Sunday, 25 March 2018

रामायण - राष्ट्रीय आणि मानव्य ध्येयदर्शन



Colombo to Almora  या व्याख्यानांमध्ये एके ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे ,
The whole western world is on a volcano which may burst tomorrow , go to pieces tomorrow. Europe the centre of manifestation of material energy , will crumble into dust if she is not mindful to change her position , to shift her ground and make spirituality the basis of her life .

अर्थातच यासाठी मार्गदर्शक आणि जगाच्या गुरुस्थानी भारत हे राष्ट्र आहे यात शंका नाही . पण आज वर्तमानात अशी धृष्टता जेव्हा आपण करतो तेव्हा मन शंकित होते कि आजचा भारत खरेच हि भूमिका सांभाळून आहे का ? सृष्टीच्या मूलतत्वांच्या अंतरंगातील शक्तिसामर्थ्य बाहेर खेचून काढणाऱ्या महान राष्ट्रांना आपल्या स्त्रियांचीहि अब्रू न वाचवू शकणारे , नागरिक जीवन वैराण झालेले , सत्तालोलूपतेसाठी मातृभूमीचे तुकडे करणारे , धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ढोंगी नि लांगुलचालन करणारे , चारित्र्याची मरुभूमी झालेले , हे वर्तमान भारत राष्ट्र विश्वाला काय देणार ? ज्यांच्या भृकुटीच्या तालावर आज संपूर्ण जग अवलंबून आहे त्या राष्ट्रांना आपण काय मार्ग दाखवणार ?

पण हि धृष्टता आपण करू शकतो कारण भारताच्या भूतकाळाच्या तिजोरीत आपल्याला उभा करणारा आणि जगाला मार्गदर्शन करणारा कौस्तुभमणी आहे तो म्हणजे श्रीराम - रामायण .

लोकशाहीने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य , त्यातून उद्भवलेली भांडवलशाही आणि प्रतिक्रिया म्हणून उभा झालेला साम्यवाद याने मानव्याचे आत्महनन केले आहे आणि प्रचंड नरसंहार देखील घडवून आणला आहे . धर्माच्या नावाखाली दहशतवाद अजून उरावर थयथय नाचतोय . यंत्रयुगाने आलेली निष्क्रियता आणि लोप पावलेली संवेदनशीलता यात माणूस हरवून गेला आहे . आज भौतिक शास्त्रे व त्यांचे शोध अतोनात वाढले आहेत .शास्त्रज्ञ ज्ञानाची अखंड उपासना करत आहेत . तरी देखील जगात सुखाचे नंदनवन उत्पन्न होण्याऐवजी पुढे काय होईल या कल्पनेने प्रत्येकाचे हृदय भीतीग्रस्त आहे . ज्ञानोपासनेतून भीती निर्माण व्हावी हे आश्चर्यच आहे , पण याचा अर्थ इतकाच होतो भौतिक ज्ञानाची उपासना मनुष्याच्या अंतःकरणातील आक्रमक पशुता नष्ट करू शकली नाही . उलट हि पशुताच मानवाला राबवत आहे .

मानवता आणि माणसातली पशुता यांच्यात अनादी काळापासून संघर्ष चालू आहे . या संघर्षाचे स्वरूप फक्त काळानुसार बदलत आहे . या संघर्षाचे मूळ कारण व्यक्तिवाद आणि अनिवार तृष्णा हीच आहेत . या संघर्षाचे स्वरूप कधी कामातून उत्पन्न झाले , तर कधी धर्म आणि संप्रदाय यातून झाले , कधी या संघर्षाने मालकीच्या भावनेचा परिवेष धारण केला . आज या संघर्षाने अर्थाचा (वित्त) परिवेष धारण केला आहे .

मानवतेसमोर आणि आपल्या राष्ट्रासमोर असलेल्या या अनेक बिकट प्रश्नांना उत्तर देण्याची दिव्य प्रतिभा वाल्मीकींच्या लेखणीत आहे . भस्मासुरासारख्या आत्मविनाशाच्या वणव्याच्या चटक्यांनी ज्या वेळी आपण जागृत होऊ त्यावेळी वाल्मीकींची दिव्य प्रतिभा हेच उत्तर असणार आहे .

भारताला जेव्हा जेव्हा परकीय आक्रमणाचा सामना करावा लागला तेव्हा द्रष्ट्या महापुरुषांनी रामायणचा आधार घेतला . यवन सत्तेच्या पादाक्रान्तानंतर जेव्हा हिंदू समाजाचे नि पर्यायाने या राष्ट्राचे नैतिक अध:पतन झाले तेव्हा एकनाथांनी भावार्थ रामायणाचा प्रचार केला आणि आत्मजागृती आणली . उत्तर भारतात तुलसीदासांनी रामचरितमानस च्या आधारे धर्म , तत्वज्ञान , नीतिमत्ता उभी केली . राष्ट्रीयत्व , धर्मप्रेम , स्वराज्याची प्रेरणा आणि ध्येयवाद उभा करण्यासाठी समर्थ रामदासांनी रामायणाचा आधार घेतला . ' धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियेले' हि धर्मप्रेरणा आणि ' समर्थाचिया सेवका वक्र पाहे , असा भूमंडळी कोण आहे ' हि निर्भयता रामायणाने उभी केली . वडीलभावाचे हक्काचे राज्य आहे म्हणून नाकारणारा , १४ वर्षे निर्जीव पादुकांची सेवा करणारा भरत या राष्ट्राचा आदर्श आहे म्हणूनच बादशाहाच्या कैदेत असलेल्या बालछत्रपतींचा सिंहासनावरील घटनात्मक हक्क मान्य करून गादीवर न बसणारे छत्रपती राजाराम महराष्ट्रात निर्माण झाले . 'मातृवत परदारेषु ' मानणाऱ्या श्रीरामांना आदर्श म्हणून समोर ठेवून आलेल्या शत्रूच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवणारे उपभोगशून्य राजा शिवाजी महाराज महाराष्ट्रात घडले .

आज जागतिकीकरणामुळे राष्ट्राच्या सीमा गळून पडत आहेत. दांभिक उदारमतवादाने राष्ट्रीय अस्मिता उखडवून लावली आहे . अर्थात विश्वातला मानव एकच आहे , भेद तर भारतीय संस्कृती मानत नाही , तरी देखील राष्ट्र म्हणून आपले अस्तित्व असेलच तर त्या उदारमतवादाला अर्थ उरतो अन्यथा आपण उद्या विश्वपटलावरून नाहीसे होऊ .

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।।

जननी आणि जन्मभूमी यांना स्वर्गापेक्षा प्रिय मानणारे श्रीराम हे राष्ट्रनिष्ठेचे आदर्श आहेत . सोन्याची लंका आणि सिद्धी पायावर लोळण घालत असताना राष्ट्रासाठी लाथाडणारे श्रीराम हे राष्ट्रभक्तांचे आदर्श आहेत . पण दुसऱ्या बाजूला अखिल मानवजात एक आहे आणि लंका देखील राष्ट्र आहे ,हा उदारमतवादी विचार संभ्रमित करतो. आज उदारमातवादाने निर्माण केलेली हीच समस्या आहे .अन्य राष्ट्र देखील त्यांच्या ध्येवादावर उभी आहेत . मग राष्ट्राराष्ट्रात भेद काय आणि राष्ट्र म्हणजे नेमके काय ?

न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति।।

यासारखी राष्ट्राची परिपूर्ण व्याख्या कुठेच नसणार . राम म्हणजेच राष्ट्र .जिथे राम नाही तिथे राष्ट्रच नाही , आणि जर राम वनवासात असतील तर ते जंगलच राष्ट्र आहे . जर सूक्ष्म दृष्टीने रामायण समजून घेतले तर श्रीरामांच्या वनवासाचे काव्य 'वंदे मातरम' आहे हे नक्कीच जाणवेल .

कवी रवींद्रनाथ टागोरांनी पाहिलेले स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यात ते म्हणतात ,Where the mind is without fear . निर्भयता हे प्रथम मानवी आणि राष्ट्रीय मूल्य आहे .श्रीरामांनी १४ वर्षाच्या वनवासात हाच कर्मयोग केला . 'स्व'त्व आणि सत्व हे व्यक्तिनिर्माणाचे धागे उचलून जंगलात राष्ट्रनिर्माण केले .'क्रियसिद्धि सत्वे भवति महतां नोपकरणे ' म्हणजे श्रीराम आणि रामराज्य .

Character crisis च्या आजच्या वर्तमान स्थितीत रामायण चरित्राचे आदर्श उभे करते . जेव्हा राम वनवासात निघुन गेले त्यानंतर आजोळहुन परत आलेला भरत अतिशय दुःखी होतो .श्रीरामांवर हां प्रसंग यावा या जाणिवेपेक्षा आपली आदर्शमूर्ति भग्न झाली की काय याचे त्याला अतीव दुःख होते .'तच्छुत्वा भरतस्त्रतो भ्रातुश्चारित्र्यशंकया' कारण रामराज्य अर्थात चारित्र्याची उपासना . लक्ष्मणाचे देदीप्यमान शील हां भारतीय संस्कृतीचा प्राण आहे .याचे मर्म ओळखूनच सुग्रीव तारेला म्हणतो ,'न ही स्त्रीषु महात्मान:क्वचित् कुर्वन्ति दारुणम्' . स्त्रियांच्या बाबतीत महानुभाव क्रूरता कधीच दाखवत नाहीत .

आज अगदी क्षुल्लक कारणांनी निराश होणारे आणि क्वचित्प्रसंगी आत्महत्येसारखे दुष्कृत्य करणारे यांना रामायण प्रेरणा देते . निराशा ,दुःख हे जीवनाचे भाग आहेत आणि त्याला कोणीच अपवाद नाहीत अगदी श्रीराम सुद्धा .सीतेचे अपहरण झाल्यानंतर श्रीराम देखील प्रचंड निराश होते पण त्यावेळी लक्ष्मणाने उच्चारलेला श्लोक हां आजदेखील तितकाच प्रेरक आहे .

उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम्।
सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम्॥

उत्साह हेच श्रेष्ठ व्यक्तींच बळ आहे ,उत्साहापेक्षा अन्य काहीच मोठ नाही.म्हणूनच उत्साहित व्यक्तीला काहीच अशक्य नाही .

कोणत्याही राष्ट्राची ताकद ही मजबूत कुटुंसंस्थेत असते .वनवासाच्या आज्ञेनंतर जेव्हा लक्ष्मण दशरथाला कैद करण्यास सांगतो , भरत , वसिष्ठ हे देखील श्रीरामांना परत अयोध्येस येण्याची विनंती करतात तेव्हा 'नास्ति शक्ति पितुर्वाक्य 'म्हणून आदर्श पुत्र श्रीराम हे कुटुंबसंस्थेचा पाया कसा असतो याचा आदर्श घालून देतात .

व्यक्ति आणि राष्ट्र यात जेव्हा संघर्ष निर्माण होईल तेव्हा प्रथम राष्ट्र टिकले पाहिजे हां आदर्श रामायणाने उभा केला .एका प्रसंगी ,कालशक्ति श्रीरामांच्या भेटिस आली आणि श्रीराम व कालशक्ति यांच्या भेटित तिसरा कोणी आल्यास वधाची शिक्षा असते .म्हणून लक्ष्मण पहारा देत उभा राहतो पण दुर्दैवाने दुर्वास ऋषि तिथे येतात आणि म्हणतात की ,

अस्मिन् क्षणे मां सौमित्रे रामाय प्रतिवेदय |
विषयं त्वां पूरा चैव शापिष्ये राघवं तथा।।

हे लक्ष्मणा , जर तू याच क्षणी मी आल्याचे रामाला सांगणार नाहीस तर हे संपूर्ण राष्ट्र भस्मसात करुन टाकेन .तेव्हा धर्मसंकटात सापडलेला लक्ष्मण हां विचार करतो की ,
'एकस्य मरणं मेस्तु मा भूत् सर्वविनाशनम' . एका व्यक्तीच्या प्राणासाठी राष्ट्र पणाला लावू शकत नाही .माझा वध होणे हे कधीही श्रेयस्कर !

राष्ट्राच्या उभारणीत सर्वात महत्वाचा घटक आहे राज्यघटना.घटना अर्थात आचारसंहिता जी राष्ट्राच् सार्वभौमत्व अबाधित ठेवेल .जिथे विवेकी आणि समजुतदार व्यक्ति आहेत तिथे घटनेची आवश्यकता काय उरते .प्रत्येक गोष्ट जिथे Do's आणि Dont's मध्ये सांगवी लागते तिथे जबाबदारीचे भान कमी असते . घटना अर्थात Instruction . रामराज्य उभे करणे अर्थात Instruction Level पासून Understanding Level पर्यंत पोहोचणे.म्हणून रामराज्याचे वर्णन करताना वाल्मीकि म्हणतात ,

न राज्यं न च राजासीत् न दण्डयो न च दाण्डिक: ।
धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम्।।

रामराज्याची स्वप्ने पाहणारे आपण आज एक ठरवू शकतो , आजपासून माझ्या जीवनात मला कमीत कमी Instruction मिळतील .कुटुंबात , समाजात, राष्ट्रीय जीवनात माझा समजुतदारपणा आणि विवेकीपणा वाढेल तेव्हा रामराज्य हे वास्तव असेल .

ताथाकथित पुरोगामित्वाच्या बुरसट संकल्पना रामायण घडले की नाही , राम होते की नाही, सेतु होता की नाही किंवा अन्य गोष्टींवर चर्चा करुन आपल्या आदर्शा बाबत शंका निर्माण करत आहेत .पण रामायण हे बाह्य परिक्षण करुन कधीच समजणार नाही. रामायण हा भारताचा घटनात्मक इतिहास नाही तर तो सांस्कृतिक इतिहास आहे .दुर्वासांच्या शापाने अयोध्या भस्म होते म्हणजे काय हा प्रश्न म्हणजे रामयाणाचे बाह्य परिक्षण आहे पण लक्ष्मणाने केलेली कृती समजून घेणे हे रामयणाच्या अन्तरंगाचे परिक्षण. रामराज्याचा आत्मा राम आणि त्यांचे चारित्र्य आहे. रामायणाचे चिंतन हे आपल्याला आत्मपरीक्षण करावयास भाग पाड़ते हीच रामायणाची महत्ता.

सत्ता,संपत्ति व सूख यांच्यावर फ़क्त स्वताचे प्रभुत्व ठेवण्यासाठी एकमेकांच्या मानगुटिवर बसणारे जग एकीकडे आणि केवळ अधिकाराच्या परिभाषेच्या नैतिक निर्बंधासाठी मी सत्ता , संपत्ति व सुखाचा स्वीकार करणार नाही म्हणून भांडणारे अद्भुत बंधू भारतच जगाला देऊ शकतो .

आज रामनवमीच्या पवित्र दिवशी गदिमांनी पाहिलेले आशास्वप्न हे आपले राष्ट्रीय ध्येय बनु शकते ,जो आपल्यातल्या रामाला आणि त्याच्या कर्तृत्वाला साद घालतो नि या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व टिकवु शकतो.

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे .

-- सागर मुत्तगी
( प्रेरणा -- पांडुरंगशास्त्री आठवले आणि बाळशास्त्री हरदास यांची वाल्मीकि रामायण वरील पुस्तके )

Tuesday, 30 January 2018

तृप्तीची तिर्थोदके


The Infinite Energy which streams forth from the Eternal and sets the wheel to work, looms up in the vision of man in various aspects and infinite forms. Each aspect creates and marks an age. Sometimes She is Love, sometimes She is Knowledge, sometimes She is Renunciation, sometimes She is Pity. This Infinite Energy is Bhawani. She also is Durga, She is Kali, She is Radha the Beloved, She is Lakshmi. She is our Mother and the Creatress of us all.

-- Yogi Arvindo

योगी अरविंदो यांनी पाहिलेले भारताचे स्वरुप हे स्त्री तत्वात आहे .तिच्यातून आपण निर्माण होतो म्हणून आपण या भारतमातेची लेकरे . पण ही भारतमाता अव्यक्त आहे .तिचा आविष्कार बनून कधी सीता येते तर कधी त्यागमुर्ति मैत्रयी आणि असे असंख्य.भारतीय स्त्री याच भारतमातेचा सूक्ष्म आविष्कार असते.

काही फुले इतकी नाजुक असतात की त्यांना स्पर्श करण्याने ती आपल्या स्पर्शाने कोमेजतील का ही भीति वाटते .

स्वच्छ , नितळ पाण्याची सुंदरता ही त्याची स्वच्छता पाहण्यातच आहे ,आपला स्पर्श कदाचित त्या स्वच्छतेला , सौंदर्याला धक्का देऊ शकतो .

पण , सुधासोदर्यं ते सलिलमशिवं न:शमयतु
ते सौंदर्य अनुभवण्याने आपण स्वच्छ होत असतो आणि असे आपण स्वच्छ होणे यालाच ते पाणी स्वतः च्या जीवनाची धन्यता मानत असते .

असंख्य वासना आणि विकारांनी ग्रस्त मनाला हवा असतो तो पावित्र्याचा अनुभव जो मनातला क्षोभ नाहिसा करेल आणि विवेकदीप प्रज्वलित करेल .

विवेकाच्या चित्ती नित स्फुरत जो मोद सुभगे
असे तोची तू गे असशि धन तू पुण्य कृतिचे
क्षणार्धी नेई गे कुमति विलयासी जल तुझे
मनीच्या क्षोभाला तव तनुलता स्पर्श करु दे

म्हणूनच तीचे विभूतिमत्व "स्त्रोतसामस्मि जाह्नवी" हे  माझे ऐश्वर्य आहे  असे सांगताना भगवंत देखील भरून पावतात.

मानवी जीवनाचा प्रवास हा अखंड आणि अतूट आहे. जीवनातील संगीत आणि मृत्युतील काव्य ज्याला समजले मग तिथे निराशेला थारा उरत नाही .
प्रसन्नता हे त्यांचे जीवनदर्शन बनते नि पावित्र्यता हा आपला अनुभव .
इथे चिंता निघुन जातात आणि चिंतन सुरु होते.
समर्पण हे अशा जीवनाचे सौंदर्य असते .
त्यांचे दर्शन हां पावित्र्याचा अनुभव असतो आणि स्मरण हे तृप्तिचे निधान असते.

खवळलेल्या तूफानी सागराची ही तटबंदी असते . या किनारी असलेली नीरव शांतता देखील आपल्याला खुप काही शिकवून जाते ,आत्मपरिक्षणास भाग पाड़ते .
सतत निःस्वार्थ प्रवाहशीलता हे अशा जान्हवीच्या निर्मलतेचे रहस्य आहे ,तिच्या प्रवाहाला शिस्तीचे कठोर काठ असतात म्हणूनच या निर्मलतेत सृजनाची सुप्त बीजे असतात.

अस्तित्वाच्या संघर्षात जग वाटचाल करत असताना तिने अस्तित्वशून्य होण्याचा प्रयास करणे हे विस्मयकारक आहे पण हीच तिची तपश्चर्या असते म्हणूनच आज त्या साधनभक्तीचे आदर्श बनून उभे राहतात आणि कृतिमधल्या आनंदाचे गमक हळूच पण नकळत सांगून जातात .


