Monday, 2 October 2017

गांधी :सुधारणावादी की क्रांतिकारी ?

गांधी हवेच आणि गांधी नकोच असा टोकाचा विचार आज परत होणार आणि तो चालूच राहणार ..

पण कोणते गांधी हवेत आणि कोणते नकोत याचा विचार आपण सर्व पूर्वग्रह विसरून विवेकबुद्धिने करण्याची वेळ आली आहे .

गांधीना पकडून ठेवण्याने राष्ट्रीय जीवनाचा तेजोभंग आहे पण सोडण्याने नियंत्रित, संयमी, कठोर शिस्तपालन आणि स्वावलंबनाचे आदर्श जीवन यांना मुकणे आहे .दोन्ही पण घातकच.
अर्थात यासाठी आपल्या देशात दूसरे आदर्श नाहीत का ? भरपूर आहेत ..मग गांधीच् का ?
कारण गांधीं ही आजच्या घडिला न पुसली जाणारी काळाच्या पडद्यावर उमटलेली अमिट रेष आहे , हे सत्य नाकारता येत नाही .
एखाद्या व्यक्तीला ,विचाराला  जितका विरोध होईल तितकाच त्या व्यक्ती/विचार यांच्या अनुयायाचा कट्टरपणा वाढतो .
तसाच गांधीवाद हा पण संपु शकत नाही म्हणून निष्फळ वादविवादातून पुढे जायच असेल तर काल सुसंगत गांधी स्वीकारणे हे अपरिहार्य आणि शहाणपणाचे ठरू शकते .

हिंसेच समर्थन कधीच होऊ शकत नाही पण म्हणून कोणी आत्यंतिक अहिंसेचा आग्रह राष्ट्रजीवनात धरत असेल तर तो ही चुकिचाच असतो हे इतिहास आणि काळाने सदैव अधोरेखित केल आहे .
 The true virtue lies in the mean between two extremities .

गांधी क्रांतिकारी होते की सुधारणावादी ? गांधी स्वत: सांगतात की मी सुधारणावादी क्रांतिकारी आहे .
गांधी स्वत: सांगत की मी जे आज बोलतो ते प्रमाण मानु नका कारण मी प्रयोगशील आहे , कदाचित आजचा अनुभव मला उद्या काही वेगळे सांगण्यास सांगेल . ही गांधींच्या जीवनाची भूमिका लक्षात घ्यायला हवीच .

ज्याला सत्याची थोड़ी तरी चाड आहे तिथेच सत्याग्रह होऊ शकतो. पण कोणी सीमेवर जाऊन सत्याग्रह आणि उपोषण याचा जर अनाठाइ आग्रह करत असेल तर त्याला आत्महत्या म्हणावी लागेल .

गांधी विरोधक गांधीना सामजिक जीवनात शोधतात आणि गांधीवादी म्हणवून घेणारे कधीच गांधीच्या वैयक्तिक जीवनाचे दर्शन घडवत नाहीत.
आजच्या काळात हवे आहेत ते , वैयक्तिक जीवनात रोज अडखळलेले गांधी जे वेगवेगळे प्रयोग करत विकसित झाले .

स्वामी रामानंद तीर्थ यांनी एक जाहिरात दिली होती " Wanted Reformers of themselves , not of others"  या जाहिरातीचा  शोध म्हणजे गांधी . यामुळेच विनोबा भावे , साने गुरूजी यांसारखे जे कदाचित गांधीपेक्षा अधिक विद्वान असतील त्यांनीदेखील गांधींच शिष्यत्व पत्करल .

अहिंसा हे गीतेतील तत्वज्ञान आहे पण ते गीतेच अंतिम तत्वज्ञान नाही .कारण कोणत्याही ग्रंथाचा सार हा त्याच्या उपक्रम आणि उपसंहार यावरून ठरतो .गीतेचा उपसंहार अहिंसा निश्चितच नाही .

गांधींनी स्पष्ट सांगितल आहे ज्यांना अहिंसा झेपत नाही त्यांनी हिंसेने स्वतः वर होणारी हिंसा रोखण्याचा प्रयास करावा .
"हिंसापि क्लैब्यात श्रेयसी "(षंढ बनण्यापेक्षा हिंसा श्रेय ठरते ) हे देखील गांधीचंच म्हणणे आहे .याचा गांधीवादी विचार करत नाहीत .या गांधींच्या म्हणण्याला गीतेचा आधार आहे  " क्लैब्य मा स्म गम: पार्थ " ( हे अर्जुना , षंढ होऊ नकोस ).  एकुणात प्रश्न हिंसा - अहिंसेचा नाही तर आपली भूमिका आपल्याला षंढ तर बनवत नाही ना याचा आहे .

