" कधी होमाच्या विस्तीर्ण स्थंडिलात तर कधी वैश्वदेवाच्या वितीएवढया कुंडात पण अग्नीची आहुती टळली नाही, म्हणून तर अग्नि जिवंत राहिला. "
जीवनाचा अर्थ हा त्याला चिकटलेल्या ध्येयात आणि त्याकरिता ठरवलेल्या संकल्पात असतो. हे ध्येय आणि संकल्पपुर्तीचा ध्यास हीच जगण्याची स्वयंप्रेरणा असते.
जिथे ही प्रेरणा असते तिथे प्रतिभा, प्रगल्भता आणि प्रयोगशीलता स्फुरण पावतात.अशा जीवनाचा कोणीच पराभव करू शकत नाही , काळ देखील स्वतःच्या मर्यादा ओलांडून अशा जीवनांना अमर्याद करुन टाकतो.कोणतीच परिस्थिति अशा जीवनांना निराश करू शकत नाही कारण अशी जीवने प्रवाहपतित होत नाहीत तर प्रवाहावर स्वार होतात आणि स्वतः ठरवलेल्या मार्गाने घेऊन जातात . अशा जीवनाचे रोजचे अनुभव हे वेगळे असतात . चाकोरिबद्ध जगण इथे अमान्य असत . अहंकारशून्य ज्ञान ,उपभोगशून्य सामर्थ्य ,किर्तीशून्य प्रतिभा ,अपेक्षाशून्य कार्य अशा जीवनाची प्रेरणा, ही त्याच्या लोकोत्तर विवेकी जीवनध्येयात असते.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन अशा व्यापक जीवनध्येयाने भारावुन गेलेले होते. त्यांच्या लहानवयात प्रज्वलित झालेला अग्नि आज देखील अनेकांना प्रेरणा बनवून चेतवत आहे . 'तुजसाठी मरण ते जनन ,तुजविण जनन ते मरण ' हे जीवनध्येय राष्ट्राचे ध्येय बनले .
सावरकरांचा जन्म नाशिक मध्ये भगूर या गावी झाला .अगदी लहान वयात त्यांना पुस्तक ,वृत्तपत्रे यांचे वाचन ,चिंतन याची सवय जडली होती आणि ज्ञानसाधनेला सुरवात झाली होती.महाभारतातील श्रीकृष्णाची ओजस्वी भाषणे तर अगदी मुखोद्गत होती .संस्कृत महाकाव्य , इतिहास , इंग्रजी साहित्य ,योगशास्त्र , विविध धर्माचे धर्मग्रंथ आणि अजुन कितीतरी व्यासंग त्यांनी अगदी लहान वयात केला आणि त्यांच्या प्रतिभेची झलक दिसू लागली .एकदा अरबस्थानच्या इतिहासाचे पुस्तक त्यांच्या हाती आले. त्या पुस्तकाची सुरवातीची काही पाने गायब होती आणि मिळण्याची शक्यता नव्हती. सावरकरांची जिज्ञासा त्यांना चेतवित होती आणि त्यांचे कुतूहल त्यांना शांत बसवत नव्हते. इथे निराश न होता सुरवात झाली ती चिंतानाला की काय असेल त्या हरवलेल्या पानांमध्ये ? हां चिंतानाचा प्रवास त्यांना सृष्टीच्या प्रारंभी काय असेल या प्रश्नापर्यंत घेऊन आला .पुढे जाऊन एका कवितेत ' विश्वाच्या इतिहासाची पहिली पाने सापडणे अशक्य आहे , हां इतिहासाला मिळालेला शाप आहे हां निष्कर्ष त्यांनी काढला .'
इतिहासाचे पहिले पान न मिळणे कधी पाहायाते।
आरंभ तुझा दुसऱ्या पानापासुनि शाप हां याते।।
ही आहे सावरकरांच्या बुद्धीची प्रतिभा.
हे ज्ञानार्जन करत असताना ते कशासाठी याचा उद्देश अगदी स्पष्ट होता .
'गुणसुमने मी वेचियलि या भावे की तिने सुगंधा घ्यावे. ' ज्याचा उपयोग राष्ट्रासाठी होऊ शकत नाही ती विद्या व्यर्थ आणि भाररूप आहे अशी परखड़ स्पष्टता स्वतःच्या जीवनध्येयाबद्दल सावरकरांची होती .
'जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा , हा व्यर्थ भार विद्येचा'
सावरकरांचा अभ्यास आणि साहित्य क्षेत्रातील मुक्त संचार पाहता कोणालाही वाटेल की हे ज़ीवन साहित्यक्षेत्रातील अद्वितीय व्यक्तिमत्व आहे पण हां सावरकरांच्या जीवनाचा एक पैलू आहे ,एकमेव नाही. 'नुसते ज्ञान लंगड़े तर नुसते कर्म आंधळे' म्हणणारे सावरकर कृती आणि विचारांची ध्वजा घेऊन निघालेले कृतिवीर आणि विचारवीर होते.
सावरकरांच्या मते " खरा शिक्षित तोच जो लोकांच्या दुःखाने कळवळून त्यांचे सुखासाठी स्वताच्या यातनांना क:पदार्थ मानतो. नुसत वाचून साचत जात ते ज्ञान,फलहीन वृक्षाप्रमाणे किंवा ज्याच्या पाण्याने हजारो नसों ,पण एका अर्ध्या तृषिताचीही तृष्णा भागत नाही वा अन्नोत्पादनाने भूक शमविली जात नाही त्या जलाशयाच्या संग्रहाप्रमाणे केवळ वांझच नव्हे काय ?"
"आज जर ह्या देशाचे कशावाचुन अडले असेल तर ते कार्यक्रमावाचून नव्हे तर कार्यावाचून होय.वाचिवीरांचा शुष्क काथ्याकूट सोडून देऊन कृतिशुर व्हा." हे सावकरांचे आव्हान ही काळाची साद आहे .
जहालमतवादि विचारांचे म्हणून सावरकरांची नेहमीच उपेक्षा होत राहिली आणि आजही होत आहे .आत्यंतिक अहिंसेने आपला राष्ट्रीय तेजोभंग झाला तेव्हा सावरकरांनी हिंदू धर्माचे विवेकी स्वरूप मांडले आणि राष्ट्रीय जीवनात हिंसा-अहिंसेचा विवेक उभा केला .
"हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो "
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात क्वेकर पंथावर टिका करताना थॉमस पेन देखील अशाच विवेकी विचारांचा उदगार केला होता."क्वेकरचे एवढे तत्व मी मान्य करतो , शस्त्र बाजूला ठेवून सारे प्रश्न केवळ वाटाघाटीने सोडवावेत ,या तत्वाच्या बाबतीत मी साऱ्या जगाशी सहमत आहे.पण सारे जग हे तत्व मानित नसेल तर ? तर मात्र मी माझी बंदूक उचलतो आणि माझ्या हाती बंदूक दिली आहे म्हणून देवाचे आभार मानतो.देवदुतांनी भरलेल्या जगात आम्ही राहत नाही.सैतानाचे साम्राज्य अजुन संपुष्टात आलेले नाही आणि काही चमत्कार घडून आमचे रक्षण होईल ही अपेक्षा बाळगता येत नाही."
' जो बलवंत तोच उरतो जिवंत ' अजुन तरी हाच जगाचा नियम आहे .
" चिमण्यांनी "आम्ही तटस्थ आहोत " अशी घोषणा केली , तरी ससाणे त्यांच्यावर झेप घालण्याचे थोडेच सोडणार आहेत ? " हां सावरकरांचा रोखठोक सवाल होता, तत्कालीन षंढ बनवु पाहणाऱ्या विचारसरणीला .
'धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर' यामागच द्रष्टेपण ज्याचे डोळे उघडे आहेत आणि बुद्धि जागृत आहे त्याला समजेल.सावरकर म्हणायचे , "'धर्मांतर' ही समस्या कितीही 'धार्मिक' वाटत असली तरीही ती 'राजकीय' आहे .. आणि 'पाकिस्तान' ही समस्या कितीही 'राजकीय' वाटत असली तरीही ती पूर्ण 'धार्मिक' समस्या आहे ." दुर्दैवाने सावरकरांच हे द्रष्टेपण प्रतिदिनी प्रत्यहि येत आहे आणि pseuodo secular लोकांचे झापड़े अजुन उघड़त नाही.