सहजीवन ही स्त्री मनाची खुप मोठी मूक मागणी आहेच . "पत्यर्नो यज्ञसंयोगे" हा पत्नीधर्म भारतीय स्त्रीचे आदर्श आहे .
वनवासाला पतिसोबत जाणाऱ्या सितेचा "जेथे राघव तेथे सीता " हां हट्ट समर्पण आणि सहजीवनाचे आदर्श घडवून देतो.
त्याच वेळेला वनवासात न जाऊ शकणाऱ्या उर्मिलेचे समर्पण ही तितकेच आदर्श आहे, यात सहजीवनाचा विरह आहे पण त्यागाचे सामर्थ्य देखील आहे.
स्त्री म्हणून झांटिपि होण्याचा अधिकार प्रत्येक स्त्री ला आहेच आणि तो कोणीच नाकारु शकत नाही पण इथला सॉक्रेटीस हा अत्रि कुलोत्पन्न आहे हे समजून अनुसया होण्याचे माधुर्य यात भारतीय स्त्री जीवनाचे आदर्श आणि अखिल स्त्री जातीचा स्त्री असण्याचा अर्थ सामावला आहे .

आज सहजीवन याचा अर्थ सोबत असणे इतकाच आहे कारण ते दोन स्वतंत्र अस्तित्व समजून राहत असतात ज्यात एकमेकांचा विचार ,एकमेकांबद्दल प्रेम , काळजी आणि आपुलकी आहेच पण इथे विरहाचे भय सतत असतेच.
परंतु मानसिक साहचर्य आणि बौद्धिकतेच्या जोरावर अद्वैत साधुन अस्तित्वच विलीन करणे हे खुप मोठे साहस आहे आणि ते देखील जेव्हा दोन असे जीव एकत्र येतात ज्यांची स्वताच्या बुद्धिप्रतिभेने जगाला दीपवून टाकण्याचे सामर्थ्य आहे तरीदेखिल समर्पितता आणि अखंड विलिनत्व म्हणजे अलौकिकत्वच ! इथे आपण नतमस्तक होण्यातच आपली कृतार्थता असते .

"I believe in standardizing automobiles, not human beings."  असे म्हणून 20 व्या शतकातला बुद्धिमान Einstein देखील मानवी जीवनाच्या परिवर्तनबद्दल स्वतची मर्यादा जाहिर करतो . पण हेच आव्हान स्वीकारुन माणूस देखील सतत विचारांचे सिंचन केले तर बदलू शकतो अशा दुर्दम्य आशेवर कार्य करणाऱ्या व्यक्तीचा संसाराचा व्याप आणि पसारा मोठा असतो पण हे आव्हान आपल्या खांद्यावर उचलण्याचे सामर्थ्य त्या बाळगुन असतात .

अशी जीवने तीर्थ बनतात .. तृप्तीची तिर्थोदके ...

सौ. निर्मलाताई पांडुरंगशास्त्री आठवले हे एक असेच स्थान ,तृप्तीचे तिर्थोदक.

यांच्या जीवनातील विशेष म्हणजे काय ते कोणालाच सांगता येत नाही हेच त्यांचे विशेषत्व. तरीदेखील ज्यांनी एक अग्नी (पांडुरंगशास्त्री आठवले - स्वाध्याय परिवाराचे दादा ) सोबत राहण्याच् दिव्य केल आणि आदरणीय दीदीजी ना घडवल यावरून आपण त्यांच्या जीवनाची खोली समजू शकतो. दादांच्या सोबत ज्या बौद्धिक चर्चा करू शकत होत्या , सावरकरांसारखे बुद्धिवादी ज्यांचे आदर्श होते या अगदी छोट्या प्रसंगातुन त्यांचे स्वतंत्र बुद्धि प्रतिभेचे दर्शन होते .

अयाचक व्रत घेऊन जीवन जगणाऱ्या दादांसोबत वयाच्या 19- 20 व्या वर्षी जेव्हा विवाह झाला तेव्हापासून जीवनाचा प्रत्येक श्वास म्हणजे असिधारा व्रत. स्वातंत्रयापूर्वीचा काही वर्षे पूर्व जेव्हा विवाह झाला त्यानंतर तरुण वयात दादांच्या विचारांचे तूफ़ान ,अनेक आर्थिक संकट आली असतील पण अयाचक व्रताचे कठोर पालन ,  विश्वतत्त्वज्ञान परिषदेत मिळालेला गौरव पण नाकरलेली ऑफर ,तत्त्वज्ञान विद्यापीठाची उभारणी आणि त्याची आतापर्यंतचि  सर्व जडणघड़ण यात ताईजींनी कुठेच न जाणवू देता केलेले संस्कार आणि निर्व्याज प्रेम हे शब्दातीत आहे.

ताईजींच्या "जेव्हाच् तेव्हा आणि जिथल्या तिथे " याचे शिस्तपालन , स्वच्छता , बुद्धिनिष्ठा ,समर्पण वृत्ती ,त्याग यामध्ये स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्याचे गमक आहे.

दादाजी आणि ताईजी यांच्या जीवनाचे अद्वैत म्हणजे ,

रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्यै नमो नम:।
रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्यै नमो नमः।
रुद्रो विष्णु उमा लक्ष्मी तस्मै तस्यै नमो नमः।

रूद्र सूर्य आहे आणि उमा त्याची प्रभा आहे ,रूद्र फूल आहे आणि उमा त्याचा सुगंध आहे ,रूद्र यज्ञ आहे आणि उमा त्याची वेदी आहे .

बा.भ.बोरकर यांच्या खालील ओळींचा शोध ताईजीं मध्ये पूर्ण होतो.

जीवन त्यांना कळले हो ..
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो..

याच बोरकरांनी अशा अव्यक्त जीवन जगलेल्या देखण्या जीवनांचे वर्णन सुंदर शब्दात केले आहे .

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा
वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

अशा पूजनीय ताईजींना कोटि कोटि वंदन !!!

सदाचाराचा तू कणखरचि पाया मज गमे
असे तू हर्षाचा नित नवनवोन्मेष मनि गे
असे तूची पुण्यस्थल-प्रमुख गंगेच जगती
गमे त्रैलोक्याचे वसन जणु तू निर्मल अती ।।

-- सागर मुत्तगी

Friday, 12 January 2018

भारत वीर नरेन्द्रं त्वं वंदे सिंह निनादम्


एतद्देश प्रसूतस्य सकशादाग्रजन्माना ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन पृथ्वियां सर्व मानवः।।

या भारतीय स्वप्नाचे साकार रूप म्हणजे स्वामी विवेकानंद .एक संन्यासी पण प्रखर राष्ट्रभक्त जो भारतातील सर्व क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान बनला.स्वामी विवेकानंद नेहमी सांगत विचारांचा प्रभाव हा फक्त 25% पडतो, पण असे जीवन जिथे विचार आणि आचार यामध्ये एकवाक्यता आहे तिथे चारित्र्य निर्माण होते आणि भारतीय संस्कृती इथे आग्रही आहे आणि त्याचे धवल चारित्र्याचे मूर्त स्वरुप हे विवेकानंद स्वतः होते. त्याग आणि सेवा या शब्दांचा अर्थ म्हणजे स्वामी विवेकानंदांचे जीवन .

Be and Make या संदेशातून त्यांनी संपूर्ण भारतीय संस्कृतीचे सारच सांगितले आहे .आज विवेकानंद यांची ओळख फ़क्त sisters and brothers of America असे शिकागों धर्मपरिषदेत बोललेले इतकीच् आहे हेच आपले दुर्दैव. पण विवेकानंद म्हणजे फ़क्त त्यांचे विचार नाही तर त्यांचे जीवन हाच त्यांचा विचार .शिकागो धर्मपरिषदेच्या अगोदर थंडीत कुड़कुडत रात्र घालवणारे , कोणाचीच विशेष ओळख नाही , खिशातली दमड़ी देखील संपलेला एक कंगाल भारतीय .त्यांच्या वेशाकडे बघुन अमेरीकी लोक हसत होते पण त्यांना काय माहीत , character म्हणजेच personality .

शिकागो चे त्यांचे व्याख्यान अर्थात त्यांच्या जीवनातला रोमांचकारी प्रसंग जसे शिवाजी महाराजांच्या जीवनात अफज़लखान वधाचा प्रसंग.असे प्रसंग व्यक्तीला समाजात एक अलौकिक  स्थान मिळवून देतात कारण समाजाला नेहमीच अशा नाट्यमय घटनांची आवड असते .पण फ़क्त या घटना म्हणजे त्यांचे जीवन नसते .अर्थात त्या व्याख्यानाने स्वामीजींना प्रसिद्धि मिळवून दिली. अमेरिकी माध्यमाने A  Cyclonic Hindu अशी स्वामीजींची ओळख करून दिली .दोन दिवस अगोदर कंगाल असणारा हा संन्याशी आता अमेरिका आणि भारत असा सगळीकड़े प्रसिद्ध झाला होता .

पण विवेकानंदांचे खरे जीवन दर्शन इथून पुढे सुरु होते .कीर्ति आणि प्रसिद्धीच्या टोकावर एका दिवसात पोहोचलेला परिव्राजक नरेंद्र बळी पडला नाही म्हणूनच ते स्वामी विवेकानंद होऊ शकले .त्या रात्री विवेकानंदांना राहण्याची उत्तम सोय करण्यात आली .विवेकानंदांना आरामदायी , आनंददायीं वाटावे यासाठी आवश्यक ती सोय यजमानाने केली होती .भौतिक सूखे पायाशी लोळण् घालून उभी होती पण त्याच क्षणी स्वामीजींचे हृदय भारतासाठी पिळवटुन निघत होते .आरामशीर गाद्या आणि पलंगावर स्वामी झोपु शकले नाहीत .जमिनीवर पड़ल्यापडल्या ते अगदी लहान मुलागत रडू लागले .भारतातल्या परिस्थितिने अश्रुची धार थांबत नव्हती आणि स्वामीजी प्रार्थना करू लागले ,"हे माते , माझा देश घोर दारिद्रयात रुतला असताना कोण प्रसिद्धीची पर्वा करतो ! आम्ही भारतीय इतके दुःखी , कष्टी व् दरिद्री आहोत की आमच्यापैकी लक्षावधी लोक मुठभर अन्नासाठी मृत्युमुखी पडतात .याउलट येथे लोक व्यक्तिगत सुखासाठी वारेमाप उधळपट्टी करतात .कोण या भारतीयांना आधार देईल ? अन्न देईल ? मला सांग आई , मी त्यांची कशी सेवा करू शकेन ? त्यांच्या कसा उपयोगी पडु शकेन ?"
हे धगधगते प्रेम म्हणजे स्वामी विवेकानंद .