हिंसा- अहिंसा हा प्रश्न, दुराग्रह नसेल आणि विवेक असेल तर त्यावर चर्वित चर्वण करण्याची आवश्यकता उरत नाही .
अहिंसा ही गांधींची भूमिका आहे पण त्यातुन जर क्लैब्य येत असेल तर ते त्यांना देखील मान्य नाही .अहिंसा ही गांधींची वैयक्तिक ताकद होती म्हणून ती त्यांच्या अनुयायांची असू शकत नाही .कारण अनुयायी फ़क्त शब्द उचलतात पण त्याचा मंत्र गांधींकडे होता .त्या मंत्राच्या उपासनेतुन गांधींचे महात्मा होऊ शकतात . बाबा आमटे यांनी गांधी - एक युगमुद्रा या मुक्त कवितेत गांधींचे यथार्थ वर्णन केले आहे .गांधींचा मंत्र नसेल तर गांधींचे विचार विकृती ठरू शकतात .


" तुमच्या आमच्या जीवनातली शक्ती प्रतिक्रियेत खर्च होते.
त्याच्या जवळ विशुद्ध क्रिया असते.
म्हणून धबधब्यापेक्षा हजारपट मोठी
श्रावणझडीची उंची त्याला दिसते!
रोग्यात तो योगी पाहतो
आणि अस्पृश्यात त्याला हरिजन दिसतो.
आणि म्हणून तो कर्मकांडी राहू शकत नाही.
जीवनाचे संदर्भ तोडून कृतींचे अर्थ तो लावीत नाही.
गफारखानांच्या मुलासाठी तो मांसाहाराची व्यवस्था करतो
हिंसक क्रांतिकारांच्या धैर्याची तो पूजा करतो.
आणि प्रतिस्पर्ध्यांशीही वागताना त्याची मान ताठ
पण माथा झुकलेला असतो.
म्हणून त्याच्या उपवासाने
त्याला प्रतिस्पर्ध्याच्या हृदयात वास मिळतो
त्याची विशुद्ध क्रिया नसली
तर उपवासाचा उपहास होतो !
(बहुधा अशा उपवासांचा उपद्रवही होत असतो.)
त्याचा मंत्र जवळ नसला
म्हणजे त्याच्या यंत्रावर विणलेली खादी
वैफल्याची नग्नता झाकू शकत नाही.
आणि त्याच्या तत्वांचे घटपट करत चालणारे
बौद्धिक हस्तमैथुन
समाधानाचा फक्त भास देऊ शकते.
त्याने निर्मिती होत नाही.
विकृती मात्र निर्माण होते.."

मेरा जीवन हि मेरा संदेश हे म्हणण्याचे धाडस गांधी करू शकतात कारण हा नंगा फकीर माणसाला भेडसावणाऱ्या आदिम समस्यांशी जाऊन बेधडक धडकला . मानवाच्या वास्तवतेचे रूप बुरखा काढून पाहण्याचा प्रयत्न गांधींनीहि केला आणि या प्रयत्नात स्वतःचा बुरखा त्यांनी फाडून घेतला. जे कबुल करायला आपण घाबरतो ते त्यांनी जगजाहीर केले . हि हिम्मत म्हणजे गांधी .

Be the change you want to see -  हि गांधींची खरी विरासत .

Cleanliness is next to Godliness  हि गांधींची साधना .

When doubts haunt me, when disappointments stare me in the face, and I see not one ray of hope on the horizon, I turn to Bhagavad-Gita and find a verse to comfort me; and I immediately begin to smile in the midst of overwhelming sorrow. Those who meditate on the Gita will derive fresh joy and new meanings from it every day .

हे त्यांनी सर्व समस्येसाठी शोधलेला उपायमार्ग . गीतेतून काय उचललं यापेक्षा समस्यांपुर्तीसाठी गीता उचलली हे त्यांच्या जीवनाचे अनुकरण होऊ शकते .

आज डोळे उघडून पाहिले तर दिसेल कि वैयक्तिक चारित्राच्या जोरावर काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे आदर्श गांधी आहेत हे सत्य नाकारता येत नाही . विनोबा भावे , साने गुरुजी , बाबा आमटे , रवींद्र कोल्हे असे एक ना अनेक आहेत . मेळघाटात केलेलं रवींद्र कोल्हेंच कार्य यात गांधीच्या विचारांचा प्रभाव काय असतो हे  जाणवते.

स्वच्छ भारत संकल्प हा गांधीवाद आहे . अजूनही मोठं मोठ्या MNC अथवा संस्थांमध्ये जेव्हा सुशिक्षित लोकांसाठी Washroom Etiquette  ची पाटी लावली जाते तरी देखील ज्या सुशिक्षितांना , इतकं शिक्षण घेऊन मला का हे  सांगतात हा प्रश्न सतावत नाही त्यांच्या शैक्षणिक अर्हतेची कीव वाटावी असेच आहे .म्हणून अजून गांधीवाद हवा आहे अशा अडाणी शिक्षितांसाठी .

गांधींचं एकादश व्रत हे आज हि किती कठीण आणि आवश्यक आहे हे गांधीवादी म्हणून घेणारे देखील सांगत नाहीत. या व्रतात खरे भारतीय जीवनदर्शन आहे .