कोणत्याही प्रतिभाशाली व्यक्तिची खरी ओढ़ ही सृजनशील कार्य करण्याकडे असते .एकदा सावरकरांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते रा.स.भट यांनी सावरकरांच्या जीवनावर ठाण्यात व्याख्यान दिले.व्याख्यान संपल्यावर स्वत: सावरकरांनी त्यांना बोलावले व म्हटले ,"तुम्ही माझ्यावर व्याख्यानमाला दिली.मी यूरोपात बॉम्ब ,पिस्तुले जमविली हे व्याख्यानात सांगितले ,की माझे रत्नागिरितील काम सांगितले ? रत्नागिरितील माझे काम हे माझे खरे काम आहे."
"मी सागरात टाकलेली उडी विसरलात तरी चालेल पण माझे सामजिक विचार विसरु नका."
ज्यांना सावरकर हे नाव उच्चारताच बॉम्ब आणि पिस्तूल धरलेले जहाल क्रांतिकारी दिसतात त्यांनी कधी हातात खडू घेऊन साक्षरता वर्ग घेणारे ,लेखणीने अस्मिता उभे करणारे ,पूर्वास्पृश्य वस्तीत जाताना आपल्या हातात सर्वांना बसण्यासाठी सतरंजी घेऊन जाणारे सावरकर ,कधी स्वदेशी मालाची हातगाड़ी घेऊन जाणारे सावरकर अनुभवावेत. पतितपावन मंदिरात भंगी कडून पूजा करुन घेणारे,सर्वसहभोजन घडवून आणणारे,हळदी कुंकु समारंभ सारख्या कार्यक्रमातून अस्पृश्यता मिटवणारे,सप्तबंदी उठवणारे सावरकर, भाषाशुद्धिचा आग्रह धरणारे आणि त्यात अमूल्य योगदान देणारे सावरकर आज ही इतके परिचयाचे नाहीत.
महिन्यातून दोन एकादश्या व अन्य सण ह्या दिवशी गावातील सर्व हिंदु एकत्र करावा, सामुदायिक प्रार्थना अर्धा तास का होईना करण्याची चाल पाडावी, स्वसंरक्षणाच्या उद्देशाने व्यायामशाळा काढावी ,हिंदुसंघटनेचे वाङ्गमय असणारे मुक्तद्वार वाचनालय चालवावे ,निदान तीन चार निराधार हिंदु ठेवता येतील अशी सोय असावी असा सहजशक्य उपक्रमाचा आग्रह धरणारे सावरकर होते.उत्सवाचे रूपांतर चेतनेत झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह असत .वाचाळ कार्यक्रमांचा सावरकरांनी सदैव निषेध केला.
सावरकरांच्या मागे अनुयायी उभे झाले नाहीत असा एक आक्षेप केला जातो तो मुळातच चुकीचा आहे .सावरकर चरित्र अभ्यासताना लक्षात येत की त्यांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ति ही त्यांची अनुयायी नाही तर प्रतिसावरकर बनली होती. सेनापति बापट, मदनलाल धिंग्रा,स्वातंत्र्यकवी गोविंद,पं श्यामजी कृष्ण वर्मा,वीरेन्द्रनाथ चटोपाध्याय,निरंजन पाल,हरनामसिंग,अनंत कान्हेरे , मादाम कामा अशी एक ना अनेक नावे आहेत जे सावरकरांच्या सहवासात सिंह बनले.
गोविंद त्रिम्बक दरेकर (कवी गोविंद) हे अपंग आणि लौकिक दृष्टया कमी शिकलेले होते.कवी गोविंद यांच्या ठायी काव्यरचनेची देणगी होती परंतु शिक्षण इतके नसल्याने काव्यरचनेचे नियम ,व्याकरण याची माहिती नव्हती.सावरकरांनी स्वत: त्यांना शिक्षण दिले आणि स्वातंत्र आणि हौतात्म्य यांची प्रेरणा दिली. स्वातंत्र्य आणि आणि हौतात्म्य यावर स्फुरलेली अनेक क्रांतिगीते जी क्रान्तिकारकांची प्रेरणा बनली ती गीते सावरकर आणि कवी गोविंद यांची आहेत.