विवेकानंद जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांनी इथली धूळ मस्तकावर घेतली आणि म्हणाले Now the very dust of India is also holy to me. कदाचित आज परदेशवारी करून आल्यावर प्रथम इथल्या भूमिवर थुंकणारा आणि परदेशाचे गुणगान गाणारा आजचा तथाकथित भारतीय ही राष्ट्रीयता समजू शकणार नाही .Islamic body with Vedantic Brains ही हिंदुंचि सर्वसमावेशकता आजच्या Pseudo Secular लोकांना देखील समजणार नाही .

विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून साजरा केला जातोय त्यासाठी युवावस्था समजून घेतली पाहिजे .

जबसे सुना है मरने का नाम जिंदगी है सर पे कफन बांधे कातिल को ढुंढते है  .ज्यांना मृत्युत हि जीवनाचे दर्शन होते तेच जीवन . जन्म आणि मरण या अटळ गोष्टीत युवावृत्ती जोपासणे म्हणजेच  जगणे . पण आहे काय हे यौवनाचे सुवर्णमौक्तिक रसायन ? कि जे न पचल्यानेच आज आपले राष्ट्रीय जीवन भरकटले आहे . आणि जे पचले तर राष्ट्र हे उन्नतीच्या शिखरावर पोहोचणे हे स्वप्न राहणार नाही तर ते वास्तव बनेल.

If you could influence the young it would  turn earth into heaven - Katharine T.Hinkson

अर्थात हेच गमक स्वामी विवेकानंदानी ओळखल आणि युवकांना प्रेरित केल .
मानवी जीवनाचा वसंतकाळ म्हणजे यौवन. उज्ज्वल प्रभात ची शोभा , शरदचंद्राचे माधुर्य , ग्रीष्माच्या मध्यान्हातला प्रखर ताप , भाद्रपदाच्या अमावास्येच्या अर्धरात्रीची भीषणता म्हणजे यौवनकाळ.

यौवन म्हणजे शस्यश्यामला वसुन्धरेचा आविष्कार पण यातच भूकंपाची भयानकता हि भरलेली आहे .

इथे फक्त फक्त दोनच विकल्प आहेत , उन्नतीच्या अंतिम शिखरावर चढण्याची हिम्मत बाळगणे किंवा अध:पतनाच्या अंधाऱ्या खोल गर्तेत बुडून जाणे . ठरवले तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला संयम ,त्याग याची जोड देऊन शाश्वत विकास करणे  नाही तर त्याच तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सुख सोयीत विलासी जीवन जगत कधीच न जगल्यासारखे मरणे. विश्वाचा इतिहास युवकांच्या कर्तृत्वाने भरलेला आहे . सर्व गूण धारण करण्यासाठी विशाल हृदयाची आवश्यकता असेल तर जगाला युवकाकडेच यावे लागेल . वीरा भोग्य वसुंधरा (हि पृथ्वी फक्त वीरांसाठीच आहे ) हे तत्व आचरणात आणण्याची हिम्मत फक्त युवकात आहे . रणचण्डिकेच्या ललाटावरची विजयाची भाग्यरेखा , आत्मत्यागी वीर, साहित्य संगीत कला यातील रसिकता , मानवी संबंधातली हळवी भावुकता ,शास्त्र तंत्रज्ञानातले शुद्ध ज्ञान , ध्येयासाठी पछाडलेपण म्हणजे यौवन .पण या भूतलावरची सर्वात बिकट समस्याच युवक ठरत आहे कारण तो काहीही करू शकतो ( I Can  Do  ) ,अगदी काहीही . हीच त्याची खरी ताकत , काहीही करू शकण्याची . गरज आहे ती विधायक  दृष्टीकोनाची . यौवनात जोश आहेच ती भरण्याची आवश्यकता नाही ,गरज आहे त्यात होश आणण्याची.

हाच तो काळ ज्यामध्ये विधात्याने दिलेल्या सर्व शक्ती समजण्याची आणि विधायक दृष्टीने आचरणात आणण्याची हिम्मत असते.

Youth is the season of hope ,enterprise , energy to a nation as well as a individual -

आज विश्वात आपला भारत देशच युवा नेतृत्व करू शकतो . कारण इथे खूप युवक आहेत त्याहीपेक्षा त्या तरुणाईचा सळसळता उत्साह येथे आहे . आज खूप जण प्रत्येक गोष्टीसाठी युवकांकडे बोट दाखवतात. सगळीकडे अशी तकार आहे कि आजचे युवक कशावर श्रद्धा  ठेवत नाहीत . पण हेच तरुणाईचं गमक आहे , कि तो समजल्याशिवाय काही करत नाही . तो प्रश्न विचारतो हेच त्याचे विवेकीपण आहे .एक पाश्चात्त्य तत्ववेत्त्याने म्हटले आहे कि , It is an established truism that youngmen of today are the countrymen of tomorrow holding in their hands the high destinies of the land. They are the seeds that spring and bear fruit.

हे युवकच देशाचे भाग्य निर्माते आहेत . भविष्यातील सफलतेचे बीज यांच्यात विद्यमान आहे .

विश्वाच्या इतिहासात जिथे जिथे क्रांती दिसेल , परिवर्तन दिसेल तिथे तिथे असेच युवक दिसतील ज्यांना  त्या तत्कालीन व्यवस्थेतील चाकोरीबद्द्ध जीवन कुंठणाऱ्या प्रत्येक बुद्धिमानाने पथभ्रष्ट किंवा माथेफिरू ठरवले होते . झोकून देऊन स्वतःच कर्तव्य बजावणारी , ध्येयाने पछाडलेली युवा पिढी यांनीच विश्वात मांगल्य आणले आहे . कवी कुसुमाग्रज यांनी या वेड्या क्रांतिकारकांचे ध्येय आणि मूक मनोगत एका  कवितेत खूप सुंदर केले आहे ..

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडून भिंत
अन आईला कळवा आमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले हि या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करती प्रणिपात

हे ध्येयवेडे क्रांतिकारी आईला / मातृभूमीला सांत्वन देताना म्हणतात ,

कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे  उष:काल

अशा युवकांच्या रक्ताने लिहिलेला इतिहास जिथे आहे तिथे अजून प्रेरणेची काय आवश्यकता ? स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोहुन रामेश्वरम ला आले तेव्हा त्यांनी केलेले संबोधन हे नक्कीच आजच्या युवा पिढीला आश्वासित करणारे आहे आणि तथाकथित निराशावादी बुद्धिमानांचे डोळे उघडणारे आहे .
‘‘सूदीर्घ रजनी अब समाप्तप्राय सी दिखाई देती है। लम्बी काली रात टल गई अब उषा होने को है। यह सोया भारत जाग उठा है। केवल अन्धे देख नही सकते, विक्षिप्तबुद्धि समझ नहीं सकते कि यह सुप्त विराट जाग गया है। हिमालय से चल रही मंद शीतल लहर ने इस महाकाय को जगा दिया है। अपनी नियती को यह प्राप्त करके रहेगा। विश्व की कोई शक्ति इसे नहीं रोक सकती।’’

हे उदगार आले फक्त युवकांच्या भरवशावर .आणि ज्यांची बुद्धी विक्षिप्त नाही त्यांना हे स्वप्न सत्यात उतरताना दिसत असेलच . देशातली युवाशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात नवे कीर्तिमान स्थापन करत आहे . ज्ञान-विज्ञान , आर्थिक विकास , अंतराळ विज्ञान ,संगणक , व्यापार , इत्यादी सर्व क्षेत्रात भारतीय युवक आपला गमावलेला गौरव परत मिळवून विश्व् नेतृत्व करण्यास भारताला अग्रेसर करत आहेत . विश्वात सर्वाधिक अभियंता आणि चिकित्सक आज आपल्याकडे आहेत . त्यासोबत  कुशल आणि अकुशल श्रमिक लोक अधिक संख्येने इथेच आहेत . अकुशल वर्गाला जर व्यवस्थित आणि योग्य प्रशिक्षण दिले तर आपण येणाऱ्या अगदी काही वर्षातच अधिक श्रमिक वर्ग असलेला देश असू .  हे खरंच आहे कि तितक्याच समस्यांही आज आपल्या समोर आव्हान बनून उभ्या आहेत .

पण संधी आणि आव्हान  हे दोन्ही एकत्र उभे असताना आज युवकाला कर्तव्यासाठी उभं राहावंच लागेल . तमोगुणाच्या समुद्रात बुडालेल्या तरुणाईला आज बाहेर यावे लागेल . नुसत्या निष्क्रिय प्रार्थना करून काहीच होणार नाही . गेली सहस्रो वर्षे हा देश प्रार्थनांनी दुमदुमत आहे . पण कोणताच देव आमची प्रार्थना ऐकण्यास तयार नाही . का ऐकावे त्याने तरी ? मूर्खांची गाऱ्हाणे माणसंही ऐकत नाहीत तर भगवंतांनी तर का ऐकाव्यात ?

आता फक्त श्रीमदभगवदगीतेतील शब्द आहेत जे सांगतात कि ,
क्लैब्य: मा स्म गम: पार्थ न एतद त्वय्युपपद्यते |

दौर्बल्य टाकून दे , षंढ बनु नकोस.

तस्मात्वमूत्तिष्ठ यशोलभस्व |

उठ आणि यश , कीर्ती संपादन कर .

जागृत , सामर्थ्यशाली , संगठीत  तरुणाइ जेव्हा समर्पित भावनेने कर्तव्य करेल तेव्हा तो सुवर्ण दिवस असेल आणि स्वामी विवेकानंदांचे स्वप्न सत्यात अवतरलेले असेल .