अनादी 'सत्य'  हे तत्व घेऊन ज्या व्यक्तीने स्वताच्या जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न केला आज त्यांचेच  छायाचित्र असलेलं चलन हे भ्रष्टाचाराच सगळ्यात मोठं माध्यम बनलं आहे . अर्थात भ्रष्टाचार हि मानसिक विकृती आहे पण गांधींनी पुरस्कृत केलेलं प्राचीन 'सत्य' तत्व हेच त्याच निवारण बनु शकत.

गांधीजींना नाकारणं अर्थात त्यांच्या आज नको असलेल्या विचारांना स्थिर होण्यास वाव देण्यासारखे आहे .म्हणून आज काळ सुसंगत गांधी समोर येणं हे आवश्यक बनत आहे .

 गांधींच्या वैचारिक भूमिकेच्या अतिरेकाची मर्यादा विवेकी बुद्धिने ओळखणे यातच गांधीवादाचा विजय आहे .

स्वत:ची आत्मशुद्धि करुन समाजासमोर आदर्श उभे करणार सुधारणवादि गांधीतत्व हे सामाजिक क्रांतीची बीजे रोवू शकते .

-- सागर मुत्तगी

Wednesday, 13 September 2017

अति सर्वत्र वर्जयेत्



बुद्धांच्या "करूणे"चा वारसा घेऊन निघालेला म्यानमार देश रोहिंग्यांच्या प्रति इतका निष्ठुर कसा..!!
"दुःख प्यायला दुःखाचीच ओंजळ लागते" हे तत्वज्ञान सांगणारी ओंजळ आज मिटली कशी काय..!!
"सर्वं दुःखं सर्वं क्षणिकं" हे सत्यच.. तर हे रोहिंगे पण क्षणिकच की..
आणि सर्वांना शून्यातच जायचय.. मग हा विरोध का..?

भारतीय हिंदुसुद्धा निर्वासित म्हणून बाकी देशात स्थायिक झालेच की..भुमीहीन इस्राईली ज्यु तर शेकडो वर्षे जगात निर्वासित म्हणूनच राहत होते.. भारतातील इराणहुन आलेले पारसी.. असे अनेक आहेत, पण त्यांना विरोध झाला हे कुठे ऐकिवात तरी नाही..

म्यानमार जगाच्या इतिहासाकडून शिकतोय असे म्हणायचे का..?
यांसाठी त्यांनी निर्वासीतांचा (विशेषतः या विशिष्ठ धर्माच्या) अभ्यास केला का..?
तर उत्तर 'हो' हेच मिळेल..स्वतःमध्ये आणि आपल्या तत्वांच्या परिभाषा यामध्ये काळानुरूप आवश्यक तो बदल केला पाहिजे..'अहिंसा' म्हणजे हिंसा न करणे,दुसऱ्यावर प्रेम करण ही व्याख्या श्रेष्ठच,पण आता "अहिंसा म्हणजे स्वतःची हिंसा होऊ न देणे" ही व्याख्या आत्मसात करणे गरजेचे झाले आहे..
विशेष म्हणजे म्यानमारच्या सध्याच्या state counsellor-  Aung San Suu Kyi यांना तर 'शांततेचा नोबेल' मिळालाय..
"अहिंसा" आणि "करुणा" ही तत्व म्हणून श्रेष्ठच.. याचा आग्रह जीवनात ज्याने-त्याने किती धरावा, हा व्यक्तिगत प्रश्न.. पण हा व्यक्तिगत आग्रह पराकोटीला जातो तेंव्हा तो समाज आणि देशहिताला बाधक ठरतो.कारण व्यक्तीगत आग्रहाने सबंध देशाला सोसावे लागते,हे आमच्या देशाला चांगलेच माहितीये..(ज्यांना वाचावयाचे आहे,त्यांनी गांधींचा 'राजकारणा'च्या अनुशंगाने अभ्यास करावा)

आज पुनः असाच आग्रह होताना दिसतोय, पण आता हा आग्रह एका व्यक्तिचा नसुन पालतु पुरोगामी जमातीचा..
"मानवाधिकार" आणि "मानवतावाद" याअशा अफाट तत्वज्ञानाचा दाखला दिला जातोय.ज्या पुरोगाम्यांना हिंदुत्वाचा तिटकारा आहे,तिच जमात आज 'अतिथी देवो भवः'चा शंख फुंकत फिरतेय.पण याबद्दल ना कुठला मठाधिपती बोलतोय ना कुठला धर्माचा अधिकारी. सगळे आपापली दांभिक भक्ती,पिसाटलेले भक्त,लूटलेली संपत्ती सांभाळण्यात गर्क..असो.

पण आपण तरी या देशाच्या इतिहासाकडून काही शिकू का..? हा प्रश्न आहे..