"मला संध्याकाळचे भय वाटत नाही कारण माझी दुपार व्यर्थ गेली नाही ." हे उच्चारण्यासाठी लागणारे प्रचंड धैर्य , ध्येयाची कटिबद्धता नि सतत कृतिशिलता याचे दर्शन म्हणजे सावरकर. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करुन आयुष्याच्या संध्याकाळी आपण हे म्हणु शकु का हा विचार केला पाहिजे आणि आयुष्याची दुपार ही रोज नवनव्या अनुभवांनी भरलेली असेल तर ती सार्थकी लागेल याचा विचार केला पाहिजे.
की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने।
आज एखादा संकल्प करुन त्यातले सातत्य न टिकवु शकणारे आपण .अशा वेळी सावरकर आशास्थान बनून उभे राहतात .'सहा सोनेरी पाने ' हां ग्रंथ उतारवायात सावरकरांनी लिहिला.अंदमानातील त्रासामुळे सावरकरांची पचनक्रिया अधुनमधुन बिघडे आणि पोटात अकस्मात् कळा येत. एकदा लेखनिकाला ग्रंथ सांगत सांगत असता त्यांच्या पोटात कळा येऊ लागल्या व् ते हाताने पोट घट्ट धरून बसले."तुम्हाला आज बरे नाही ,आता थांबू ,उद्या लिहु" असे लेखनिक म्हणाला तेव्हा,"आज एक तरी पान पुरे करू.प्रतिदिनी एक पान केले की वर्षाच्या शेवटी साडेतीनशे पानांचा ग्रंथ होतो." अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 450 पृष्ठांचे पुस्तक सावरकरांनी लिहून पूर्ण केले .आपण किमान वाचनाच्या बाबतीत हां आग्रह स्वत:ला ठेवू शकतो कारण आपल्याला सावरकरांपेक्षा अनुकूल परिस्थिति आहे हे निश्चित .आपण किती सुखी आणि अनुकूल परिस्थितीत आहोत हे जाणून घ्यायचे असेल तर किमान एकदा सावरकर चरित्र वाचलेच पाहिजे.
हिंदू संघटनेची आवश्यकता त्यांनी लहानपणीच ओळखली होती पण सावरकरांना त्यांच्या मागे मेंढ्याचा कळप उभा करायचा नव्हता तर शुरांचे संघटन उभे करायचे होते . भावी पिढ्यांना ते म्हणत," आपल्याही पेक्षा अधिक योग्यतेचे वीर स्पार्टात आहेत असे आपल्या थड़ग्यावर लिहून ठेवावयास सांगणाऱ्या स्पार्टातील वीराप्रमाणे मीही म्हणतो की आमच्या तरुणांनी माझे गुणगान करीत न बसता माझ्यापेक्षा अधिक पराक्रम करुन माझ्यापेक्षा अधिक मोठे व्हावे आणि त्यांच्या अतुल पराक्रमामुळे माझे नाव मागे पडावे अशीच माझी इच्छा आहे ."
दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर थोड़ेही चित्त विचलित न होता सावरकरांनी आपल्या सहकार्यांसोबत जो संदेश पाठवला तोच आज आपण आपल्या परिप्रेक्षात अनुसरु हेच त्यांना विनम्र अभिवादन .
सारथी जिचा अभिमानी।कृष्णजी आणि राम सेनानी।।
अशी तीस कोटि तव सेना।
ती आम्हाविना थांबेना ।
परी करुनि दुष्ट-दलदलना ।
रोविलीचि स्वकरी। स्वातंत्र्याचा हिमालयावरी झेंडा जरतारी।।
मानुनि घे साची।अल्पस्वल्प ही सेवा अपुल्या अर्भक बालांची।
ऋण हे बहु झाले।तुझ्या स्तनीचे स्तन्य पाजुनि धन्य आम्हा केले।जननि गे धन्य आम्हा केले।।
-- सागर मुत्तगी
( संदर्भ साहित्य - सावरकर वाङ्गमय ,
स्वातंत्र्यवीर सावरकर - धनंजय कीर,
मला उमजलेले स्वातंत्र्यवीर सावरकर - डॉ.अरविंद गोडबोले)