आता आपल्याला मोहमयी निद्रेचा त्याग कराव लागेल . भौतिक सुखसोयी मिळवायच्याच आहेत पण सोबत नैतिकतेची कास धरून . ( Material Proeperity with Deeper Moral Sensitivity ) .
प्रेम तर  करायचच आहे पण कर्तव्यला न विसरता .कर्तव्य हाच ईश्वर आहे आणि अंतिम परिमाण आहे .तिथे प्रेमाला , अगदी जवळच्या व्यक्तीचा त्याग करावा लागेल पण कर्तव्याला मुकता येणार नाही . जर कर्तव्यच्यूत झालो तर दुबळे ठरू .

“Farewell Farewell My true Love
The army is on move;
And if I stayed with you Love,
A coward I shall prove."

आपल्याला दुर्बल करणाऱ्या गोष्टींचा विशाप्रमाणे त्याग करा हां स्वामींचा संदेश हेच यशाच गुपित आहे .

Anything that makes you weak physically, intellectually and spiritually, reject as poison.

पुन्हा एकदा दाखवून देऊ आपल  वेडेपण, कारण हेच तर राष्ट्रनिर्माणच खरं साधन आहे . जग वेडच ठरवेल , तेव्हा सांगू ,

इन्ही बिगडे दिमाग में राष्ट्रनिर्माण के बीज है
हमें पागल हि रहने दो हम पागल हि अच्छे है ।

-- सागर मुत्तगी
संकलित ( स्वामी विवेकानंद चरित्र आणि भगतसिंग यांचे विचार यातून )

Saturday, 6 January 2018

"विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः"


"युद्धस्य कथा रम्या"  बालकच नाहीतर सर्वच वयोगटाला युद्धाच्या,नायकांच्या कथा ऐकण्यात मजा येते,त्यातील प्रत्येक घटनेशी तो मनाने समरस होत असतो.नायकाचा विजय झाला की हा आपला विजय झाल्याप्रमाणे टाळ्या वाजवतो,त्याच्या पराभवाने दुःखीही होतो.इतकेच काय नायकाचा शत्रु आपला शत्रु समजतो,त्याच्या अन्यायाने चिडून उठतो,ही परिस्थिती जगाच्या पाठीवर सर्वत्र सारखीच..मग तोच नायक त्या व्यक्ति अथवा समाज यांच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय बनत असतो.फ्रॉईड म्हणतो त्याप्रमाणे आपल्याकडून अशक्य अथवा लोकेषणेमुळे करू न शकलेल्या गोष्टी नायकाला करताना पाहून त्यात स्वतःला पाहणे,ही मानवाची सहजप्रवृत्ती..जणु एक स्वप्नरंजनच,ही स्वप्ने वर्तमानापेक्षा जास्त रंजकच.. मग हीच नायके अथवा तो इतिहासच काय ते खरे आणि बाकी ते सर्व खोटेच हे मांडण्याचा अट्टहास सुरु होतो.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशात जे घडतय ते पाहून कोणताही संवेदनशील माणूस नक्कीच अस्वस्थ होईल.ज्याप्रमाणे बालक बोटे मुखात घालून आपणच आपल्या मुखाची दुर्गंधी पसरावतो, त्याचप्रमाणे ही इतिहासात रमणारी माणसे इतिहास घडवणे तर दुरच! पण त्यातुन इतिहासाची विकृती घडवताना जास्त दिसताहेत.इतिहासातील मढी उकरून काढण्यात कधीच अर्थ नसतो,नाहीतर त्या मढयांची अस्मिता वर्तमान जीवन असह्य आणि भविष्याची स्मशाने करून सोडतात.

इतिहासाकडे पाहताना प्रत्येकजण आज आपल्या 'पूर्वग्रह' आणि आपापल्या 'परिपेक्षा'तूनच पाहतोय, म्हणूनच कुणी डावा, तर कुणी उजवा किंवा भक्त ही असतो.आइनस्टाइन म्हणतोच ना, प्रत्येकाचे जगणे हे त्याच्या दिक् आणि काल (time and space)यामध्येच बांधलेले असते. हा प्रत्येकाची Time and Space आणि comfort zone सोडून बाहेर येण्याची मुळीच तयारी नसते.मग कोणी भगव्यावर,निळ्यावर आडून बसतो, तर कोणी हिरव्यावर आडून बसतो, ही वृत्ती घातक असते.

"आपल्या आदर्श नेत्याच्या अथवा श्रद्धास्थानाच्या चुका आणि मर्यादा आपण सभ्य शब्दात नोंदवायला तयार आहोत का? निदान इतर कुणी हे काम केले तर ते सभ्यपणे ऐकून घेण्याची क्षमता आपल्यात आहे का, हा खरा प्रश्न आहे. समाजाच्या श्रद्धास्थानाविषयी चिकित्सा करण्याची वेळ आली म्हणजे समाज चिडतो.हे समाजाचे चिडणे मी समर्थनीय मानले नाही तरी क्षम्य मानतो;पण अशा वेळी विचारवंतांनी तरी विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरायला हवा. तेही हा आग्रह धरणार नसतील तर आंधळ्या भक्तिभावनेला फळे येतील असे मला वाटत नाही"
- नरहर कुरुंदकर(व्यक्तिपूजा: एक चिकित्सा)

इतिहासातील प्रत्येक पात्र अथवा ज्यांना कुणाला तुम्ही तुमचा आदर्श समजता,तो सर्वच क्षेत्रात परिपूर्ण असणे असंभव.उदाहरणार्थ, आइनस्टाइन हा जर माझा आदर्श आहे, तर तो माझा विज्ञानाच्या क्षेत्रातला आदर्श,तो क्रिकेट अथवा अभिनय क्षेत्रातला आदर्श कसा होवु शकतो! त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनाला अनेक पैलू असतात, त्या प्रत्येक पैलुचा स्वतंत्र अधिकार असतो,म्हणुनच आदर्श अनेक ही असु शकतात.परस्परविरोधी मतांची महापुरुषे ही त्यांच्या गुणांमुळे वंदनीय ही असू शकतील. त्याकाळी शिवरायांपुढचा शत्रु, त्यावेळेची परस्थिती नक्कीच वेगळी होती, तसेच बाबासाहेबांपुढील समस्या नक्कीच वेगळी होती,आज परिस्थिती बदललीय आणि आज संविधान मिळालाय. समान हक्क मिळालीत, तरी आपण त्या स्वप्नरंजनात आणि त्यांचा शत्रु तोच माझाही शत्रु या भूमिकेतून बाहेर येत नाही आहोत.त्या भूमिकेतुन बाहेर येण हा त्यांचा अपमान नसतो, तर "त्यांच कर्तृत्व, समर्पण आदि गुण ओळखुन नव्या समस्यांना सामोरे जाणे,त्यांची उत्तरे शोधणे. इतकेच नाही त्या समस्यांची विधायक आणि आश्वासक उत्तरे स्वतः बनणे हाच या महापुरुषांचा यथोचित सन्मान असु शकतो"."मी आंबेडकर अथवा शिवाजींइतका मोठा नाही बनु शकत तरी मी अशा छोट्या समस्यांपुढे खंबीर उभा राहणारा छोटा शिवाजी अथवा छोटा आंबेडकर नक्कीच बनु शकतो".श्रीमद्भगवद्गीता ही हेच सांगते,"स्वल्पमप्यस्य धर्मस्य.." छोटेसेच करा पण प्रमाणिक प्रयत्न करा.
जग आणि विशेषतः भारत आज अनेक समस्यांनी ग्रस्त आहे.देश सोडून पळून जाण्याचे पळपुटे मार्ग स्विकारणे हे कधीही सोपे असते, पण अशा परिस्थितीत विजिगीषा वृत्तिने पाय रोवून उभे रहाणे हेच शहाणपणाचे असते आणि ही उर्मी, प्रेरणा या महान पुरुषांकडून घेण्यात खरी जीवनाभिलाषा दिसून येते.वेगवेगळ्या विचारधारा या समाजात असणारच,पण त्यातुन योग्य त्याची निवड करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी हवी."आनो भद्रा:" म्हणुन योग्य त्या सर्वाचा स्वीकार करणाऱ्यांचा हा देश आहे.

"नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळीत ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते"

'आम्ही दाखवु तोच सूर्य' अशा मुर्खांच्या नंदनवनात रमण्यापेक्षा इतिहासातून आणि अनुभवातून योग्य पाठ शिकणे, त्यातुन उत्तम भविष्यासाठीचा विधायक आणि सर्जनशीलतेचा मार्ग स्विकारणे हेच खरे विवेकपूर्ण जीवन असू शकते.एकट्याने हे जीवन जगणे तसे कठीणच,म्हणुन समविचारी आणि समान ध्येय असणाऱ्यांच संघठनच आवश्यक असते.

"येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे"

टिप: या लेखा सोबत "दिदी" या 1959साली प्रदर्शित झालेल्या एका जुन्या सिनेमातील गाण्याची लिंक ही शेयर करत आहे, ती नक्की पहावी. ती यासाठी की, 1959 सालातले प्रश्न आणि आजचे पडणारे प्रश्न यात नक्की फरक तो किती?
http://youtu.be/7vXCXYPjrIE

येत्या 26 जानेवारीला संविधान मिळुन 68 वर्ष पुर्ण होतील,तेव्हा इतक्या वर्षात देश किती बदलला,यापेक्षा मला वाटत आपण स्वतःला आणि देशाला बदलण्याचा किती प्रयत्न केलाय?याचा विचार व्हायला हवा. कारण गांधीजी म्हणतातच ना, Be the Change, U want to see.

- केदार मुत्तगी

Monday, 2 October 2017

गांधी :सुधारणावादी की क्रांतिकारी ?

गांधी हवेच आणि गांधी नकोच असा टोकाचा विचार आज परत होणार आणि तो चालूच राहणार ..

पण कोणते गांधी हवेत आणि कोणते नकोत याचा विचार आपण सर्व पूर्वग्रह विसरून विवेकबुद्धिने करण्याची वेळ आली आहे .