लखनौ कराराविषयी आचार्य नरहर कुरुंदकर म्हणतात की,
"पुष्कळ जणाना माहित नसणारी गोष्ट ही आहे की,लखनौ-करार बंगालमधील मुसलमानाना कधीच आवडला नाही.मुबईमधील 9-10 % मुसलमानाना विधानसभेच्या 25 % टक्के जागा देणारा लखनौ-करार जिथे मुबई-मद्रासच्या मुसलमानानी लोकसंख्येच्या अडीचपट प्रतिनिधीत्व मिळून समाधानकारक वाटत नव्हता.तिथे बंगाली मुसलमानाना लोकसंख्येइतके प्रतिनिधित्व देणारा करार असमाधानकारक वाटावा यात नवल नव्हते.भारतभर मुसलमानाना विशेष प्रतिनिधित्व देणा-या या लखनौ-कराराचे शिल्पकार स्वत लोकमान्य टिळक होते.आणि करार बंगालसाठी अपुरा आहे,ह्याच्यापुढे गेले पाहिजे,असे प्रामाणिकपणे मानणारे चित्तरंजन दास होते.दासानी बंगालसाठी एक स्वतंत्र करार केला; हा करार 'दास पँक्ट' म्हणून ओळखला जातो.या करारानुसार बंगालमदील 52 % मुसलमानाना 60 %जागा व 55 % नौक-या मिळावयाच्या होत्या.उरलेल्या 40% जागा व 45 % नोक-यात हिन्दूच्या बरोबर इतर सर्व अल्पसंख्यही सामील व्हायचे होते.हा 'दास-करार' देशबंधू दासानी केला,सुभाषबाबू या कराराचे सहभागी होते,दास व मौलाना आझाद या कराराचे आग्रही समर्थक होतेे,ही एक वस्तुस्थिती आपण ध्यानात घेतली पाहिजे....

'दास-करार' काग्रेस श्रेष्ठीना मान्य झाला नाही.त्यानी तो फेटाळून लावला; हे जरी खरे असले तरी त्यामुळे एक गोष्ट सिध्द होते.हिन्दूच्यापासून मुसलमानाना फोडू इच्छिणारी एक तिसरी सत्ता इंग्रजाची ह्या देशात अस्तित्वात आहे; तिला यश मिळू नये म्हणून औदार्याने वागवून,थोडे अधिक देऊन,पडते घेऊन,मुसलमानाचे मन जिंकावे असे सर्वानाच वाटत होते,'औदार्याने जिंका' हा त्या काळातील सर्वाचा मंत्र होता.टिळकाच्यापासून सुभाषबाबुच्यापर्यंत सगळेच औदार्यवादी होते.या औदार्यवादाला गाधी नेहरु अपवाद नव्हते,तसेच दास-सुभाषही अपवाद नव्हते."
(नरहर कुरुदकर,{आकलन} पृ.6-7)

हा आणि असा मुस्लिमांबद्दलचा उदारमतवाद काल ही होता आणि आज ही आहे.. याची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतील..भारतात हिन्दु व्यतिरिक्त धर्मियांचा तलवारीच्या बळाने हिन्दुंनी कुठेही धर्मांतर केल्याचे कोणी पाहिले नसेल,ही हिन्दुंची सहिष्णुता आहे..(या उलट ज्या हिन्दुंना तलवारीच्या धाकाने बाटवले,त्यांना परत हिन्दुंमध्ये घेतले नाही हा मुर्खपणा आम्ही केला)..
बौद्ध,जैन,शिख अशा अनेक धर्मीयांची श्रद्धास्थाने भारतात आजही निर्भयपणे उभी आहेत..पण मुख्य प्रश्न हा आहे, जेव्हा जेव्हा देश आणि धर्म यामध्ये संघर्ष उभा राहतो तेव्हा प्रथम प्राधान्य धर्माला हेच मुस्लिमांमध्ये पाहावयास मिळते..(काही अपवाद वगळता)
"इतिहासात औरंगजेबाने ब्रम्हदेशातल्या बौद्धांवर हल्ला करून त्यांना धडा शिकवला होता. आज अजून एक औरंगजेब जन्मला पाहिजे..
म्यानमार मधील घुसखोर  मुस्लिमांशी भारताने योग्य व्यवहार केले नाहीत तर याचे परिणाम भारताला भोगावे लागतील",अशी भाषा मुलतत्ववाद्यांकडून आज बोलली जात आहे.

१९४७ साली भारताची फाळणी झाली. बरेच हिंदु निर्वासित भुके कंगाल लोक चौदा पंधरा वर्षे भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून याचना करत होते. त्यावेळी एकाही पुरोगाम्याला पान्हा फुटला नव्हता.
काही फालतू (पालतु) पुरोगामी आणि काही मूलतत्ववादी दोन धर्मातील तेढ वाढवतील.भारतातील मुस्लिमांनीही ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे गरजेचे की, हिंदु टिकतील तरच येथील मुस्लिम सुरक्षित राहु शकेल,कारण आज भारतातील मुस्लिम जितका सुरक्षित आहे, तितका तर तो मुस्लिमबहुल देशात ही नाही...

