The Infinite Energy which streams forth from the Eternal and sets the wheel to work, looms up in the vision of man in various aspects and infinite forms. Each aspect creates and marks an age. Sometimes She is Love, sometimes She is Knowledge, sometimes She is Renunciation, sometimes She is Pity. This Infinite Energy is Bhawani. She also is Durga, She is Kali, She is Radha the Beloved, She is Lakshmi. She is our Mother and the Creatress of us all.
-- Yogi Arvindo
योगी अरविंदो यांनी पाहिलेले भारताचे स्वरुप हे स्त्री तत्वात आहे .तिच्यातून आपण निर्माण होतो म्हणून आपण या भारतमातेची लेकरे . पण ही भारतमाता अव्यक्त आहे .तिचा आविष्कार बनून कधी सीता येते तर कधी त्यागमुर्ति मैत्रयी आणि असे असंख्य.भारतीय स्त्री याच भारतमातेचा सूक्ष्म आविष्कार असते.
काही फुले इतकी नाजुक असतात की त्यांना स्पर्श करण्याने ती आपल्या स्पर्शाने कोमेजतील का ही भीति वाटते .
स्वच्छ , नितळ पाण्याची सुंदरता ही त्याची स्वच्छता पाहण्यातच आहे ,आपला स्पर्श कदाचित त्या स्वच्छतेला , सौंदर्याला धक्का देऊ शकतो .
पण , सुधासोदर्यं ते सलिलमशिवं न:शमयतु
ते सौंदर्य अनुभवण्याने आपण स्वच्छ होत असतो आणि असे आपण स्वच्छ होणे यालाच ते पाणी स्वतः च्या जीवनाची धन्यता मानत असते .
असंख्य वासना आणि विकारांनी ग्रस्त मनाला हवा असतो तो पावित्र्याचा अनुभव जो मनातला क्षोभ नाहिसा करेल आणि विवेकदीप प्रज्वलित करेल .
विवेकाच्या चित्ती नित स्फुरत जो मोद सुभगे
असे तोची तू गे असशि धन तू पुण्य कृतिचे
क्षणार्धी नेई गे कुमति विलयासी जल तुझे
मनीच्या क्षोभाला तव तनुलता स्पर्श करु दे
म्हणूनच तीचे विभूतिमत्व "स्त्रोतसामस्मि जाह्नवी" हे माझे ऐश्वर्य आहे असे सांगताना भगवंत देखील भरून पावतात.
मानवी जीवनाचा प्रवास हा अखंड आणि अतूट आहे. जीवनातील संगीत आणि मृत्युतील काव्य ज्याला समजले मग तिथे निराशेला थारा उरत नाही .
प्रसन्नता हे त्यांचे जीवनदर्शन बनते नि पावित्र्यता हा आपला अनुभव .
इथे चिंता निघुन जातात आणि चिंतन सुरु होते.
समर्पण हे अशा जीवनाचे सौंदर्य असते .
त्यांचे दर्शन हां पावित्र्याचा अनुभव असतो आणि स्मरण हे तृप्तिचे निधान असते.
खवळलेल्या तूफानी सागराची ही तटबंदी असते . या किनारी असलेली नीरव शांतता देखील आपल्याला खुप काही शिकवून जाते ,आत्मपरिक्षणास भाग पाड़ते .
सतत निःस्वार्थ प्रवाहशीलता हे अशा जान्हवीच्या निर्मलतेचे रहस्य आहे ,तिच्या प्रवाहाला शिस्तीचे कठोर काठ असतात म्हणूनच या निर्मलतेत सृजनाची सुप्त बीजे असतात.
अस्तित्वाच्या संघर्षात जग वाटचाल करत असताना तिने अस्तित्वशून्य होण्याचा प्रयास करणे हे विस्मयकारक आहे पण हीच तिची तपश्चर्या असते म्हणूनच आज त्या साधनभक्तीचे आदर्श बनून उभे राहतात आणि कृतिमधल्या आनंदाचे गमक हळूच पण नकळत सांगून जातात .
सहजीवन ही स्त्री मनाची खुप मोठी मूक मागणी आहेच . "पत्यर्नो यज्ञसंयोगे" हा पत्नीधर्म भारतीय स्त्रीचे आदर्श आहे .
वनवासाला पतिसोबत जाणाऱ्या सितेचा "जेथे राघव तेथे सीता " हां हट्ट समर्पण आणि सहजीवनाचे आदर्श घडवून देतो.
त्याच वेळेला वनवासात न जाऊ शकणाऱ्या उर्मिलेचे समर्पण ही तितकेच आदर्श आहे, यात सहजीवनाचा विरह आहे पण त्यागाचे सामर्थ्य देखील आहे.
स्त्री म्हणून झांटिपि होण्याचा अधिकार प्रत्येक स्त्री ला आहेच आणि तो कोणीच नाकारु शकत नाही पण इथला सॉक्रेटीस हा अत्रि कुलोत्पन्न आहे हे समजून अनुसया होण्याचे माधुर्य यात भारतीय स्त्री जीवनाचे आदर्श आणि अखिल स्त्री जातीचा स्त्री असण्याचा अर्थ सामावला आहे .