गांधीना पकडून ठेवण्याने राष्ट्रीय जीवनाचा तेजोभंग आहे पण सोडण्याने नियंत्रित, संयमी, कठोर शिस्तपालन आणि स्वावलंबनाचे आदर्श जीवन यांना मुकणे आहे .दोन्ही पण घातकच.
अर्थात यासाठी आपल्या देशात दूसरे आदर्श नाहीत का ? भरपूर आहेत ..मग गांधीच् का ?
कारण गांधीं ही आजच्या घडिला न पुसली जाणारी काळाच्या पडद्यावर उमटलेली अमिट रेष आहे , हे सत्य नाकारता येत नाही .
एखाद्या व्यक्तीला ,विचाराला  जितका विरोध होईल तितकाच त्या व्यक्ती/विचार यांच्या अनुयायाचा कट्टरपणा वाढतो .
तसाच गांधीवाद हा पण संपु शकत नाही म्हणून निष्फळ वादविवादातून पुढे जायच असेल तर काल सुसंगत गांधी स्वीकारणे हे अपरिहार्य आणि शहाणपणाचे ठरू शकते .

हिंसेच समर्थन कधीच होऊ शकत नाही पण म्हणून कोणी आत्यंतिक अहिंसेचा आग्रह राष्ट्रजीवनात धरत असेल तर तो ही चुकिचाच असतो हे इतिहास आणि काळाने सदैव अधोरेखित केल आहे .
 The true virtue lies in the mean between two extremities .

गांधी क्रांतिकारी होते की सुधारणावादी ? गांधी स्वत: सांगतात की मी सुधारणावादी क्रांतिकारी आहे .
गांधी स्वत: सांगत की मी जे आज बोलतो ते प्रमाण मानु नका कारण मी प्रयोगशील आहे , कदाचित आजचा अनुभव मला उद्या काही वेगळे सांगण्यास सांगेल . ही गांधींच्या जीवनाची भूमिका लक्षात घ्यायला हवीच .

ज्याला सत्याची थोड़ी तरी चाड आहे तिथेच सत्याग्रह होऊ शकतो. पण कोणी सीमेवर जाऊन सत्याग्रह आणि उपोषण याचा जर अनाठाइ आग्रह करत असेल तर त्याला आत्महत्या म्हणावी लागेल .

गांधी विरोधक गांधीना सामजिक जीवनात शोधतात आणि गांधीवादी म्हणवून घेणारे कधीच गांधीच्या वैयक्तिक जीवनाचे दर्शन घडवत नाहीत.
आजच्या काळात हवे आहेत ते , वैयक्तिक जीवनात रोज अडखळलेले गांधी जे वेगवेगळे प्रयोग करत विकसित झाले .

स्वामी रामानंद तीर्थ यांनी एक जाहिरात दिली होती " Wanted Reformers of themselves , not of others"  या जाहिरातीचा  शोध म्हणजे गांधी . यामुळेच विनोबा भावे , साने गुरूजी यांसारखे जे कदाचित गांधीपेक्षा अधिक विद्वान असतील त्यांनीदेखील गांधींच शिष्यत्व पत्करल .

अहिंसा हे गीतेतील तत्वज्ञान आहे पण ते गीतेच अंतिम तत्वज्ञान नाही .कारण कोणत्याही ग्रंथाचा सार हा त्याच्या उपक्रम आणि उपसंहार यावरून ठरतो .गीतेचा उपसंहार अहिंसा निश्चितच नाही .

गांधींनी स्पष्ट सांगितल आहे ज्यांना अहिंसा झेपत नाही त्यांनी हिंसेने स्वतः वर होणारी हिंसा रोखण्याचा प्रयास करावा .
"हिंसापि क्लैब्यात श्रेयसी "(षंढ बनण्यापेक्षा हिंसा श्रेय ठरते ) हे देखील गांधीचंच म्हणणे आहे .याचा गांधीवादी विचार करत नाहीत .या गांधींच्या म्हणण्याला गीतेचा आधार आहे  " क्लैब्य मा स्म गम: पार्थ " ( हे अर्जुना , षंढ होऊ नकोस ).  एकुणात प्रश्न हिंसा - अहिंसेचा नाही तर आपली भूमिका आपल्याला षंढ तर बनवत नाही ना याचा आहे .

हिंसा- अहिंसा हा प्रश्न, दुराग्रह नसेल आणि विवेक असेल तर त्यावर चर्वित चर्वण करण्याची आवश्यकता उरत नाही .
अहिंसा ही गांधींची भूमिका आहे पण त्यातुन जर क्लैब्य येत असेल तर ते त्यांना देखील मान्य नाही .अहिंसा ही गांधींची वैयक्तिक ताकद होती म्हणून ती त्यांच्या अनुयायांची असू शकत नाही .कारण अनुयायी फ़क्त शब्द उचलतात पण त्याचा मंत्र गांधींकडे होता .त्या मंत्राच्या उपासनेतुन गांधींचे महात्मा होऊ शकतात . बाबा आमटे यांनी गांधी - एक युगमुद्रा या मुक्त कवितेत गांधींचे यथार्थ वर्णन केले आहे .गांधींचा मंत्र नसेल तर गांधींचे विचार विकृती ठरू शकतात .


" तुमच्या आमच्या जीवनातली शक्ती प्रतिक्रियेत खर्च होते.
त्याच्या जवळ विशुद्ध क्रिया असते.
म्हणून धबधब्यापेक्षा हजारपट मोठी
श्रावणझडीची उंची त्याला दिसते!
रोग्यात तो योगी पाहतो
आणि अस्पृश्यात त्याला हरिजन दिसतो.
आणि म्हणून तो कर्मकांडी राहू शकत नाही.
जीवनाचे संदर्भ तोडून कृतींचे अर्थ तो लावीत नाही.
गफारखानांच्या मुलासाठी तो मांसाहाराची व्यवस्था करतो
हिंसक क्रांतिकारांच्या धैर्याची तो पूजा करतो.
आणि प्रतिस्पर्ध्यांशीही वागताना त्याची मान ताठ
पण माथा झुकलेला असतो.
म्हणून त्याच्या उपवासाने
त्याला प्रतिस्पर्ध्याच्या हृदयात वास मिळतो
त्याची विशुद्ध क्रिया नसली
तर उपवासाचा उपहास होतो !
(बहुधा अशा उपवासांचा उपद्रवही होत असतो.)
त्याचा मंत्र जवळ नसला
म्हणजे त्याच्या यंत्रावर विणलेली खादी
वैफल्याची नग्नता झाकू शकत नाही.
आणि त्याच्या तत्वांचे घटपट करत चालणारे
बौद्धिक हस्तमैथुन
समाधानाचा फक्त भास देऊ शकते.
त्याने निर्मिती होत नाही.
विकृती मात्र निर्माण होते.."

मेरा जीवन हि मेरा संदेश हे म्हणण्याचे धाडस गांधी करू शकतात कारण हा नंगा फकीर माणसाला भेडसावणाऱ्या आदिम समस्यांशी जाऊन बेधडक धडकला . मानवाच्या वास्तवतेचे रूप बुरखा काढून पाहण्याचा प्रयत्न गांधींनीहि केला आणि या प्रयत्नात स्वतःचा बुरखा त्यांनी फाडून घेतला. जे कबुल करायला आपण घाबरतो ते त्यांनी जगजाहीर केले . हि हिम्मत म्हणजे गांधी .

Be the change you want to see -  हि गांधींची खरी विरासत .

Cleanliness is next to Godliness  हि गांधींची साधना .

When doubts haunt me, when disappointments stare me in the face, and I see not one ray of hope on the horizon, I turn to Bhagavad-Gita and find a verse to comfort me; and I immediately begin to smile in the midst of overwhelming sorrow. Those who meditate on the Gita will derive fresh joy and new meanings from it every day .

हे त्यांनी सर्व समस्येसाठी शोधलेला उपायमार्ग . गीतेतून काय उचललं यापेक्षा समस्यांपुर्तीसाठी गीता उचलली हे त्यांच्या जीवनाचे अनुकरण होऊ शकते .

आज डोळे उघडून पाहिले तर दिसेल कि वैयक्तिक चारित्राच्या जोरावर काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे आदर्श गांधी आहेत हे सत्य नाकारता येत नाही . विनोबा भावे , साने गुरुजी , बाबा आमटे , रवींद्र कोल्हे असे एक ना अनेक आहेत . मेळघाटात केलेलं रवींद्र कोल्हेंच कार्य यात गांधीच्या विचारांचा प्रभाव काय असतो हे  जाणवते.

स्वच्छ भारत संकल्प हा गांधीवाद आहे . अजूनही मोठं मोठ्या MNC अथवा संस्थांमध्ये जेव्हा सुशिक्षित लोकांसाठी Washroom Etiquette  ची पाटी लावली जाते तरी देखील ज्या सुशिक्षितांना , इतकं शिक्षण घेऊन मला का हे  सांगतात हा प्रश्न सतावत नाही त्यांच्या शैक्षणिक अर्हतेची कीव वाटावी असेच आहे .म्हणून अजून गांधीवाद हवा आहे अशा अडाणी शिक्षितांसाठी .

गांधींचं एकादश व्रत हे आज हि किती कठीण आणि आवश्यक आहे हे गांधीवादी म्हणून घेणारे देखील सांगत नाहीत. या व्रतात खरे भारतीय जीवनदर्शन आहे .

अनादी 'सत्य'  हे तत्व घेऊन ज्या व्यक्तीने स्वताच्या जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न केला आज त्यांचेच  छायाचित्र असलेलं चलन हे भ्रष्टाचाराच सगळ्यात मोठं माध्यम बनलं आहे . अर्थात भ्रष्टाचार हि मानसिक विकृती आहे पण गांधींनी पुरस्कृत केलेलं प्राचीन 'सत्य' तत्व हेच त्याच निवारण बनु शकत.

गांधीजींना नाकारणं अर्थात त्यांच्या आज नको असलेल्या विचारांना स्थिर होण्यास वाव देण्यासारखे आहे .म्हणून आज काळ सुसंगत गांधी समोर येणं हे आवश्यक बनत आहे .