आज देशासमोर आणखी अनेक समस्या आहेत,स्त्रीयांचे संरक्षण, त्यांना मिळणाऱ्या सुविधा..जातीभेद, जात-पंचायती परत डोकी वर काढत आहेत..'आहे रे'आणि 'नाही रे' मधील दरी जास्त खोल होताना दिसत आहे..शिक्षणक्षेत्राचे बारा कधीच वाजलेत..महान संस्कृतीच्या गप्पाष्टके गाणाऱ्या देशात पंतप्रधानाला शौचालयासाठी आग्रह करावा लागतोय,यासारख दुर्दैव कोणत असु शकत नाही..रामराज्याच्या गप्पा मारण आता तरी बंद करुन कामाला लागले पाहिजे,कारण अकर्मण्यता आज वाढत आहेत...वेदकालिन विमानांचा बडेजाव आजही सांगितला जातोय,विमाने असतील ही..पण आज देशाला स्वतःचा लढाऊ विमान बनवणे देखील कठिण झाले आहे आणि हेच वास्तव आहे..प्राथमिक गरजा पुर्ण करण्यात आपण आज ही अपयशी आहोत.. यासर्व समस्यांची अशी गिनती वाढतच जाईल,मग आपलेच प्रश्न सुटत नसताना अजुन डोकेदूखी वाढवुन घेण्यात कोणता पुरुषार्थ आहे..?अतिथींचा आम्ही आज ही सन्मान करतो, पण अतिथी स्वतःचा धर्म लादण्याचा प्रयत्न करत नसतो आणि त्याच निघुन जाण निश्चित असत.. मग हे आले तरी निघुन जाण्याचा विचार तरी करतील का..? या सर्वांचा विचार झाला पाहिजे.

आज इतिहासाच्या योग्य आकलनासोबत वास्तवाच भान हवय..विवेकबुद्धी जागृत ठेवुन योग्यायोग्य ठरवता यायला हवे..
"अति सर्वत्र वर्जयेत्" हे हिन्दू-मुस्लिम दोघांनी लक्षात ठेवणे गरजेचे.
वेदांचा अभ्यास करताना ब्रह्मसुत्रातील चतुःसूत्री हेच सांगते की, जगात परस्पर विरोधी विचार असणारच.. पण शास्त्रांच्या समन्वयानेच ज्ञान/शांतता येणार, विवादाने नाही..

अथातो ब्रह्मजिज्ञासा | जन्माद्यस्य यतः | शास्त्रयोनित्वात् | तत् तु समन्वयात् |

क्रांतिकारकांच्या कुटुंबांनी या स्वातंत्र्य यज्ञात स्वतःची पूर्णाहुती दिलीय, का तर पुढील पिढ्यांच स्वातंत्र्य अबाधीत रहावे.. आज ही अनेक जवान आपल्यासाठी शाहिद होताहेत..अशा अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य 'मिळवले' आहे आणि आता ते टिकवणे आपले कर्तव्य आहे..

माउलीच्या मुक्ततेचा, यज्ञ झाला भारती |
त्यात लाखो वीर देती, जीविताच्या आहुती |
आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌ |
वेदमंत्राहून आम्हां वंद्य, वंदे मातरम् ||
(गदिमा)

- केदार मुत्तगी

Saturday, 2 September 2017

नीरक्षीरविवेके तु हंसो हंसः बको बकः



भारताचे झालेले अधःपतन म्हणायचे की...भारतात विचारवंतांचा दुष्काळ पडलाय..?

आज पाश्चिमात्यांमध्ये 'विचारवंता'ची असलेली व्याख्या काय आहे याचा यावरुन अंदाज येऊ शकतो.. (फक्त भारताचीच अशी स्थिती आहे असे नाही)
कारण 'रागा'ला आमंत्रण देणारे Institute of International Studies Berkeley Research on Contemporary India Program and the Institute for South Asia Studies at the University of California (UC).. आणि
विषय- ‘India At 70: Reflections On The Path Forward’.. हा अभ्यासपूर्वक मांडणी करावयाचा विषय,यात राजकारण हा एकच विषय असु शकत नाही.अभ्यासपूर्ण चिकित्सेसह भविष्यात भारत जगाला कोणत्या गोष्टीत मार्गदर्शन करु शकतो याचे मत मांडणे आवश्यक असते. मोदी आणि त्यांचे राजकारण हीच एकमेव आज भारतातील समस्या अशी धारणा असलेला माणूस याविषयाव्यतिरिक्त काही बोलणे या बालबुद्धि कडून अपेक्षित ही नाही. या मातीतील अनेक नेत्यांनी, समाजसेवक आदीनी स्वातंत्र्यानंतर भरभरून दिलय, यावर बोलण्याकरता अनेक अभ्यासू आणि तशी कामे करणारे ही भारतात अनेक आहेत.