आज सहजीवन याचा अर्थ सोबत असणे इतकाच आहे कारण ते दोन स्वतंत्र अस्तित्व समजून राहत असतात ज्यात एकमेकांचा विचार ,एकमेकांबद्दल प्रेम , काळजी आणि आपुलकी आहेच पण इथे विरहाचे भय सतत असतेच.
परंतु मानसिक साहचर्य आणि बौद्धिकतेच्या जोरावर अद्वैत साधुन अस्तित्वच विलीन करणे हे खुप मोठे साहस आहे आणि ते देखील जेव्हा दोन असे जीव एकत्र येतात ज्यांची स्वताच्या बुद्धिप्रतिभेने जगाला दीपवून टाकण्याचे सामर्थ्य आहे तरीदेखिल समर्पितता आणि अखंड विलिनत्व म्हणजे अलौकिकत्वच ! इथे आपण नतमस्तक होण्यातच आपली कृतार्थता असते .
"I believe in standardizing automobiles, not human beings." असे म्हणून 20 व्या शतकातला बुद्धिमान Einstein देखील मानवी जीवनाच्या परिवर्तनबद्दल स्वतची मर्यादा जाहिर करतो . पण हेच आव्हान स्वीकारुन माणूस देखील सतत विचारांचे सिंचन केले तर बदलू शकतो अशा दुर्दम्य आशेवर कार्य करणाऱ्या व्यक्तीचा संसाराचा व्याप आणि पसारा मोठा असतो पण हे आव्हान आपल्या खांद्यावर उचलण्याचे सामर्थ्य त्या बाळगुन असतात .
अशी जीवने तीर्थ बनतात .. तृप्तीची तिर्थोदके ...
सौ. निर्मलाताई पांडुरंगशास्त्री आठवले हे एक असेच स्थान ,तृप्तीचे तिर्थोदक.
यांच्या जीवनातील विशेष म्हणजे काय ते कोणालाच सांगता येत नाही हेच त्यांचे विशेषत्व. तरीदेखील ज्यांनी एक अग्नी (पांडुरंगशास्त्री आठवले - स्वाध्याय परिवाराचे दादा ) सोबत राहण्याच् दिव्य केल आणि आदरणीय दीदीजी ना घडवल यावरून आपण त्यांच्या जीवनाची खोली समजू शकतो. दादांच्या सोबत ज्या बौद्धिक चर्चा करू शकत होत्या , सावरकरांसारखे बुद्धिवादी ज्यांचे आदर्श होते या अगदी छोट्या प्रसंगातुन त्यांचे स्वतंत्र बुद्धि प्रतिभेचे दर्शन होते .
अयाचक व्रत घेऊन जीवन जगणाऱ्या दादांसोबत वयाच्या 19- 20 व्या वर्षी जेव्हा विवाह झाला तेव्हापासून जीवनाचा प्रत्येक श्वास म्हणजे असिधारा व्रत. स्वातंत्रयापूर्वीचा काही वर्षे पूर्व जेव्हा विवाह झाला त्यानंतर तरुण वयात दादांच्या विचारांचे तूफ़ान ,अनेक आर्थिक संकट आली असतील पण अयाचक व्रताचे कठोर पालन , विश्वतत्त्वज्ञान परिषदेत मिळालेला गौरव पण नाकरलेली ऑफर ,तत्त्वज्ञान विद्यापीठाची उभारणी आणि त्याची आतापर्यंतचि सर्व जडणघड़ण यात ताईजींनी कुठेच न जाणवू देता केलेले संस्कार आणि निर्व्याज प्रेम हे शब्दातीत आहे.
ताईजींच्या "जेव्हाच् तेव्हा आणि जिथल्या तिथे " याचे शिस्तपालन , स्वच्छता , बुद्धिनिष्ठा ,समर्पण वृत्ती ,त्याग यामध्ये स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्याचे गमक आहे.
दादाजी आणि ताईजी यांच्या जीवनाचे अद्वैत म्हणजे ,
रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्यै नमो नम:।
रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्यै नमो नमः।
रुद्रो विष्णु उमा लक्ष्मी तस्मै तस्यै नमो नमः।
रूद्र सूर्य आहे आणि उमा त्याची प्रभा आहे ,रूद्र फूल आहे आणि उमा त्याचा सुगंध आहे ,रूद्र यज्ञ आहे आणि उमा त्याची वेदी आहे .
बा.भ.बोरकर यांच्या खालील ओळींचा शोध ताईजीं मध्ये पूर्ण होतो.
जीवन त्यांना कळले हो ..
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो..
याच बोरकरांनी अशा अव्यक्त जीवन जगलेल्या देखण्या जीवनांचे वर्णन सुंदर शब्दात केले आहे .
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्या नभा
वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा
देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा
अशा पूजनीय ताईजींना कोटि कोटि वंदन !!!
सदाचाराचा तू कणखरचि पाया मज गमे
असे तू हर्षाचा नित नवनवोन्मेष मनि गे
असे तूची पुण्यस्थल-प्रमुख गंगेच जगती
गमे त्रैलोक्याचे वसन जणु तू निर्मल अती ।।
-- सागर मुत्तगी