 गांधींच्या वैचारिक भूमिकेच्या अतिरेकाची मर्यादा विवेकी बुद्धिने ओळखणे यातच गांधीवादाचा विजय आहे .

स्वत:ची आत्मशुद्धि करुन समाजासमोर आदर्श उभे करणार सुधारणवादि गांधीतत्व हे सामाजिक क्रांतीची बीजे रोवू शकते .

-- सागर मुत्तगी

Wednesday, 13 September 2017

अति सर्वत्र वर्जयेत्



बुद्धांच्या "करूणे"चा वारसा घेऊन निघालेला म्यानमार देश रोहिंग्यांच्या प्रति इतका निष्ठुर कसा..!!
"दुःख प्यायला दुःखाचीच ओंजळ लागते" हे तत्वज्ञान सांगणारी ओंजळ आज मिटली कशी काय..!!
"सर्वं दुःखं सर्वं क्षणिकं" हे सत्यच.. तर हे रोहिंगे पण क्षणिकच की..
आणि सर्वांना शून्यातच जायचय.. मग हा विरोध का..?

भारतीय हिंदुसुद्धा निर्वासित म्हणून बाकी देशात स्थायिक झालेच की..भुमीहीन इस्राईली ज्यु तर शेकडो वर्षे जगात निर्वासित म्हणूनच राहत होते.. भारतातील इराणहुन आलेले पारसी.. असे अनेक आहेत, पण त्यांना विरोध झाला हे कुठे ऐकिवात तरी नाही..

म्यानमार जगाच्या इतिहासाकडून शिकतोय असे म्हणायचे का..?
यांसाठी त्यांनी निर्वासीतांचा (विशेषतः या विशिष्ठ धर्माच्या) अभ्यास केला का..?
तर उत्तर 'हो' हेच मिळेल..स्वतःमध्ये आणि आपल्या तत्वांच्या परिभाषा यामध्ये काळानुरूप आवश्यक तो बदल केला पाहिजे..'अहिंसा' म्हणजे हिंसा न करणे,दुसऱ्यावर प्रेम करण ही व्याख्या श्रेष्ठच,पण आता "अहिंसा म्हणजे स्वतःची हिंसा होऊ न देणे" ही व्याख्या आत्मसात करणे गरजेचे झाले आहे..
विशेष म्हणजे म्यानमारच्या सध्याच्या state counsellor-  Aung San Suu Kyi यांना तर 'शांततेचा नोबेल' मिळालाय..
"अहिंसा" आणि "करुणा" ही तत्व म्हणून श्रेष्ठच.. याचा आग्रह जीवनात ज्याने-त्याने किती धरावा, हा व्यक्तिगत प्रश्न.. पण हा व्यक्तिगत आग्रह पराकोटीला जातो तेंव्हा तो समाज आणि देशहिताला बाधक ठरतो.कारण व्यक्तीगत आग्रहाने सबंध देशाला सोसावे लागते,हे आमच्या देशाला चांगलेच माहितीये..(ज्यांना वाचावयाचे आहे,त्यांनी गांधींचा 'राजकारणा'च्या अनुशंगाने अभ्यास करावा)

आज पुनः असाच आग्रह होताना दिसतोय, पण आता हा आग्रह एका व्यक्तिचा नसुन पालतु पुरोगामी जमातीचा..
"मानवाधिकार" आणि "मानवतावाद" याअशा अफाट तत्वज्ञानाचा दाखला दिला जातोय.ज्या पुरोगाम्यांना हिंदुत्वाचा तिटकारा आहे,तिच जमात आज 'अतिथी देवो भवः'चा शंख फुंकत फिरतेय.पण याबद्दल ना कुठला मठाधिपती बोलतोय ना कुठला धर्माचा अधिकारी. सगळे आपापली दांभिक भक्ती,पिसाटलेले भक्त,लूटलेली संपत्ती सांभाळण्यात गर्क..असो.

पण आपण तरी या देशाच्या इतिहासाकडून काही शिकू का..? हा प्रश्न आहे..

लखनौ कराराविषयी आचार्य नरहर कुरुंदकर म्हणतात की,
"पुष्कळ जणाना माहित नसणारी गोष्ट ही आहे की,लखनौ-करार बंगालमधील मुसलमानाना कधीच आवडला नाही.मुबईमधील 9-10 % मुसलमानाना विधानसभेच्या 25 % टक्के जागा देणारा लखनौ-करार जिथे मुबई-मद्रासच्या मुसलमानानी लोकसंख्येच्या अडीचपट प्रतिनिधीत्व मिळून समाधानकारक वाटत नव्हता.तिथे बंगाली मुसलमानाना लोकसंख्येइतके प्रतिनिधित्व देणारा करार असमाधानकारक वाटावा यात नवल नव्हते.भारतभर मुसलमानाना विशेष प्रतिनिधित्व देणा-या या लखनौ-कराराचे शिल्पकार स्वत लोकमान्य टिळक होते.आणि करार बंगालसाठी अपुरा आहे,ह्याच्यापुढे गेले पाहिजे,असे प्रामाणिकपणे मानणारे चित्तरंजन दास होते.दासानी बंगालसाठी एक स्वतंत्र करार केला; हा करार 'दास पँक्ट' म्हणून ओळखला जातो.या करारानुसार बंगालमदील 52 % मुसलमानाना 60 %जागा व 55 % नौक-या मिळावयाच्या होत्या.उरलेल्या 40% जागा व 45 % नोक-यात हिन्दूच्या बरोबर इतर सर्व अल्पसंख्यही सामील व्हायचे होते.हा 'दास-करार' देशबंधू दासानी केला,सुभाषबाबू या कराराचे सहभागी होते,दास व मौलाना आझाद या कराराचे आग्रही समर्थक होतेे,ही एक वस्तुस्थिती आपण ध्यानात घेतली पाहिजे....

'दास-करार' काग्रेस श्रेष्ठीना मान्य झाला नाही.त्यानी तो फेटाळून लावला; हे जरी खरे असले तरी त्यामुळे एक गोष्ट सिध्द होते.हिन्दूच्यापासून मुसलमानाना फोडू इच्छिणारी एक तिसरी सत्ता इंग्रजाची ह्या देशात अस्तित्वात आहे; तिला यश मिळू नये म्हणून औदार्याने वागवून,थोडे अधिक देऊन,पडते घेऊन,मुसलमानाचे मन जिंकावे असे सर्वानाच वाटत होते,'औदार्याने जिंका' हा त्या काळातील सर्वाचा मंत्र होता.टिळकाच्यापासून सुभाषबाबुच्यापर्यंत सगळेच औदार्यवादी होते.या औदार्यवादाला गाधी नेहरु अपवाद नव्हते,तसेच दास-सुभाषही अपवाद नव्हते."
(नरहर कुरुदकर,{आकलन} पृ.6-7)

हा आणि असा मुस्लिमांबद्दलचा उदारमतवाद काल ही होता आणि आज ही आहे.. याची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतील..भारतात हिन्दु व्यतिरिक्त धर्मियांचा तलवारीच्या बळाने हिन्दुंनी कुठेही धर्मांतर केल्याचे कोणी पाहिले नसेल,ही हिन्दुंची सहिष्णुता आहे..(या उलट ज्या हिन्दुंना तलवारीच्या धाकाने बाटवले,त्यांना परत हिन्दुंमध्ये घेतले नाही हा मुर्खपणा आम्ही केला)..
बौद्ध,जैन,शिख अशा अनेक धर्मीयांची श्रद्धास्थाने भारतात आजही निर्भयपणे उभी आहेत..पण मुख्य प्रश्न हा आहे, जेव्हा जेव्हा देश आणि धर्म यामध्ये संघर्ष उभा राहतो तेव्हा प्रथम प्राधान्य धर्माला हेच मुस्लिमांमध्ये पाहावयास मिळते..(काही अपवाद वगळता)
"इतिहासात औरंगजेबाने ब्रम्हदेशातल्या बौद्धांवर हल्ला करून त्यांना धडा शिकवला होता. आज अजून एक औरंगजेब जन्मला पाहिजे..
म्यानमार मधील घुसखोर  मुस्लिमांशी भारताने योग्य व्यवहार केले नाहीत तर याचे परिणाम भारताला भोगावे लागतील",अशी भाषा मुलतत्ववाद्यांकडून आज बोलली जात आहे.

१९४७ साली भारताची फाळणी झाली. बरेच हिंदु निर्वासित भुके कंगाल लोक चौदा पंधरा वर्षे भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून याचना करत होते. त्यावेळी एकाही पुरोगाम्याला पान्हा फुटला नव्हता.
काही फालतू (पालतु) पुरोगामी आणि काही मूलतत्ववादी दोन धर्मातील तेढ वाढवतील.भारतातील मुस्लिमांनीही ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे गरजेचे की, हिंदु टिकतील तरच येथील मुस्लिम सुरक्षित राहु शकेल,कारण आज भारतातील मुस्लिम जितका सुरक्षित आहे, तितका तर तो मुस्लिमबहुल देशात ही नाही...

आज देशासमोर आणखी अनेक समस्या आहेत,स्त्रीयांचे संरक्षण, त्यांना मिळणाऱ्या सुविधा..जातीभेद, जात-पंचायती परत डोकी वर काढत आहेत..'आहे रे'आणि 'नाही रे' मधील दरी जास्त खोल होताना दिसत आहे..शिक्षणक्षेत्राचे बारा कधीच वाजलेत..महान संस्कृतीच्या गप्पाष्टके गाणाऱ्या देशात पंतप्रधानाला शौचालयासाठी आग्रह करावा लागतोय,यासारख दुर्दैव कोणत असु शकत नाही..रामराज्याच्या गप्पा मारण आता तरी बंद करुन कामाला लागले पाहिजे,कारण अकर्मण्यता आज वाढत आहेत...वेदकालिन विमानांचा बडेजाव आजही सांगितला जातोय,विमाने असतील ही..पण आज देशाला स्वतःचा लढाऊ विमान बनवणे देखील कठिण झाले आहे आणि हेच वास्तव आहे..प्राथमिक गरजा पुर्ण करण्यात आपण आज ही अपयशी आहोत.. यासर्व समस्यांची अशी गिनती वाढतच जाईल,मग आपलेच प्रश्न सुटत नसताना अजुन डोकेदूखी वाढवुन घेण्यात कोणता पुरुषार्थ आहे..?अतिथींचा आम्ही आज ही सन्मान करतो, पण अतिथी स्वतःचा धर्म लादण्याचा प्रयत्न करत नसतो आणि त्याच निघुन जाण निश्चित असत.. मग हे आले तरी निघुन जाण्याचा विचार तरी करतील का..? या सर्वांचा विचार झाला पाहिजे.