जीवन का महत्व तभी है जब वह किसी महान ध्येय के लिये समर्पित हो । यह समर्पण ज्ञान और न्याययुक्त हो ।
–इंदिरा गांधी

हे आजीचे वाक्य समजण्या इतकी ही त्याला *** नाही यात शंका नाही.आजकाल 'रागा'सारख्या अनेक विचारवंतांचा आणि भाटांचा सुळसुळाट आहे.पण खरा विचारवंत कोण हे समजण्या इतके आपण सर्व बुद्धिमान आहोत ही अपेक्षा आणि विश्वास ही..

पण 'रागा'चे ऐकून अमेरिका विकसीत स्थितीपासून आणखी किती अधोगामी/उर्ध्वगामी विकसीत होईल हे त्या संस्थेचे तज्ञच जाणो.

जाकी जैसी बुद्धि है , वैसी कहे बनाय ।
उसको बुरा न मानिये , बुद्धि कहाँ से लाय ॥
— रहीम

हे नक्की की, भाटां/पुरोगाम्यांकडून तेही आजी आणि पणजोबाप्रमाणे भारत भाग्यविधाते ठरवले जातील..

भारताचे प्रतिनिधी म्हणुन याच दिवशी म्हणजे 11 सप्टेम्बर 1893 ला "स्वामी विवेकानंदां"नी केलेले भाषण..दोघांच्या चारित्र्य आणि बुद्धिचीकुवत.. परिस्थिती यात जमीन आस्मानाचा फरक..दोघात कसलीच तुलना होवु शकत नाही.
(भाषणाच्या तारखेत असलेले साम्यपाहुन थोडी व्यथा झाली म्हणून लिहीण्याचा प्रपंच..)

विचारवंतांचे हे आजचेे प्रतिनिधीत्व पाहिल्यावर वाटते की, आजच्या तरुण पिढीला 'विवेका'ची अत्यंत गरज आहे. जन्म आणि मरण यामधील अंतर कापताना विवेकाचे वंगण वापरुन आनंदयात्री होणे हेच कदाचित मनुष्य जीवनाचे ध्येय असु शकते.आत्महत्येसारखी पळपुटे मार्ग स्विकारणारा आणि शुल्लक कारणाने निराश होणाऱ्या तरुणाला काय हवे याचा विचार कुणीही करताना दिसत नाहिये. शिक्षणाने आत्मविश्वास - आत्मसन्मान उभा राहायला हवा,पण प्रत्येकाला आज आरक्षणाची कुबडी हवीय. विज्ञानाची कास धरा  अशी परायणे करणारी जमात मानवी मनाचा विचार करताना दिसत नाही आणि बाबा-बुवा च्या नादी लागलेल्या भक्त (उच्चशिक्षितांची संख्या जास्त आहे)मंडळीच्या तोंडी लावायला ही विज्ञान कुठे दिसत नाही. शिक्षणव्यवस्थेकडे विवेक उभी करण्याची जबाबदारी होती,योग्य-अयोग्य यात फरक करता येण्यासाठी निरपेक्ष आणि निःष्पक्ष शिक्षकांची गरज होती आणि आहे, याकडे कुणाचे ही लक्ष नाही.माणुस विकला जातोय याची कुणालाच खंत नाहिये.कुठल्याही धर्मातील मठाधिपतींना काहीही करायचे नाहिये, कारण मुर्खांवरच त्यांची पोट भरत आहेत.सर्व बुद्धिवाद्यांनी आज पुनः शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे,कारण राजकारण हीच एकमेव भारतापुढील समस्या आहे, असा आभास उभा केला गेलाय.

परंतु ज्यांना विधायक कामे करायची आहेत, अशांसाठी बाबा आमटेंसारखी युगपुरुषे आवाहन देतायेत-

माझ्या युवकांनो !
या युगयात्रेत माझ्याबरोबर येण्याची मी तुमच्यावर सक्ती करीत आहे
युद्धातल्या भरतीसाठी नव्हे
तर या विराट अभावाच्या पूर्तीसाठी
आणि तुमच्या-माझ्या अस्तित्वांना अर्थ आणण्यासाठी
मी तेथे येण्याची तुमच्यावर सक्ती करत आहे

जेथे तुमच्या गरजा तुमच्याठायी जन्मण्यापूर्वीच जाणल्या जातील
जेथे तुमच्या अंतरंगात तुम्ही ताठ उभे राहाल
आणि स्वतःच्या आत ताठ उभे राहाल
अभेद्य सेना जेथे तयार होईल
आपल्या आत तुम्ही किती मोठे आहात
हे जेथे मी तुम्हाला दाखवू शकेन
तेथे तुमचे हात जुळतील
तुमची हृदये एक होतील
तुमच्या मस्तकांचे तेथे मिलन होईल
आणि स्वप्नधुंद ज्वालांचे हितगुज तेथे चालेल
अतिथी म्हणून आलेला प्रत्येक आनंदी किरण तेथील रहिवासी होईल
तेथे ‘आज’ च्या भोवती विश्वासाचे  कुंपण असेल
आणि त्यामध्ये प्रिय कर्माची हिरवळ अमाप माजलेली असेल

"आत्मदीपो भवः" हा बुद्धांचा संदेश पुन्हा आत्मसात करायला हवा. सतत प्रश्न विचारणारा सॉक्रेटीस बुद्धित जन्मायला हवा.स्वतःची चुक मान्य करायला प्रामाणिक बुद्धी हवी."सदसद्विवेक", "नित्यानित्यवस्तुविवेक" जागृत करण्यासाठी बुद्धि प्रगल्भ असणे गरजेचे,म्हणून अशी प्रगल्भ बुद्धि बनवण्यासाठी वाचनाची/विचारांची आणि अनुभवाची जोड हवी.

