च राजासीत् न दण्डयो न च दाण्डिक: ।
धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम्।।

रामराज्याची स्वप्ने पाहणारे आपण आज एक ठरवू शकतो , आजपासून माझ्या जीवनात मला कमीत कमी Instruction मिळतील .कुटुंबात , समाजात, राष्ट्रीय जीवनात माझा समजुतदारपणा आणि विवेकीपणा वाढेल तेव्हा रामराज्य हे वास्तव असेल .

ताथाकथित पुरोगामित्वाच्या बुरसट संकल्पना रामायण घडले की नाही , राम होते की नाही, सेतु होता की नाही किंवा अन्य गोष्टींवर चर्चा करुन आपल्या आदर्शा बाबत शंका निर्माण करत आहेत .पण रामायण हे बाह्य परिक्षण करुन कधीच समजणार नाही. रामायण हा भारताचा घटनात्मक इतिहास नाही तर तो सांस्कृतिक इतिहास आहे .दुर्वासांच्या शापाने अयोध्या भस्म होते म्हणजे काय हा प्रश्न म्हणजे रामयाणाचे बाह्य परिक्षण आहे पण लक्ष्मणाने केलेली कृती समजून घेणे हे रामयणाच्या अन्तरंगाचे परिक्षण. रामराज्याचा आत्मा राम आणि त्यांचे चारित्र्य आहे. रामायणाचे चिंतन हे आपल्याला आत्मपरीक्षण करावयास भाग पाड़ते हीच रामायणाची महत्ता.

सत्ता,संपत्ति व सूख यांच्यावर फ़क्त स्वताचे प्रभुत्व ठेवण्यासाठी एकमेकांच्या मानगुटिवर बसणारे जग एकीकडे आणि केवळ अधिकाराच्या परिभाषेच्या नैतिक निर्बंधासाठी मी सत्ता , संपत्ति व सुखाचा स्वीकार करणार नाही म्हणून भांडणारे अद्भुत बंधू भारतच जगाला देऊ शकतो .

आज रामनवमीच्या पवित्र दिवशी गदिमांनी पाहिलेले आशास्वप्न हे आपले राष्ट्रीय ध्येय बनु शकते ,जो आपल्यातल्या रामाला आणि त्याच्या कर्तृत्वाला साद घालतो नि या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व टिकवु शकतो.

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे .

-- सागर मुत्तगी
( प्रेरणा -- पांडुरंगशास्त्री आठवले आणि बाळशास्त्री हरदास यांची वाल्मीकि रामायण वरील पुस्तके )

8 comments:

  1. धन्यवाद तुमच्या लेखनास... पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करवले.. रामो भुत्वा रामं यजेत,तेव्हाच ती रामनवमी.. तुमच्या लेखणीला पुन्हा एकदा नमस्कार..🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. प्रेरणादायी आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा लेख.
    सागर भाऊ,छान!

    ReplyDelete
  3. खूप छान .. चिंतनत्मक लिखाण आहे

    ReplyDelete
  4. मस्तच.. खूप सखोल विचार करून मार्मिक लिखाण केलं.आहे. रामायण एक व्यक्ती ते राष्ट्र....

    ReplyDelete
  5. Khup chan drafting ahe ...
    Vachun prerna milali

    ReplyDelete
  6. रामो राजमणी सदा विजयते
    रामं रमेशं भजे।

    ReplyDelete