आज इतिहासाच्या योग्य आकलनासोबत वास्तवाच भान हवय..विवेकबुद्धी जागृत ठेवुन योग्यायोग्य ठरवता यायला हवे..
"अति सर्वत्र वर्जयेत्" हे हिन्दू-मुस्लिम दोघांनी लक्षात ठेवणे गरजेचे.
वेदांचा अभ्यास करताना ब्रह्मसुत्रातील चतुःसूत्री हेच सांगते की, जगात परस्पर विरोधी विचार असणारच.. पण शास्त्रांच्या समन्वयानेच ज्ञान/शांतता येणार, विवादाने नाही..

अथातो ब्रह्मजिज्ञासा | जन्माद्यस्य यतः | शास्त्रयोनित्वात् | तत् तु समन्वयात् |

क्रांतिकारकांच्या कुटुंबांनी या स्वातंत्र्य यज्ञात स्वतःची पूर्णाहुती दिलीय, का तर पुढील पिढ्यांच स्वातंत्र्य अबाधीत रहावे.. आज ही अनेक जवान आपल्यासाठी शाहिद होताहेत..अशा अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य 'मिळवले' आहे आणि आता ते टिकवणे आपले कर्तव्य आहे..

माउलीच्या मुक्ततेचा, यज्ञ झाला भारती |
त्यात लाखो वीर देती, जीविताच्या आहुती |
आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌ |
वेदमंत्राहून आम्हां वंद्य, वंदे मातरम् ||
(गदिमा)

- केदार मुत्तगी

Saturday, 2 September 2017

नीरक्षीरविवेके तु हंसो हंसः बको बकः



भारताचे झालेले अधःपतन म्हणायचे की...भारतात विचारवंतांचा दुष्काळ पडलाय..?

आज पाश्चिमात्यांमध्ये 'विचारवंता'ची असलेली व्याख्या काय आहे याचा यावरुन अंदाज येऊ शकतो.. (फक्त भारताचीच अशी स्थिती आहे असे नाही)
कारण 'रागा'ला आमंत्रण देणारे Institute of International Studies Berkeley Research on Contemporary India Program and the Institute for South Asia Studies at the University of California (UC).. आणि
विषय- ‘India At 70: Reflections On The Path Forward’.. हा अभ्यासपूर्वक मांडणी करावयाचा विषय,यात राजकारण हा एकच विषय असु शकत नाही.अभ्यासपूर्ण चिकित्सेसह भविष्यात भारत जगाला कोणत्या गोष्टीत मार्गदर्शन करु शकतो याचे मत मांडणे आवश्यक असते. मोदी आणि त्यांचे राजकारण हीच एकमेव आज भारतातील समस्या अशी धारणा असलेला माणूस याविषयाव्यतिरिक्त काही बोलणे या बालबुद्धि कडून अपेक्षित ही नाही. या मातीतील अनेक नेत्यांनी, समाजसेवक आदीनी स्वातंत्र्यानंतर भरभरून दिलय, यावर बोलण्याकरता अनेक अभ्यासू आणि तशी कामे करणारे ही भारतात अनेक आहेत.

जीवन का महत्व तभी है जब वह किसी महान ध्येय के लिये समर्पित हो । यह समर्पण ज्ञान और न्याययुक्त हो ।
–इंदिरा गांधी

हे आजीचे वाक्य समजण्या इतकी ही त्याला *** नाही यात शंका नाही.आजकाल 'रागा'सारख्या अनेक विचारवंतांचा आणि भाटांचा सुळसुळाट आहे.पण खरा विचारवंत कोण हे समजण्या इतके आपण सर्व बुद्धिमान आहोत ही अपेक्षा आणि विश्वास ही..

पण 'रागा'चे ऐकून अमेरिका विकसीत स्थितीपासून आणखी किती अधोगामी/उर्ध्वगामी विकसीत होईल हे त्या संस्थेचे तज्ञच जाणो.

जाकी जैसी बुद्धि है , वैसी कहे बनाय ।
उसको बुरा न मानिये , बुद्धि कहाँ से लाय ॥
— रहीम

हे नक्की की, भाटां/पुरोगाम्यांकडून तेही आजी आणि पणजोबाप्रमाणे भारत भाग्यविधाते ठरवले जातील..

भारताचे प्रतिनिधी म्हणुन याच दिवशी म्हणजे 11 सप्टेम्बर 1893 ला "स्वामी विवेकानंदां"नी केलेले भाषण..दोघांच्या चारित्र्य आणि बुद्धिचीकुवत.. परिस्थिती यात जमीन आस्मानाचा फरक..दोघात कसलीच तुलना होवु शकत नाही.
(भाषणाच्या तारखेत असलेले साम्यपाहुन थोडी व्यथा झाली म्हणून लिहीण्याचा प्रपंच..)

विचारवंतांचे हे आजचेे प्रतिनिधीत्व पाहिल्यावर वाटते की, आजच्या तरुण पिढीला 'विवेका'ची अत्यंत गरज आहे. जन्म आणि मरण यामधील अंतर कापताना विवेकाचे वंगण वापरुन आनंदयात्री होणे हेच कदाचित मनुष्य जीवनाचे ध्येय असु शकते.आत्महत्येसारखी पळपुटे मार्ग स्विकारणारा आणि शुल्लक कारणाने निराश होणाऱ्या तरुणाला काय हवे याचा विचार कुणीही करताना दिसत नाहिये. शिक्षणाने आत्मविश्वास - आत्मसन्मान उभा राहायला हवा,पण प्रत्येकाला आज आरक्षणाची कुबडी हवीय. विज्ञानाची कास धरा  अशी परायणे करणारी जमात मानवी मनाचा विचार करताना दिसत नाही आणि बाबा-बुवा च्या नादी लागलेल्या भक्त (उच्चशिक्षितांची संख्या जास्त आहे)मंडळीच्या तोंडी लावायला ही विज्ञान कुठे दिसत नाही. शिक्षणव्यवस्थेकडे विवेक उभी करण्याची जबाबदारी होती,योग्य-अयोग्य यात फरक करता येण्यासाठी निरपेक्ष आणि निःष्पक्ष शिक्षकांची गरज होती आणि आहे, याकडे कुणाचे ही लक्ष नाही.माणुस विकला जातोय याची कुणालाच खंत नाहिये.कुठल्याही धर्मातील मठाधिपतींना काहीही करायचे नाहिये, कारण मुर्खांवरच त्यांची पोट भरत आहेत.सर्व बुद्धिवाद्यांनी आज पुनः शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे,कारण राजकारण हीच एकमेव भारतापुढील समस्या आहे, असा आभास उभा केला गेलाय.

परंतु ज्यांना विधायक कामे करायची आहेत, अशांसाठी बाबा आमटेंसारखी युगपुरुषे आवाहन देतायेत-

माझ्या युवकांनो !
या युगयात्रेत माझ्याबरोबर येण्याची मी तुमच्यावर सक्ती करीत आहे
युद्धातल्या भरतीसाठी नव्हे
तर या विराट अभावाच्या पूर्तीसाठी
आणि तुमच्या-माझ्या अस्तित्वांना अर्थ आणण्यासाठी
मी तेथे येण्याची तुमच्यावर सक्ती करत आहे

जेथे तुमच्या गरजा तुमच्याठायी जन्मण्यापूर्वीच जाणल्या जातील
जेथे तुमच्या अंतरंगात तुम्ही ताठ उभे राहाल
आणि स्वतःच्या आत ताठ उभे राहाल
अभेद्य सेना जेथे तयार होईल
आपल्या आत तुम्ही किती मोठे आहात
हे जेथे मी तुम्हाला दाखवू शकेन
तेथे तुमचे हात जुळतील
तुमची हृदये एक होतील
तुमच्या मस्तकांचे तेथे मिलन होईल
आणि स्वप्नधुंद ज्वालांचे हितगुज तेथे चालेल
अतिथी म्हणून आलेला प्रत्येक आनंदी किरण तेथील रहिवासी होईल
तेथे ‘आज’ च्या भोवती विश्वासाचे  कुंपण असेल
आणि त्यामध्ये प्रिय कर्माची हिरवळ अमाप माजलेली असेल

"आत्मदीपो भवः" हा बुद्धांचा संदेश पुन्हा आत्मसात करायला हवा. सतत प्रश्न विचारणारा सॉक्रेटीस बुद्धित जन्मायला हवा.स्वतःची चुक मान्य करायला प्रामाणिक बुद्धी हवी."सदसद्विवेक", "नित्यानित्यवस्तुविवेक" जागृत करण्यासाठी बुद्धि प्रगल्भ असणे गरजेचे,म्हणून अशी प्रगल्भ बुद्धि बनवण्यासाठी वाचनाची/विचारांची आणि अनुभवाची जोड हवी.

हे दीपा तू जळत रहा ।

असाच जागत या विजनावर
जीवनसुम तिमिरास वहा ॥

नक्षत्रांशी होते नाते
परि न आता सांगायाचे

भग्‍न चिर्‍यावर वादळात या
तुला मला रे जळावयाचे
विसर मंदिरे विसर गोपुरे
श्रेय इथे मातीत पहा ॥
(कुसुमाग्रज)



- केदार मुत्तगी