हे दीपा तू जळत रहा ।

असाच जागत या विजनावर
जीवनसुम तिमिरास वहा ॥

नक्षत्रांशी होते नाते
परि न आता सांगायाचे

भग्‍न चिर्‍यावर वादळात या
तुला मला रे जळावयाचे
विसर मंदिरे विसर गोपुरे
श्रेय इथे मातीत पहा ॥
(कुसुमाग्रज)



- केदार मुत्तगी

Sunday, 27 August 2017

तू विवेक दे !

सातत्याने एखादी कृती केल्याने सहजच त्यात नकळतपणे यांत्रिकता येऊन जाते आणि कालांतराने ती कृती करण्यात शुष्कता येते . ही शुष्कताच अकर्मण्यतेला आमंत्रण देते आणि त्या कृतीतला उत्साह निघुन जातो .जीवनाचे सातत्य आणि अखंडत्व टिकवण्यासाठी नेहमीच अशा उत्साहाची गरज असते . या माणसाच्या कचखाऊ स्वभावाला ओळखून द्रष्टया ऋषिनी उत्सव ,सण देऊन मानवी जीवनाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला . हे उत्सव आपला उत्साह वाढवतात आणि जीवनाच्या गतीत सातत्य टिकवतात . आजपर्यंत या उत्सवांनी आपला सतत उत्साह वाढवला आहे . पण उत्साहासोबत गरज असते त्यामागे असलेल्या हेतु , व्यथा नि जाणिवांशी आपण समरस आहोत का या आत्मपरिक्षणाची.
कारण जेव्हा हेतुला तिलांजली दिली जाते तेव्हा उत्सवातला उत्साह कमी झालेला नसतो पण उत्सवाच विकृतिकरण सुरु झालेल असत .कोणत्याही कृतीचा आत्मा हा त्या कृती मागे असलेल्या हेतुत असतो . जेव्हा आत्मा निघुन जातो तेव्हा राहतात ते फ़क्त प्राणहीन हाडांचे सांगाडे .

विघनहर्त्या गणरायाचे स्वागत करण्यात सगळीकडे अवर्णनीय उत्साह असतो . कलेचा अधिपति असलेल्या देवतेच् स्वागत आपल्या सृजनशील कलेनी भव्य आरास करुन करणे ही अलौकिक संधी असते . परंतु कलेसोबत बुद्धीची देवता असलेल्या या देवतेच स्वागत करण्यात मात्र आम्ही निर्बुद्धता केली आहे .बुद्धीचे दैवत असलेली देवता सौंदर्याचे उपभोक्ते असलेल्यांच्या घरी आली आहे . ही आपली सौंदर्य उपभोगाची वृत्ती आपल्या बौद्धिक उपासनेला निर्बुद्ध बनवत आहे . आपण गणरायाच्या मुर्तीत सौंदर्य बघायला निघालो आहोत . अर्थात मुर्तीत सौंदर्य असतेच पण गणरायाची मूर्ती ही बुद्धीच्या उपासनेचे साधन आहे याला सहज विसरलो . 

इंटरनेट मुळे आज ज्ञानाचे स्त्रोत अगदी सहज उपलब्ध आहेत , अगदी आपल्या बोटाच्या टोकावर आले आहे . अशा काळात बुद्धीची उपासाना करण्यासाठी गणपति का हवेत ?
कारण इंटरनेट ज्ञान उपलब्ध करून देऊ शकते पण आम्हाला नुसत ज्ञान नकोय सोबत हवाय तो विवेक (Power of discrimination ).
कारण नुसत ज्ञान हे भूतकाळातील अनुभवांच संचित असत पण त्या ज्ञानसंचिताचा विधायक उपयोग वर्तमान आणि भविष्यात करण्यासाठी लागतो तो विवेक . म्हणूनच आज गणारायकडे विवेकी बुद्धी मागण्याची गरज आहे . 

आत्यंतिकवाद हा बुद्धिचा संकुचितपणा आहे. आत्यंतिक अहिंसेचे समर्थन करणार्यांनी षंढ बनवल आहे तर आत्यंतिक हिंसेच समर्थन करणार्यांनी शांतता भंग केली आहे . हे गणराया आज आम्हाला हिंसा-अहिंसेचा विवेक हवा आहे .

जे आवश्यक असूनही मिळत नाही आणि झगडून घ्याव लागत त्याला हक्क म्हणतात .जे कोणीही कर म्हणून सांगत नाही आणि तरी करण आवश्यक असत त्याला कर्तव्य , जबाबदारी म्हणतात . आवश्यक हक्क मिळवताना न उमगलेल्या जबाबदारी पार पाड़ण्याचा आमचा विवेक जागृत ठेव .

व्यक्तिस्वातंत्र्य हा आमचा अधिकार आहेच . पण आमच व्यक्तिस्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्याच व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहिल याचा विवेक दे .

डावे आणि उजवे अशा विचारसरणीत दुभांगलेल्या राष्ट्राला विवेकी विचाराचे अधिष्ठान दे .

आत्यंतिक राष्ट्रनिष्ठा जपतानाही वैश्विकतेचे आमचे भान जागृत ठेव .

अविवेकाची काजळी लावून विवेकवादाची शेखचिल्ली करणार्यांना शुद्ध विवेकाचे दर्शन दे .

बुद्धित साचलेल्या विचारांना कर्तृत्वाचे हात दे नि त्या कृतिवीरांना विवेकत्वाच आशीष दे .

-- सागर मुत्तगी 

Sunday, 20 August 2017

"न खलु वयः तेजसो हेतुः "



अज्ञाताचा अज्ञातापासून अज्ञाताकडे सतत चालेला हा प्रवास.. माणसाचा जन्म का? इथपासून ते आपले गंतव्य काय? हे सगळे जणु की यक्ष प्रश्नच..
पण या प्रवासात प्रत्येकाला 'आपला' असा "अनुभव" गोळा करत पुढे जाता आले पाहिजे, कारण नुसतीच 'साखर गोड आहे' हे ऐकून साखरेची मजा नाही, त्यासाठी ती चाखलीच पाहिजे..कारण "अनुभव ब्रम्हा:" हेच सत्य सर्व वाङ्गमयांचा सार..

पण आपण जीवन जगताना सतत 'आधाराचा' शोध घेतच पुढचा प्रवास करत असतो,यात वाइट काही नाही..परन्तु तो झाला त्यांचा अनुभव..

बाबा आमटे एकेठिकाणी म्हणतात की,

‘गांधी, लेनिन, मार्क्‍स, मार्टिन ल्युथर, सानेगुरुजी हे केवळ दीपस्तंभासारखे.. खडकावर जहाज आदळू नये, एवढेच त्यांचे दिग्दर्शन. पण वल्हे मारण्याची, खडक टाळण्याची ताकद नाविकांतच हवी,’

मग आपला अनुभव गोळा करायचा तर ही ताकद येणार कुठून?
कुसुमाग्रजांचा कोलंबस आठवा.. किंवा
Give me 100 Nachiketa and I can change the world म्हणारे विवेकानंद..
असे अनेक महापुरुष या धरेवर जीवनाला "आनंद सोहळे" बनवून अमर झाले.. कसे?

तर त्यांच्या "दुर्दम्य ध्येयासक्तिमुळे"..

ही ध्येयासक्ति ऊभी राहते ती 'संस्कृती आणि समाज' यांप्रती असलेल्या "संवेदनशीलते"मुळे.. आज यंत्रमानवाच्या या युगात आपण आपली संवेदनशीलता हरवून बसलोत.. ही उभी करण्यासाठी आजप्रयत्न हवेत..

"संथ नाजुक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे
मस्तकावर पाट्या वाहणार्‍या स्वेदगंधेच्या डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावाणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्‍याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे

भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत" (बाबा आमटे- ज्वाला आणि फूले )

आजचा दिवस पवित्र आहे, कारण ज्ञाननिष्ठ ब्राम्हणांचा (ब्राम्हण = वृत्तिवाचक शब्द) यज्ञोपवीत बदलण्याचा दिवस.. म्हणजेच "वेदनिष्ठने सृष्टिचे संस्कार स्वास्थ्य टिकावेत" यासाठी अखंड कर्मयोग करण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा दिवस.. यज्ञोपवीत घेताना केलेला संकल्प आणि आज पर्यंतच्या प्रवासातला " आपला अनुभव " यांची सांगड घालून 'आत्मपरीक्षण' करण्याचा दिवस..
यातुनच "You cannot purchase 'real' Indian Brahmin"( पांडुरंगशास्त्री आठवले- अमेरिकनांना त्यांनी ठणकावुन सांगितले) हे म्हणण्याची खुमारी ऊभी राहील.."आत्मश्रद्धा आणि ईशश्रद्धा" आणखी दृढ़ होईल..
 
"सूर्यस्य पश्य श्रेमाणं योन तन्द्रयते।
चरश्चरैवेति चरेवेति…!"
हा उपनिषदांचा उद्घोष आहे, "कधी सुर्याला थांबलेल पाहिलय ! नाही ना.. मग तुम्ही ही चालत रहा."
म्हणूनच 'संकल्प' घेण्यास्तव आणि 'आपला अनुभव' गोळा करण्यास्तव कटिबद्ध होऊयात..

"खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!"

- केदार मुत्तगी
(दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही !!)